Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 October
2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ ऑक्टोबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
· राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त
देशभरातून अभिवादन;स्वच्छता मोहीम राबवून राष्ट्रपुरुषांना आदरांजली
· पीक विम्याची २५ टक्के अग्रीम रक्कम दिवाळीच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा
करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न-कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची ग्वाही
· हैदराबादला विक्रीसाठी जाणारी सात पिस्तुलं नांदेड पोलिसांकडून जप्त;चौघांना
अटक
आणि
· आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या स्टिपलचेस प्रकारात भारताला रौप्य आणि कांस्य
पदक
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान
लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू,
उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी आज दिल्लीत राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आणि विजय घाटावर लालबहादूर
शास्त्री यांच्या समाधीवर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
राज्यपाल रमेश बैस यांनी मुंबईत राजभवनात
इथं महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पांजली
वाहून अभिवादन केलं,
तसंच सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. यावेळी
राजभवन परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा या
शासकीय निवासस्थानी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार
अर्पण करून अभिवादन केलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही महात्मा
गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्धा इथं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं वास्तव्य
राहिलेल्या सेवाग्राम आश्रमाला भेट दिली आणि प्रार्थना केली.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता
आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंत्रालयात गांधीजी आणि शास्त्रीजी यांच्या
प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली.
****
केंद्रीय सुक्ष्म, लघु
आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते आज मुंबईत खादी आणि ग्रामोद्योग
विभागाच्या खादी महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. गांधीजींच्या विचारांची अंमलबजावणी
करण्याचे काम खादी आणि ग्रामोद्योग विभाग करत असल्याचं, राणे
यांनी नमूद केलं. देशाच्या अर्थव्यवस्थेत मुंबईचे योगदान ३४ टक्के आहे. यापुढील काळात
या योगदानात खादी आणि ग्रामोद्योग विभागाचाही मोठा वाटा असावा, अशी
अपेक्षा राणे यांनी व्यक्त केली.
****
छत्रपती संभाजीनगर इथं शहागंज परिसरात असलेल्या
गांधी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी आज सकाळपासूनच विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी
तसंच कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. केंद्रीय संचार ब्यूरोच्या वतीनं शहरातल्या
प्रोझोन मॉलमध्ये महात्मा गांधी यांच्या जीवन प्रवासावर आधारित चित्रांचं प्रदर्शन
भरवण्यात आलं. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते या चित्र प्रदर्शनाचं
उद्घाटन करण्यात आलं. महात्मा गांधीजींची शिकवण प्रत्येकानं आचरणात आणावी, असं
आवाहन कराड यांनी केलं. दोन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात शंभरहून अधिक चित्रांचा आणि
माहितीचा समावेश करण्यात आला आहे.
****
जालना महापालिकेत स्वच्छता विभागातील उत्कृष्ट
काम करणाऱ्या २२ महिला आणि पुरुष सफाई कामगारांचा आज गांधी जयंती निमित्त सत्कार करण्यात
आला. महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांच्या हस्ते पुष्पहार आणि प्रमाणपत्र
देऊन या कामगारांना सन्मानित करण्यात आलं.
****
नांदेड महानगरपालिकेच्या वतीनं गांधी जयंतीनिमित्त
स्वच्छता फेरी काढण्यात आली. मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी गांधीजी आणि
शास्त्रीजींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून गांधीजींच्या संदेशाचं वाचन केलं. तसंच
सर्व उपस्थितांना स्वच्छता शपथ दिली.
****
अहमदनगर जिल्ह्यात नेवासा इथं त्रिमूर्ती
शैक्षणिक संकुलात महात्मा गांधी जीवनदर्शन चित्र प्रदर्शन भरवण्यात आलं, संकुलातील
विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिकांचा या प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळत असून पहिल्या
दिवशी पाच हजारपेक्षाही जास्त नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली.
****
पीक विम्याची २५ टक्के अग्रीम दिवाळीच्या
आत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचं कृषीमंत्री
धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे. नागपूर जिल्ह्यात २३ सप्टेंबरला झालेल्या ढगफुटीसदृश्य
पावसात नुकसान झालेल्या शेतीची मुंडे यांनी आज पाहणी केली, त्यावेळी
ते बोलत होते. विविध गावांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान कृषीमंत्र्यांनी आपला ताफा अनेक
ठिकाणी थांबवून पहाणी केली तसंच भेटीसाठी आलेल्या शेतकरी बांधवांची निवेदनं स्वीकारून
शेतकऱ्यांना मदतीबाबत आश्वस्त केलं.
****
बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात जातनिहाय
जनगणना करावी आणि याचा कालबध्द कार्यक्रम महायुती सरकारने जाहीर करावा, अशी
आग्रही मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. काँग्रेसच्या
काळात २०११ साली जातनिहाय जनगणना झाली होती. या जनगणनेमध्ये संकलित केलेली माहिती उघड
करण्याची मागणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांतील
आरक्षण कायम राहावे म्हणून ही भूमिका त्यांनी मांडली, मात्र
त्यातही सरकार वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
****
नांदेड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या
पथकानं आज सात गावठी पिस्तूलासह ११६ जिवंत काडतुस हस्तगत केली. वाघी - नाळेश्वर रस्त्यावर
परिवहन कार्यालयाजवळ गावठी पिस्तूलांची खरेदी विक्री होत असल्याची माहिती मिळताच गुन्हे
शाखेच्या पथकानं याठिकाणी धाड टाकली. पिस्तुलांची खरेदी विक्री करणाऱ्या चौघांना अटक
करत, त्यांच्याकडून सात गावठी पिस्तूल आणि ११६ जिवंत काडतुसं असा तीन लाख तीन हजार रुपयांचा
मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही गावठी पिस्तूल हैद्राबाद इथं विक्रीसाठी नेत असल्याची
माहिती समोर आली आहे.
****
चीनमध्ये सुरु असलेल्या आशियायी क्रीडा स्पर्धेत
महिलांच्या स्टीपलचेस प्रकारात भारताच्या पारुल चौधरीने रौप्य
तर प्रितीने कांस्य पदक पटकावलं. स्पीड स्केटिंग प्रकारात महिला तसंच पुरुष संघांनी
कांस्य पदकं पटकावली. टेबल टेनिस मध्ये महिला दुहेरीत सुतीर्था मुखर्जी आणि अयहिका
मुखर्जी जोडीचा उपांत्य फेरीत पराभव झाल्यानं, कांस्यपदकावर
समाधान मानावं लागलं.
पदकतालिकेत १३ सुवर्ण, २२
रौप्य तसंच २३ कांस्यपदकं जिंकून भारत सध्या चौथ्या स्थानावर कायम आहे.
दरम्यान, या स्पर्धेत काल बीडच्या
अविनाश साबळेनं तीन हजार मीटर स्टीपलचेस स्पर्धा प्रकारात सुवर्ण पदक मिळवल्याबद्दल
बीडच्या खासदार डॉ.प्रीतम मुंडे, कृषिमंत्री धनंजय मुंडे, माजी
मंत्री जयदत्त क्षीरसागर,
आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी
दीपा मुधोळ-मुंडे,
जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख यांनी अविनाशचं अभिनंदन
केलं आहे. अविनाशच्या या कामगिरीबद्दल त्याचे वडील मुकुंद साबळे आणि आई वैशाली साबळे
यांनी या शब्दात आपला आनंद व्यक्त केला -
काल जी स्पर्धा झाली, त्या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक त्याने मिळवल्यामुळे
मला मोठा भरपूर आनंद वाटतो. आपल्या मुलाने अविनाशने देशात एकदम नाव उंचावले. अविनाशने
भरपूर कष्ट करुन या देशामध्ये नाव उंचावले, म्हणून खूप आनंद वाटतोय. भारताला सुवर्णपदक
मिळवून दिलंय त्यानी, त्याचा सगळ्यांना आनंद आहे.
****
मेरी माटी मेरा देश अंतर्गत नाशिक जिल्ह्यात
सुरगाणा इथं आज अमृत कलश यात्रा काढण्यात आली होती. या कलशातली माती दिल्लीतल्या अमृतवाटिकेत
नेली जाणार असल्यानं सर्वांना अभिमान वाटेल, असं मत केंद्रीय राज्यमंत्री
डॉ. भारती पवार यांनी यावेळी व्यक्त केलं.
दरम्यान, ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी
तालुक्यात राजनोली,
पिंपळघर, कोनगांव आणि पिंपलस या गावांतही अमृत कलश
यात्रा काढण्यात आली,
दोनशे पेक्षा अधिक नागरिक यात सहभागी झाले.
****
अमळनेर इथलं नियोजित ९७ व्या अखिल भारतीय
मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्राला दिशा देणारं ठरेल, असा
विश्वास राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केला आहे. जळगाव
जिल्ह्यात अमळनेर इथं आज या संमेलनाच्या बोधचिन्हाचं अनावरण झालं, त्यावेळी
पाटील बोलत होते. कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ
विजय माहेश्वरी,
यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
छत्रपती संभाजीनगर इथं महाराष्ट्र राज्य
प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीनं आज विविध मागण्यांसाठी महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
आपल्या विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं. शिक्षकांकडून
करून घेतली जाणारी अशैक्षणिक कामं बंद करावीत, शिक्षकांना मुख्यालयात राहण्यासंबंधीची
अट रद्द करण्यात यावी,
जुनी पेन्शन योजना लागू करावी, शाळांचे
खाजगीकरण करू नये यासाख्या विविध मागण्यांचा या निवेदनात समावेश आहे.
****
No comments:
Post a Comment