Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 04 December 2021
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०४ डिसेंबर २०२१ सकाळी ७.१० मि.
****
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देश दीडशे कोटी मात्रांच्या
दिशेनं वाटचाल करत आहे. कोरोना विषाणूचा ओमायक्रान हा नवा प्रकार आढळून आल्याचं चिंता वाढली आहे. आपल्या सर्वांना
आवाहन आहे की, लसीच्या दोन्ही मात्रा
वेळेवर घ्या, तसंच ज्यांनी अद्याप लस घेतली नाही, त्यांना लस घेण्यासाठी सहकार्य करा. आपली आणि आसपासच्या सर्वांची काळजी
घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड -19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या
राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी
संपर्क करू शकता.
****
·
ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्राकडून आवश्यक उपाययोजना
सुरू; राज्यांना अधिक सतर्क राहण्याचे निर्देश
·
कोव्हिशील्ड तसंच कोव्हॅक्सिन लस ओमायक्रॉनवर उपयुक्त
-राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा निर्वाळा
·
९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला कालपासून नाशिक
इथं प्रारंभ
·
राज्यात काल नवे
६४६ कोविडग्रस्त;
मराठवाड्यात एकाचा मृत्यू तर नवे २०
·
हिंगोलीत कोविड लस घेणाऱ्या नागरिकांसाठी 'बंपर लसीकरण ड्रॉ' बक्षीस योजना
· संपकरी
एसटी कर्मचाऱ्यांविरुद्ध मेस्मा अंतर्गत कारवाईचा परिवहन मंत्री अनिल परब यांचा इशारा;
नांदेड इथं एका आंदोलक कर्मचाऱ्याचा मृत्यू
आणि
·
न्यूझीलंडविरूद्ध
दुसऱ्या कसोटीत पहिल्या दिवस अखेर भारताच्या चार बाद २२१ धावा
****
ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या
स्वरुपाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत
असल्याचं, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांनी सांगितलं आहे. ते काल लोकसभेत कोविडविषयक
झालेल्या चर्चेदरम्यान बोलत होते. कोरोनाचा सामना
करण्याच्यादृष्टीनं देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात इतर आजारांसोबतच कोरोनासाठी ५०
खाटांची विशेष सोय उपलब्ध करून दिली जाईल, यासोबतच विविध
प्रकारच्या ११५ चाचण्या करता येतील अशी अत्याधुनिक रोगनिदान चाचणी व्यवस्था उभारली
जाईल, यासाठी प्रत्येक १०० कोटी रुपयांचा खर्च येणार असून,
त्यासाठीचं काम सुरु झालं आहे, अशी माहिती केंद्रीय
आरोग्य मंत्र्यांनी दिली. भविष्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अचानक वाढला, तर त्यादृष्टीनं खबरदारीची उपाययोजना म्हणून केंद्र सरकारनं, महत्वाच्या औषधांचा अतिरिक्त साठा ठेवला आहे. याशिवाय प्रत्येक राज्याला
कोरोनाविरोधातल्या लढ्यासाठी आर्थिक सहकार्य दिलं जात आहे असं त्यांनी सांगितलं.
****
ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव
रोखण्यासाठी अधिक सतर्क राहण्याचे निर्देश, केंद्र सरकारनं
राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. याबाबत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश
भूषण यांनी, सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांचे
अतिरिक्त मुख्य सचिव आणि प्रधान सचिवांना पत्र लिहिलं आहे. बाधित व्यक्तींच्या
संपर्कात आलेल्या व्यक्तींचा माग काढणं, त्याचं विलिगीकरण
करणं, आणि ७२ तासांच्या आत त्यांची चाचणी करणं आवश्यक आहे.
त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली असेल, अशा सर्व व्यक्तींचे
नमुने संपूर्ण जनुकीय, क्रमनिर्धारक करण्यासाठी तातडीनं पाठवले पाहिजे, असं या पत्रात म्हटलं आहे.
दरम्यान, कोविड प्रतिबंधासाठी विकसित कोव्हिशील्ड
तसंच कोव्हॅक्सिन या लसी ओमायक्रॉनवर उपयुक्त असल्याचं, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश
टोपे यांनी सांगितलं आहे. ते काल जालन्यात बोलत होते. राज्यात मोठ्या प्रमाणावर लसीकरण
झालं असल्याने, घाबरण्याचं कारण नाही, मात्र नागरिकांनी कोविड नियमांचं पालन करण्याचं
आवाहन टोपे यांनी केलं.
****
९४
व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला कालपासून नाशिक इथं कुसुमाग्रज नगरीत प्रारंभ
झाला. प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं. गीतकार
जावेद अख्तर, संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव
ठाले पाटील यांच्यासह संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि अनेक मान्यवर साहित्यिक यावेळी उपस्थित
होते. संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ जयंत नारळीकर ऑनलाईन पद्धतीनं या उद्घाटन
सोहळ्यात सहभागी झाले होते. समाजात विज्ञानवृत्तीचा अभाव आणि मराठीतही विज्ञान साहित्याचं
प्रमाण अल्प असल्याबद्दल डॉ नारळीकर यांनी अध्यक्षीय भाषणातून खंत व्यक्त केली. ते
म्हणाले....
‘‘प्रतिष्ठित साहित्यिकांमध्ये विज्ञानाबद्दल
एक प्रकारची भीती दिसून येते. विज्ञान म्हणजे आपल्या आकलनापलिकडले असा बहुतेक साहित्यिकांचा
ग्रह झालेला असल्याने ते आपली प्रतिभा विज्ञानाच्या दिशेने चालवायला धजत नाहीत. अनेकदा
वाचक किंवा श्रोते देखील आपल्याला वैज्ञानिक तथ्ये समजणारच नाहीत असा ग्रह बाळगतात.
विज्ञान-कथालेखकांची ही अवस्था तर विज्ञान समाजापर्यंत मनोरंजक पद्धतीने मांडण्याचे
काम किती लोक करतात?’’
त्यापूर्वी
सकाळी ग्रंथदिंडी काढण्यात आली. ढोल पथक, लेझीम, मल्लखांब, नृत्य पथक, शालेय
विद्यार्थ्यांचा सहभाग, तसंच अनेक खेळांचं प्रदर्शन हे या ग्रंथदिंडीचं वैशिष्ट्य
ठरलं.
दरम्यान,
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी या संमेलनात ठराव करावा, असं आवाहन मराठी
भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी केलं आहे. साहित्य संमेलन परिसरात मराठी भाषा दालनाच्या
उद्घाटनाप्रसंगी ते काल बोलत होते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी
राज्य सरकारने केंद्र सरकारकडे शिफारस केली असून, राष्ट्रपतींना १२ कोटी पत्रं पाठवण्यात
येणार असल्याचं, देसाई यांनी यावेळी सांगितलं.
या
संमेलनाच्या निमित्तानं भरवण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन स्वागताध्यक्ष
छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आलं, तर संमेलनामध्ये प्रथमच भरवण्यात आलेल्या चित्र-शिल्प
प्रदर्शनाचं उद्घाटन, चित्रकार विजयराव बोधनकर यांच्या हस्ते करण्यात आलं. ग्रंथ प्रदर्शनात
सुमारे दीडशे कक्ष उभारण्यात आले आहेत.
या
संमेलनासाठी सर्व प्रकारच्या नियमांची दक्षता घेण्यात येत आहे. कोविड प्रतिबंधक लसीकरण
झालेल्यांना प्रवेश देण्यात येत असून, संमेलनस्थळी कोविड लसीकरणाची व्यवस्थाही करण्यात
आली आहे.
****
आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी
काल राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले. केंद्रीय
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या वतीनं देण्यात येणारे हे पुरस्कार दिव्यांग, दिव्यांगांसाठी कार्यरत व्यक्ती, संस्थांना प्रदान करण्यात आले. राज्यातल्या
११ व्यक्ती आणि एका संस्थेला यावेळी गौरवण्यात आलं. श्रवण दोष असणारा
औरंगाबादचा शिवछत्रपती पुरस्कार विजेता जलतरणपटू
सागर बडवे आणि लातूरच्या प्राध्यापक डॉक्टर प्रीती पोहेकर यांचा यामध्ये समावेश आहे.
****
राज्यात काल ६४६
नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे
राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६६ लाख ३७ हजार २८९ झाली आहे. काल १६
रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची
एकूण संख्या, एक लाख ४१ हजार ०६५
झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्क्यांवर
कायम आहे. काल ९१५ रुग्ण बरे झाले, राज्यात
आतापर्यंत ६४ लाख ८५ हजार ३३५ रुग्ण, कोरोना विषाणू
संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक
७ दशांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या सात हजार १३२
रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल २० नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले,
तर बीड जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
लातूर जिल्ह्यात आठ नवे रुग्ण आढळले. बीड चार, औरंगाबाद तीन, जालना आणि परभणी जिल्ह्यात
प्रत्येकी दोन, तर नांदेड जिल्ह्यात एक नवा रुग्ण आढळला. हिंगोली तसंच
उस्मानाबाद जिल्ह्यात काल कोविडचा एकही नवा रुग्ण आढळला नाही.
****
हिंगोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी कोविड
प्रतिबंधात्मक लस घेणाऱ्या नागरिकांसाठी 'बंपर
लसीकरण ड्रॉ' ही बक्षीस योजना राबवण्याची घोषणा केली आहे. कोविड लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्या नागरिकांची
सोडत काढून, विजेत्यांना एल.ई.डी.टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, मिक्सर ग्राइंडर अशा वस्तू मिळणार
आहेत. दोन डिसेंबर ते २४ डिसेंबर या कालावधीत लस घेणाऱ्या
नागरिकांना ही योजना लागू असेल.
दरम्यान,
हिंगोली जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचं
प्रमाण वाढवण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. सर्व सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांनी लस घेतल्याचं प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय त्याचं वेतन जारी करू
नये असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
****
परभणी
महानगरपालिका हद्दीतील एक लाख ८७ हजार ६६३ नागरिकांनी कोविड प्रतिबंधात्मक लस घेतली
असून ७४ हजार ८०५ नागरीकांनी कोविड लसीची दुसरी मात्राही घेतली आहे. महानगरपालिकेचे
आयुक्त देविदास पवार यांनी ही माहिती दिली.
****
प्रदुषण
रोखण्यासाठी पूर्णपणे हरित ऊर्जेचा वापर आवश्यक असल्याचं, राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य
ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल एका खासगी वृत्तवाहिनीवर ई वाहनांसंबंधी चर्चेला उत्तर
देत होते. ई वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचं काम सुरू असून, या ठिकाणी येणारी
सगळी वाहनं, हरित ऊर्जेवर चार्ज केली जाणार असल्याची माहिती ठाकरे यांनी दिली.
****
विधानसभेच्या अध्यक्षांची निवड विधिमंडळाच्या हिवाळी
अधिवेशनातच होईल, आणि अध्यक्ष काँग्रेसचाच होईल,
असं प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. ते काल
मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेसाठी तीन दिवसांची
कालावधी लागतो. कोरोनामुळे, आतापर्यंत झालेल्या अधिवेशनाचा
कालावधी कमी होता, त्यामुळे अध्यक्षाची निवड आतापर्यंत झाली
नाही, असा खुलासा पटोले यांनी केला. हिवाळी अधिवेशनात आवाजी
मतदानानं ही निवड होईल, असं त्यांनी सांगितलं.
****
राज्य परिवहन महामंडळ- एसटी कर्मचाऱ्यांना
दिलेली पगारवाढ कायमस्वरुपी असून, याबाबत अफवांवर विश्वास ठेवू नये, असं परिवहन मंत्री
अनिल परब यांनी सांगितलं आहे, ते काल मुंबईत एसटी संपासंदर्भात झालेल्या बैठकीनंतर
पत्रकार परिषदेत बोलत होते. एसटीचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट
असल्यानं, राज्यसरकार सध्या त्याबाबत निर्णय घेऊ शकत नसल्याचं, परब यांनी सांगितलं.
कामगारांनी सर्वसामान्य जनतेला वेठीस न धरता, संप मागे घेत तत्काळ कामावर रुजू व्हावं,
अन्यथा अत्यावश्यक सेवा कायदा मेस्मा अंतर्गत संपकऱ्यांविरोधात
कठोर कारवाईचा इशारा परब यांनी दिला. सध्या सुमारे साडे बाराशे
गाड्यांची वाहतूक सुरू झाली असून १९ हजार कर्मचारी कामावर परतले आहेत. एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा काल ३७ वा दिवस होता.
