Saturday, 1 January 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 01.01.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 JANUARY 2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०१ जानेवारी २०२ सायंकाळी ६.१०

****

कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देश दीडशे कोटी मात्रांच्या दिशेनं वाटचाल करत आहे. कोरोना विषाणूचा ओ-मायक्रॉन हा नवा प्रकार आढळून आल्यानं, चिंता वाढली आहे. सर्वांना आवाहन आहे की, लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्या, तसंच ज्यांनी अद्याप लस घेतली नाही, त्यांना लस घेण्यासाठी सहकार्य करा. आपली आणि आसपासच्या सर्वांची काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड 19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत देशभरातल्या शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दहावा हप्ता वितरित.

·      राज्यात कोविड बाधितांची संख्या वाढत राहिल्यास कठोर निर्बंध लागू करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे संकेत.

·      एसटीच्या निलंबित कर्मचाऱ्यांवर पुढची कारवाई सुरू झाल्यानं, त्यांना कामावर रुजू होता येणार नसल्याचं महामंडळाकडून स्पष्ट.

आणि

·      औरंगाबाद इथं घाटी रुग्णालयातले निवासी डॉक्टर आजपासून संपावर.

****

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत देशभरातल्या शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दहावा हप्ता आज वितरित करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून १० कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा निधी वर्ग केला. या हप्त्यासाठी २० हजार कोटी पेक्षा जास्त रक्कम जमा करण्यात आली. या योजनेत आजवर १ लाख ८० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. यातून शेतकऱ्यांना शेतीसाठी गुणवत्तापूर्ण बियाणं आणि खतं विकत घेणं शक्य झाल्याचं पंतप्रधान म्हणाले. लाभार्थी शेतकऱ्यांशी ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते. पंतप्रधानांनी आज ३५१ ई-पी-एफ-ओ इक्विटी अनुदानही जारी केलं. १ लाख २४ हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ होईल. एफपीओ मुळे शेतकरी एकट्यानं नाही तर एकत्रित काम करू लागले आहेत. देशाचा अन्नदाता हा उर्जादाता व्हावा हे केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. यासाठी सरकार शेतकऱ्यांना सौर उर्जा निर्मितीसाठी मदत करत असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या ७ वर्षात सरकारनं नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन दिल्यामुळे शेतकऱ्यांना हानीकारक रसायनांपासून सुटका मिळाल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं.

****

राज्यात कोविड बाधितांची संख्या वाढत राहिली, तर राज्य सरकार अधिक कठोर निर्बंध लागू करू शकतं, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. सरकारनं कोविड संसर्ग रोखण्यासाठी तयारी जारी केलेली नियमावली कालपासून लागू झाली असून, लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी देखील नियमांचं पालन करावं, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे. राज्य सरकारमधले दहा मंत्री आणि २० आमदारांना कोरोना विषाणूची लागण झाली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली.

****

कोविडच्या तिसऱ्या लाटेबद्दल नागरिकांनी गाफील राहू नये तसंच ओमायक्रॉन हा कोरोनाचा नवा प्रकार कमी घातक असेल अशा गैरसमजातून कोविड-प्रतिबंधक संरक्षणामध्ये हलगर्जीपणा करू नये असं राज्याचे अतिरिक्त मुख्य आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी म्हटलं आहे. ओमायक्रॉन हा विषाणू लसीकरण न झालेले आणि सह-व्याधी असलेल्यांसाठी तेवढाच घातक असल्यानं नागरिकांनी लवकरात लवकर आपलं लसीकरण करून घ्यावं असं आवाहन त्यांनी केलं आहे.

****

एसटीच्या निलंबित कर्मचाऱ्यांवर पुढची कारवाई सुरू करण्यात आल्यानं, त्यांना आता कामावर रुजू होता येणार नाही, असं एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितलं आहे. विलिनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या ७० दिवसांपासून कर्मचारी संपावर आहेत. या कर्मचाऱ्यांना वारंवार सूचना देऊनही ते कामावर रुजू झाले नसल्याचं सांगण्यात येत आहे. दुसरीकडे आगार प्रमुखच रुजू करून घेत नसल्याचा आरोप कर्मचारी करत आहेत. औरंगाबाद विभागातल्या निलंबित कर्मचाऱ्यानं याबाबत अधिक माहिती देतांना, मध्यवर्ती कार्यालयाकडून याबाबतची सूचना नसल्याचे सांगत आगार प्रमुखांनी रुजू करून घेण्यास नकार दिल्याचं सांगितलं. एसटीच्या संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी ११ हजार आठ कर्मचाऱ्यांना आतापर्यंत निलंबित करण्यात आलं असून, ७८३ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. दोन हजार ४७ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

****

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कोरेगाव भीमा इथल्या ऐतिहासिक जयस्तंभास अभिवादन केलं. महाराष्ट्राचा आणि त्याचप्रमाणे कोरेगाव भीमा इथला इतिहास त्यागाचा, शौर्याचा आणि पराक्रमाचा आहे असं ते यावेळी म्हणाले. यावेळी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, पर्यावरण आणि वातावरणीय बदल राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार डॉ. अमोल कोल्हे उपस्थित होते. या स्मारकाचा विकास करण्यासाठी जागा संपादित करणं, तसंच चांगल्या प्रकारच्या सुविधा देण्यास शासनाचं प्राधान्य राहील असं उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

****

राज्य सरकारनं भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेला येत्या ३१ जानेवारी २०२२ पर्यंत मुतदवाढ दिली आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतवाढीचा लाभ घेऊन वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन त्यांनी केलं आहे.

****

औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय - घाटीतील निवासी डॉक्टरांनी आजपासून संप पुकारला आहे. निवासी डॉक्टरांची संघटना मार्डच्या पदधिकाऱ्यांनी आज घाटी परिसरात घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केलं. आजपासून अत्यावश्यक सेवा वगळता बाह्यरुग्ण विभाग - ओपीडी, आणि इतर विभाग बंद राहणार असल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं. गेल्या मार्च महिन्यात होणं अपेक्षित असलेली, वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET PG काऊन्सेलिंग २०२१ अजूनही झालेली नाही. इ डब्ल्यू एस आणि ओबीसी यांच्या न्यायालयीन वादात ही प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगानं राज्य शासनानं वैद्यकीय पदवी - एमबीबीएस उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सेवेत रुजू करुन घ्यावं, अशी मागणी आंदोलनकर्त्या डॉक्टरांनी केली आहे.

****

जालना जिल्ह्यात आज पाच नवीन, तर परभणी जिल्ह्यात आज कोविड संसर्ग झालेले नवे दहा रुग्ण आढळले. जालना जिल्ह्यात सध्या २३ बाधित रुग्णांवर तर परभणी जिल्ह्यात सध्या ३६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

लातूर शहरात प्रभागनिहाय संजय गांधी निराधार योजना समाधान शिबिरांचं आयोजन करण्यात येत आहे. कोरोना विषयक नियमांचं पालन करत आज सकाळी शहरातल्या प्रभाग क्रमांक १५ मध्ये आयोजित या समाधान शिबिराचं उद्घाटन लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं. तहसील आपल्या दारी अंतर्गत प्रत्येकाच्या घरापर्यंत जाऊन या योजनेचा लाभ देण्यात येत आहे.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 21.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 21 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...