Thursday, 1 April 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 01.04.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०१ एप्रिल २०२ सकाळी ११.०० वाजता

****

केंद्र सरकारनं अल्पबचत योजनांवरील व्याजदर जैसे थे ठेवले आहेत. व्याजदरांत कपात करण्यात आल्याचा काल जारी करण्यात आलेला आदेश मागे घेत असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज सकाळी ट्विटर संदेशांत दिली. चुकून प्रसिद्ध करण्यात आलेला आदेश मागे घेत असल्याचं त्यांनी सांगितलं. २०२० - २०२१ या आर्थिक वर्षाच्या अंतिम तिमाहीत बचत योजनांवर जे व्याजदर होते तेच अबाधित ठेवण्यात आले आहेत.

****

देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम वेगात सुरू असून, आजपासून ४५ वर्षांच्या वरील सर्वच नागरिकांना लस घेता येणार आहे. एक जानेवारी १९७७ च्या पूर्वी जन्मलेले सर्व नागरिक यासाठी पात्र असतील. नागरिकांना कोविन पोर्टलवर ऑनलाईन तसंच प्रत्यक्ष केंद्रावर जाऊनही नाव नोंदणी करता येईल. रूग्णालयात लसीकरणासंबंधीच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन होत नसेल, तर एक शून्य सात पाच या मोफत क्रमांकावर तक्रार नोंदवता येईल, असं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे.

****

आसाम आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान आज सकाळी सात वाजता सुरु झालं. आसाममधल्या १३ जिल्ह्यातल्या ३९ विधानसभा मतदासंघांसाठी तर पश्चिम बंगालमधल्या चार जिल्ह्यातल्या ३० जागांसाठी मतदान होत आहे.

****

आकाशवाणीवरुन ‘गीत रामायण’ सादरीकरणाला आज ६५ वर्ष पूर्ण झाली. १९५५ साली एक एप्रिलला रामनवमीच्या दिवशी गीतरामायणातलं पहिलं गीत आकाशवाणी पुणे केंद्रावरुन प्रसारित झालं होतं. ग. दि. माडगुळकर यांनी लिहिलेली आणि सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेली गीत रामायणातली सगळीच गीतं रसिकांच्या खास पसंतीस आहेत.

****

मराठवाड्यात काल नव्या पाच हजार नऊ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ७६ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या १९, नांदेड जिल्ह्यातल्या २४, बीड नऊ, जालना सात, हिंगोली सहा, लातूर पाच, परभणी चार तर उस्मानाबाद जिल्ह्यातल्या दोन रुग्णांचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात काल एक हजार ५४२ रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात एक हजार ७९, लातूर ६०६, जालना ५३२, परभणी ४९८, बीड ३२५, उस्मानाबाद २५३, तर हिंगोली जिल्ह्यात १७४ रुग्ण आढळून आले.

****

No comments: