आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०६ जून २०२३
सकाळी ११.०० वाजता
****
छत्रपती शिवाजी महाराजांचा तारखेनुसार
साडे तीनशेवा राज्याभिषेक सोहळा आज साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर स्वराज्याची राजधानी किल्ले
रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून, नागरीकांनी
मोठी गर्दी केली आहे. या गर्दीमुळे होणारा संभाव्य गोंधळ टाळण्यासाठी
गडाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. नाराज शिवभक्तांना उद्देशून
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतीक्षा करण्याचं आवाहन
केलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट संदेशाच्या
माध्यमातून शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पुण्यात लाल महालात संभाजी ब्रिगेडच्या
वतीने शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या
कार्यक्रमात उपस्थित आहेत.
****
भारतीय रिझर्व्ह बॅंकेची चलनविषयक धोरण
समितीची तीन दिवसीय बैठक आज मुंबईत सुरु होत आहे. या बैठकीनंतर परवा गुरुवारी द्वैमासिक पतधोरण
आढावा जाहीर केला जाईल.
****
अनधिकृत आणि अधिकृत धोकादायक इमारतींचा
पुर्नविकास करण्यासाठी आखलेल्या ठाण्यातल्या समूह विकास योजनेच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल झाला. सुमारे पंधराशे हेक्टर जमिनीवर वेगवेगळ्या टप्प्यात
हा प्रकल्प उभारण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात सुमारे दहा हजार घरांची निर्मिती होणार आहे.
****
बहुचर्चित चेन्नई सुरत ग्रीनफील्ड
हायवे- हरित महामार्गाचं
काम अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांनी काल बंद पाडलं. बाधित शेतीच्या मोबदल्यात अत्यल्प
मोबदला जाहीर करून स्थानिकांना कल्पना न देता या प्रकल्पाचे काम सुरू असल्याची तक्रार
या शेतकऱ्यांनी केली आहे.
****
दलित पँथरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमीत्त
रिपब्लिकन पक्षानं आज नागपुरात, विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय
अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले प्रमुख मार्गदर्शक म्हणून
उपस्थित राहणार आहेत. संघटनेत काम केलेल्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना
या कार्यक्रमात गौरवण्यात येणार आहे.
//*************//
No comments:
Post a Comment