Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 05 June 2023
Time
18.10 to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– ०५ जून २०२३ सायंकाळी ६.१०
****
· राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार
राज्य शैक्षणिक आराखडा निर्मितीसाठी सुकाणू समितीची नियुक्ती.
· ज्येष्ठ अभिनेते गुफी पेंटल
यांचं प्रदीर्घ आजाराने निधन.
· जागतिक पर्यावरण दिन आज सर्वत्र
विविध उपक्रमांनी साजरा.
आणि
· जालना कृषी उत्पन्न बाजार
समितीत हरभरा खरेदी केंद्राला आग लागून मोठं नुकसान.
****
राष्ट्रीय
शैक्षणिक धोरण २०२२ नुसार शैक्षणिक घटकांचा आढावा घेऊन राज्य शैक्षणिक आराखडा निर्मितीसाठी
सुकाणू समिती नियुक्त करण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाने समिती स्थापनेबाबतचा
शासन निर्णय प्रसिद्ध केला असून या समितीत ३२ सदस्यांचा समावेश आहे. येत्या काळात शालेय
शिक्षणासाठीचा अंतिम आराखडा, शिक्षक शिक्षण आणि प्रौढ शिक्षण आराखडाही प्रसिद्ध करण्यात
येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
छत्रपती
शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त राज्य सरकार विशेष टपाल
तिकीट प्रकाशित करणार आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते उद्या मुंबईत राजभवन इथं
या तिकिटाचं प्रकाशन होणार आहे.
****
किल्ले
रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान मृत्यू पावलेल्या दोन शिवभक्तांच्या मृत्यूची
सखोल चौकशी महाडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत केली जाणार आहे. रायगडचे जिल्हाधिकारी
डॉक्टर योगेश म्हसे यांनी हे आदेश दिले. संबंधित अधिकाऱ्यांना चौकशी करून पंधरा दिवसात
अहवाल सादर करण्यास त्यांनी सांगितलं आहे.
****
राज्यातील
सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग क्षेत्रासाठी विविध उपक्रम राबवण्यासाठी स्वतंत्र सचिव
देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि
मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी ही माहिती दिली. ते आज मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात
झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक झाली.
महाराष्ट्रात अन्य राज्यांच्या तुलनेत सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग क्षेत्रात अधिक उत्पादन
व्हावं, देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात राज्याचा हिस्सा वाढावा यासाठी, या बैठकीत
धोरणात्मक निर्णय घेण्यात आल्याचं, राणे यांनी सांगितलं.
****
ज्येष्ठ
अभिनेते तसंच सहायक दिग्दर्शक गुफी पेंटल यांचं आज मुंबईत प्रदीर्घ आजाराने निधन झालं,
ते ७८ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून अंधेरी इथल्या रुग्णालयात त्यांच्यावर
उपचार सुरू होते. सरबजीतसिंह पेंटल असं मूळ नाव असलेले गुफी पेंटल यांनी १९७५ मध्ये
रफू चक्कर या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. ऐंशीच्या दशकात अनेक चित्रपट आणि
मालिकांमधून त्यांनी भूमिका साकारल्या. अनेक चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही
त्यांनी काम केलं होतं. दूरदर्शनच्या महाभारत या लोकप्रिय मालिकेत शकुनी मामा ही त्यांनी
साकारलेली भूमिका रसिकांच्या आजही स्मरणात आहे.
****
ज्येष्ठ
अभिनेत्री सुलोचना यांच्या पार्थिव देहावर मुंबईत शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय
इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी आज सुलोचना दीदी यांच्या निवासस्थानी त्यांचं अंत्यदर्शन घेऊन
श्रद्धांजली अर्पण केली. सुलोचना यांचं काल मुंबईत वृद्धापकाळानं निधन झालं, त्या ९४
वर्षांच्या होत्या.
****
कांद्याचे
भाव सावरण्याच्या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यात येवला इथं आज शेतकरी प्रहार संघटनेच्या
वतीनं मुंडन आंदोलन करण्यात आलं. संघटनेचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन यांच्या नेतृत्वात
उपविभागीय कार्यालयासमोर, कार्यकर्त्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून घोषणाबाजी
केली, त्यानंतर मुंडन करत आंदोलन केलं. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा,
कांदा उत्पादकांना संरक्षण द्यावं, निर्यातमूल्य कमी करावं अशा विविध मागण्या यावेळी
करण्यात आल्या.
****
बहुचर्चित
चेन्नई सुरत ग्रीनफील्ड हायवे- हरित महामार्गाचं काम अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांनी
बंद पाडलं. बाधित शेतीच्या मोबदल्यात अत्यल्प मोबदला जाहीर करून स्थानिकांना कल्पना
न देता या प्रकल्पाचे काम सुरू असल्याची तक्रार या शेतकऱ्यांनी केली. या महामार्गासाठी
बाधित शेतीच्या मोबदल्यात चार लाख रुपयांपासून सात लाख रुपयांपर्यंत भरपाई शासनानं
जाहीर केली आहे, मात्र ही भरपाई बाधित शेतकऱ्यांना मंजूर नसल्याचं, याबाबतच्या वृत्तात
म्हटलं आहे.