दरम्यान,
आपल्या मागण्यांसाठी नांदेड इथं उपोषणास बसलेले एस टी वाहक दिलीप
वीर हे काल अत्यवस्थ झाले. त्यांना उपचारासाठी रूग्णालयात
दाखल केलं असतां, त्यांचं निधन झाल्याचं सांगण्यात आलं. दरम्यान, चार उपोषणार्थींना देखील काल रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
****
भारत
आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या दोन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत कालपासून
मुंबईत सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात, भारतानं दमदार सुरवात केली. प्रथम फलंदाजी
करत भारतीय संघानं काल २२१ धावा केल्या. कालचा खेळ थांबला तेव्हा सलामीवीर मयांक अग्रवाल
१२० धावांवर, तर वृद्धिमान साहा २५ धावांवर खेळत होते. कर्णधार विराट कोहली आणि अनुभवी
फलंदाज चेतेश्वर पुजारा शून्यावर बाद झाले. शुभमन गिलनं ४४ तर पहिल्या कसोटीत शतक झळकावलेल्या
श्रेयस अय्यरने १८ धावा केल्या.
****
जागतिक दिव्यांग दिनाचं
औचित्य साधून उस्मानाबाद नगर परिषदेच्या वतीनं उस्मानाबाद शहरातील नोंदणीकृत
दिव्यांग बांधवांसाठी, २२ लाख ९० हजार रुपयांच्या निधीचं, काल नगराध्यक्ष
मकरंद राजेनिंबाळकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं. शहरातील ४५८ नोंदणीकृत दिव्यांग लाभार्थ्यांना व्यवसायासाठी प्रत्येकी पाच हजार रुपये धनादेशाद्वारे बँक
खात्यात जमा करण्यात आले.
दरम्यान, २०२१ च्या खरीप हंगामात उस्मानाबाद
जिल्ह्यातल्या पिकांचं नुकसान झालेल्या शेतकर्यांच्या खात्यावर, येत्या सोमवारपासून पिक विमा जमा होणार आहे. आमदार
राणा जगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली.
****
परभणी
तालुक्यात जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत जनावरे वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना,
शासनाच्या वतीने ११ लाख ८८ हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. या नुकसान
भरपाईचे धनादेश काल आमदार डॉ राहुल पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
****
ज्या
शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे, असे शेतकरी उन्हाळी हंगामात थोड्या क्षेत्रावर बीजोत्पादन
करून घरच्या घरी दर्जेदार बियाणे तयार करू शकतात, असं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे
कुलगुरू डॉ.अशोक ढवण यांनी म्हटलं आहे. विद्यापीठात काल उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन
या विषयावर ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत राज्यभरातील एक हजारापेक्षा
जास्त शेतकरी बांधव सहभागी झाले होते.
****
कृषी पंपांची वीज तोडणी तात्काळ थांबवावी आणि खंडीत केलेली वीज जोडणी तात्काळ पूर्ववत करून द्यावी, या मागणीसाठी, काल उस्मानाबाद इथं
भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली, वीज वितरण कंपनी कार्यालया समोर चक्काजाम
आंदोलन करण्यात आलं. यावेळी शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली.
आंदोलनात भाजप लोकप्रतिनिधींसह शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
वीज वितरणच्या मुख्य अभियंत्यांनी या आंदोलनाची
दखल घेत, कृषी पंपांची वीज तोडणी थांबवण्याचे आदेश दिले.
तसंच पीक विम्याची रक्कम उपलब्ध झाल्यानंतर, वीज बील भरण्याच्या अटीवर बंद केलेलं उपकेंद्र सुरु करण्याचं आश्वासनही, मुख्य
अभियंत्यांनी दिलं आहे.
****
निलंबित राशन दुकान पुन्हा सुरू करण्यासाठी तसंच परवाना नूतनीकरणासाठी, हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयातल्या पुरवठा विभागातल्या महसूल सहाय्यक
आणि शिपाई यांना, ३० हजार रुपये लाच घेताना काल रंगेहाथ पकडण्यात आलं. शंभूनाथ दुभळकर आणि
जमुनाबाई इसाये अशी या दोघांची नावं आहेत.
****
उस्मानाबाद इथं उद्या उस्मानाबादी शेळी महोत्सव आणि शेळी
विकास परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे.
या वेळी शेळीपालन, दुग्धविकास याविषयी पशुवैद्यक तज्ञांचं मार्गदर्शन होणार असून, या दरम्यान
शेळीपालनासंदर्भात लागणाऱ्या वस्तूंचे स्टॉल्स तसंच शेळीपालन व्यवसाय संबंधी विविध
माहिती देणारे स्टॉल्स लावण्यात येणार आहेत.
****
No comments:
Post a Comment