Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date –
14 July 2019
Time 18.00 to
18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ जुलै २०१९ सायंकाळी ६.००
****
चांद्रयान-२ च्या प्रक्षेपणाची तयारी जवळपास पूर्ण
झाली आहे. आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथून भारतीय अवकाश संशोधन केंद्र- इस्त्रो आज मध्यरात्रीनंतर
२ वाजून ५१ मिनिटांनी हे यान प्रक्षेपित करणार आहे. जीएसएलव्ही एम. के.-३ या
तीन टन ८५ किलो वजनाच्या अग्निबाणाच्या सहाय्यानं हे यान अंतराळात सोडलं जाणार आहे.
हा अग्निबाण इस्त्रो संस्थेत बाहुबली या नावानं ओळखला जातो.
चंद्राभोवती विशिष्ट कक्षेत
भ्रमण करणारं भ्रमणयान, चंद्राच्या पृष्ठभागावर चालणारं प्रज्ञान हे वाहन आणि ते वाहन
चंद्रावर अलगद उतरवणारं विक्रम यान, असे या चांद्रयानाचे तीन भाग आहेत. उड्डाणानंतर
५४ व्या दिवशी म्हणजे सहा सप्टेंबरला हे यान प्रत्यक्ष चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर
उतरणार आहे. या मोहिमेसाठी ९७८ कोटी रूपये खर्च आला आहे. प्रक्षेपणप्रसंगी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह अनेक महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.
****
पावसानं हुलकावणी दिल्यानं मराठवाड्यातील पीक परिस्थिती
गंभीर होत आहे. त्यामुळे पिकांना जीवदान देण्यासाठी मराठवाड्यात २२ जुलैनंतर कृत्रिम
पाऊस पाडला जाणार असल्याची माहिती रोजगार हमी योजना मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी
दिली आहे. कृत्रिम पावसाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, शासनानं त्यासाठी ३० कोटी रुपयांचा
निधीही मंजूर केला आहे. यामध्ये औरंगाबाद, सोलापूर आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांची
निवड करण्यात आली आहे. २२ तारखेनंतर येणाऱ्या ढगांमध्ये पाण्याची घनता जास्त असेल,
त्यावेळी कृत्रिम पावसाचा प्रयोग निश्चित यशस्वी होऊ शकतो, असं हवामान खात्यानं सांगितलं
आहे.
****
धूरमुक्त महाराष्ट्र उपक्रमात बीड जिल्ह्यात उद्यापासून
पंडित दीनदयाळ उपाध्याय अभियानाचा प्रारंभ करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी
आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिली. त्यांनी आज सर्व संबंधितांची बैठक घेऊन कार्यवाही
करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या अभियानात धूरमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी १०० टक्के
कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन दिले जाणार आहे. या अंतर्गत पात्र कुटुंबांना १०० टक्के
शिधापत्रिका आणि धान्य वाटप हे उद्दिष्ट देऊन या अभियानाचा प्रारंभ राज्यस्तरावर मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या अनुषंगानं सर्व संबंधित कार्यालयांनी
नागरिकांकडून प्राप्त झालेले अर्ज डिजिटायझेशन करून कार्यवाही पूर्ण करण्याकडे लक्ष
देण्याची सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्याच्या हक्काचं कृष्णा खोऱ्यातलं पाणी आणण्यासह
सोलापूर -तुळजापूर - उस्मानाबाद रेल्वे
मार्गासाठी आपण संसदेत पाठपुरावा
करत असल्याचं प्रतिपादन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केलं आहे. उस्मानाबाद इथं
आज शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे अग्रणी उद्धवराव
पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित जीवनगौरव पुरस्कार प्रदान सोहळा आणि कर्करोग निदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत
होते. यावेळी बार्शी इथले डॉक्टर बी. एम नेने यांना खासदार निंबाळकर यांच्या हस्ते
उद्धवराव पाटील जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
****
मराठवाडा साहित्य परिषदेच्या कोषाध्यक्षपदी कुंडलिक अतकरे
यांची निवड करण्यात आली आहे. पूर्वीचे कोषाध्यक्ष देविदास कुलकर्णी यांच्या निधनामुळे
हे पद रिक्त झालं होतं. परिषदेच्या कार्यकारिणीच्या आज झालेल्या बैठकीत सर्वानुमते
हा निर्णय घेण्यात आला.
****
जालना जिल्ह्यातल्या राजूर बसस्थानकात आज दुपारी एका वृध्द महिलेचा
बसच्या चाकाखाली दबून गंभीर जखमी झाल्यामुळे मृत्यू झाला. नंदाबाई खाकरे, असं मृत महिलेचं नाव असून, त्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या वडोज खुर्द इथल्या
रहिवासी होत्या. बसस्थानकात चालक बस मागे घेत असताना ही दुर्घटना घडली.
दरम्यान, जालना-औरंगाबाद मार्गावरील बदनापूरजवळ आज दुपारी झालेल्या
अन्य एका कार अपघातात पती-पत्नीसह ११ आणि नऊ वर्षांच्या दोन मुली गंभीर जखमी झाल्या.
जखमींवर जालना इथल्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
****
विविध शासकीय योजनांचा लाभ
नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमदार आपल्या दारी हा उपक्रम परभणी शहरात आठवडाभरापासून
राबवण्यात येत आहे. शहराच्या प्रभाग क्रमांक पाच मधील गजानन नगरात आज हा कार्यक्रम
झाला. यावेळी विविध शासकीय योजनांच्या पात्रतेचे निकष सांगून, पात्र नागरिकांचे अर्ज
स्विकारून त्यांची योजनांसाठी निवडही करण्यात आली. आतापर्यंत सुमारे १० हजार नागरिकांना
या उपक्रमातून लाभ मिळाल्याचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी सांगितलं.
****
आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतला
अंतिम सामना आज यजमान इंग्लंड आणि
न्यूझीलंड संघांत होत आहे. न्यूझीलंड
संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती
आलं, तेव्हा त्यांनी चार गडी गमावत ३५ षटकांत १५२ धावा केल्या होत्या.
****
No comments:
Post a Comment