****
प्रसार
भारतीच्या वतीनं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाअंतर्गत, परभणी,
नांदेड, लातूर, बीड, मुंबई, रत्नागिरी आणि सांगली या जिल्ह्यांसाठी, कंत्राटी तत्वावर
अर्धवेळ वार्ताहर नियुक्तीसाठी अर्ज मागवले आहेत. २४ ते ४५ वयोगटातले पात्र उमेदवार
यासाठी आपले अर्ज सादर करू शकतील. यासाठीची पात्रता, अर्जाचा नमुना तसंच इतर माहिती,
प्रसार भारती डॉट जीओव्ही डॉट इन स्लॅश पी बी व्हॅकेन्सिंज, या संकेतस्थळावर उपलब्ध
आहे. इच्छुकांना, एअर न्यूज पॅनल ट्वेंटी ट्वेंटी टू अॅट जीमेल डॉट कॉम, या ईमेल आयडीवर
आपले अर्ज पाठवता येतील.
****
जागतिक
पर्यावरण दिन आज सर्वत्र विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
औरंगाबाद
इथं सिडको इथल्या बाळासाहेब ठाकरे स्मृतिवन आणि स्मारक परिसरात वृक्षारोपण करण्यात
आलं. सहकार मंत्री अतुल सावे, महापालिका प्रशासक जी.श्रीकांत, वृक्षारोपणासाठी कार्य
करणाऱ्या जनसहयोग संस्थेचे पदाधिकारी आणि नागरिक यावेळी उपस्थित होते. पर्यावरण प्रेमी
नागरिकांनी पुढे येऊन औरंगाबाद शहर प्रदुषण मुक्त राहण्यासाठी सतत प्रयत्नशील राहण्याचं
आवाहन, सावे यांनी यावेळी केलं. उपस्थित सर्वांनी यावेळी पर्यावरण संवर्धन आणि वृक्षलागवडीची
शपथ घेतली. विटखेडा परिसरात माजी महापौर नंदकुमार घोडेले आणि इतर मान्यवरच्या हस्ते
वृक्षारोपण करण्यात आलं. आज या परिसरात शंभर रोपं लावण्यात आली असून एक हजार झाडे लावण्याचा
संकल्प विटखेडा वॉर्डातील नागरिकांच्या वतीने यावेळी करण्यात आला.
****
लातूर
जिल्ह्यात ‘हर घर नर्सरी’ उपक्रमाअंतर्गत सर्व नगरपालिकांमध्ये रोपवाटीकांचं नियोजन
करण्यात आलं आहे. त्यासाठी आज सलग दुसऱ्यांदा दुर्मिळ वृक्ष असलेल्या पट्ट्यात जाऊन,
विविध वृक्षांचं बीज संकलन करण्यात आलं. लातूर जिल्हा प्रशासन, सह्याद्री देवरा, द
संस्कृती फाउंडेशन, लातूर वृक्ष चळवळ यांच्या सक्रिय सहभागानं ही मोहिम राबवण्यात आली.
यावेळी आपटा, बेहडा, बहावा, अर्जुन, पळस अशा अनेक वृक्षांचं बीज संकलन करण्यात आलं.
****
वातावरणातील
बदलामुळे कृषी उत्पादनावर होणाऱ्या विपरित परिणामांवर उपाय शोधण्यासाठी कृषी विद्यापीठांनी
पुढाकार घेऊन संशोधन करण्याचं आवाहन, वसंतराव ऩाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातले अधिष्ठाता,
डॉ. धर्मराज गोखले यांनी केलं आहे. ते आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विशेष प्रचार
कार्यक्रमात बोलत होते. प्लास्टिकच्या वापरावर तसंच उत्पादनावर मर्यादा आणण्याची गरज
व्यक्त करुन, कृषी विद्यापीठात होत असलेल्या पर्यावरण अनुकूल कार्यक्रमाची माहिती डॉ.
गोखले दिली.
क्षेत्रीय
प्रचार अधिकारी माधव जायभाये यांनी यावेळी बोलताना, निसर्गाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी
मिशन लाईफचा उद्देश आत्मसात करण्याचं आवाहन केलं. शाहीर भारत मुंजे यांनी आपल्या सांस्कृतिक
कार्यक्रमातून पर्यावणाविषयी जऩजागृती केली. मान्यवरांच्या हस्ते निबंध आणि पोष्टर
स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा पारितोषिक प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
****
नाशिक
शहराजवळ चुंचाळे इथं पांजरापोळ या संस्थेला दिलेल्या जागेत अडीच हजार वृक्ष लावण्यात
आले. या ठिकाणी एकूण दहा हजार वृक्ष लागवडीचं उद्दीष्ट आहे. यासोबतच नंदिनी नदीकाठावर
देखील आज सकाळी वृक्षारोपण करण्यात आलं.
****
सोलापूर
इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात एकशे एक वृक्षांचे रोपण करण्यात आलं.
****
बुलडाणा
इथं जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सायकल रॅली काढण्यात आली होती. जिल्ह्यात खामगाव इथं
जनुना तलाव उद्यान परिसरात १०१ नारळ वृक्ष लागवडीचा प्रकल्प सुरु करण्यात आला.
****
जालना
कृषी उत्पन्न बाजार समितीमधील नाफेडच्या हरभरा खरेदी केंद्राला शार्ट सर्किटने भीषण
आग लागून मोठं नुकसान झालं, आज पहाटे ही घटना निदर्शनास आली. घटनेची माहिती मिळताच
अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवलं. या आगीमध्ये ५० क्विंटल
हरभरा, बारदान्याचे २१ गठ्ठे, फर्निचर, सीसीटीव्ही कॕमेरा, लॕपटॉॕप इत्यादी सामानाचं
नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
आषाढी
वारीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीचं आज मराठवाड्यात
हिंगोली जिल्ह्यातल्या वाढोणा गावात आगमन झालं. या पालखीत साडेसातशे वारकऱ्यांचा समावेश
आहे. पालखीच्या आगमनामुळे हिंगोली जिल्ह्यातही भक्तिमय वातावरण निर्माण झाल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment