आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२५ डिसेंबर २०२१ सकाळी ११.०० वाजता
****
येशू ख्रिस्ताचा
जन्मदिवस अर्थात नाताळचा सण आज सर्वत्र उत्साहात साजरा केला जात आहे. रात्रीच्या ख्रिस्त
जन्मानंतर आज सकाळी चर्चमध्ये प्रार्थना घेऊन हा आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी जनतेला नातळच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आनंद आणि उत्सवाचं हे पर्व
साजरं करताना जगावर आलेल्या कोरोना संकटाचं भान राखावं असं आवाहन, मुख्यमंत्र्यांनी
केलं आहे.
****
माजी पंतप्रधान,
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९७व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात येत
आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र
मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह इतर मंत्र्यांनी, अटल बिहारी वाजपेयी यांच्या
दिल्लीतल्या सदैव अटल स्मृतीस्थळावर पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. भजन, प्रार्थना
सभेनं अटलजींना आदरांजली वाहण्यात येत आहे.
****
वाळवलेली आणि
पॉलिश केलेली हळद शेतीमाल होऊ शकत नाही, त्यामुळे या हळदीवर आणि अडतदाराच्या दलालीवर
पाच टक्के जीएसटी आकारायचा निर्णय, महाराष्ट्र अग्रीम अधिनिर्णय प्राधिकरणानं घेतला
आहे. या प्रकरणी सांगली इथल्या एका नोंदणीकृत आडत्यानं याचिका दाखल केली होती.
****
शिक्षक पात्रता
परीक्षा घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपे
यांच्या नातेवाईकांनी काल पुणे सायबर विभागाकडे ३३ लाख रुपये जमा केले. या प्रकरणी
पोलिसांनी आतापर्यंत चार कोटी रुपये जप्त केले आहेत.
****
परभणी जिल्ह्यात
वालूर महसूल मंडळातल्या २१ गावांना, नुकसानीचे पंचनामे झाले असतानाही केवळ तांत्रिक
चुकीमुळे या अनुदान प्रक्रियेतून वगळण्यात आलं आहे. या गावांना तातडीनं अनुदान जाहीर
करावं या मागणीसाठी सेलूत काल रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं.
****
जालना जिल्ह्यातल्या
कोळवाडी दरेगाव ग्रामपंचायतीतला ग्रामसेवक सुनील जोशी याला सहा हजार रुपये लाच घेताना
रंगेहाथ अटक करण्यात आली. घराच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून दुरुस्ती करण्यासाठी
त्यानं ही लाच मागितली होती.
****
No comments:
Post a Comment