Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 October 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ ऑक्टोबर २०२३ सकाळी ७.१० मि.
****
· राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना देशभरात अभिवादन
· पीक विम्याची २५ टक्के अग्रीम दिवाळीच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न-कृषीमंत्री धनंजय मुंडे
· नांदेड शासकीय रुग्णालयातल्या मृत्यू प्रकरणी चौकशीसाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आज नांदेड दौऱ्यावर
आणि
· आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची काल तीन रौप्य आणि चार कांस्य पदकांची कमाई
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशभरात काल त्यांना अभिवादन करण्यात आलं. राज्यपाल रमेश बैस यांनी मुंबईत राजभवनात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून अभिवादन केलं, तसंच सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. राजभवन परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही गांधीजी आणि शास्त्रीजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्धा इथं गांधीजींचं वास्तव्य राहिलेल्या सेवाग्राम आश्रमाला भेट देऊन प्रार्थना केली.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंत्रालयात गांधीजी आणि शास्त्रीजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली.
****
केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते काल मुंबईत खादी आणि ग्रामोद्योग विभागाच्या खादी महोत्सवाचं उद्घाटन झालं. गांधीजींच्या विचारांची अंमलबजावणी करण्याचं काम खादी आणि ग्रामोद्योग विभाग करत असल्याचं, राणे यांनी नमूद केलं.
****
मराठवाड्यातही सर्वत्र गांधीजी आणि शास्त्रीजींना अभिवादन करण्यात आलं.
‘‘छत्रपती संभाजीनगर इथं शहागंज परिसरात असलेल्या गांधी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी, काल सकाळपासूनच विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. केंद्रीय संचार ब्यूरोच्या वतीनं शहरातल्या प्रोझोन मॉलमध्ये महात्मा गांधी यांच्या जीवन प्रवासावर आधारित चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. दोन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात शंभरहून अधिक चित्रांचा आणि माहितीचा समावेश करण्यात आला आहे. ’’
‘‘जालना महापालिकेतल्या स्वच्छता विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या २२ महिला आणि पुरुष सफाई कामगारांचा, काल गांधी जयंती निमित्त सत्कार करण्यात आला.’’
‘‘नांदेड महानगरपालिकेच्यावतीनं गांधीजयंतीनिमित्त स्वच्छता फेरी काढण्यात आली. मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी उपस्थितांना स्वच्छता शपथ दिली.’’
‘‘हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात गांधीजी आणि शास्त्रीजींना अभिवादन करण्यात आलं. नायब तहसिलदार डी. एस. जोशी, माहिती सहायक चंद्रकांत कारभारी यांच्यासह कार्यालय प्रमुख आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते.’’
****
पीक विम्याची २५ टक्के अग्रीम दिवाळीच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचं, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे. नागपूर जिल्ह्यात २३ सप्टेंबरला झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसात नुकसान झालेल्या शेतीची, काल पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. विविध गावांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान कृषीमंत्र्यांनी आपला ताफा अनेक ठिकाणी थांबवून पहाणी केली, तसंच भेटीसाठी आलेल्या शेतकरी बांधवांची निवेदनं स्वीकारून शेतकऱ्यांना मदतीबाबत आश्वस्त केलं.
****
बिहार राज्यसरकारने केलेल्या जातनिहाय सर्वेक्षणाचा अहवाल काल प्रसिद्ध झाला. बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करावी आणि याचा कालबध्द कार्यक्रम महायुती सरकारने जाहीर करावा, अशी आग्रही मागणी, विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
****
नांदेड इथल्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात ३० सप्टेंबर ते एक ऑक्टोबर या सुमारे चोवीस तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये १२ प्रौढ रुग्णतर बारा नवजात अर्भकं होती. प्रौढ रुग्णामध्ये चौघांना हृदयविकार, एक रुग्ण विषबाधा, एक रुग्ण जठरव्याधी, दोन रुग्ण मूत्रपिंड व्याधी, एक प्रसूती गुंतागुंत, तीन रुग्ण अपघात आणि इतर आजार तर चार अर्भकं अंतिम अवस्थेत खाजगी रुग्णालयातून शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आल्याचं, रुग्णालय प्रशासनाने कळवलं आहे.
रुग्णालयात अत्यावश्यक औषध साठा उपलब्ध असून, डॉक्टरांसह इतर कर्मचारी चांगल्या प्रकारे सेवा देत आहेत. मात्र, गेल्या दोन दिवसात अत्यवस्थ रुग्ण विशेषत: अंतिम अवस्थेतील रुग्ण मोठ्या प्रमाणावर दाखल झाल्याचं अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे यांनी सांगितलं. ते म्हणाले...
‘‘डॉक्टर्स वगैरे सर्व 24 तास कार्यरत आहेत. डॉक्टर्स आणि औषधाची कुठलीही कमतरता नसून, या सर्वांना शर्थीचे प्रयत्य करूनही त्यांचे मुळातच आजार हे गंभीर स्वरुपाचे असल्याने त्यांचे मृत्यू झाले आहेत.’’
डॉ. एस. आर. वाकोडे
खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी संदर्भात बोलताना, या ठिकाणी सहा जिल्ह्यातून दररोज दाखल होणाऱ्या अनेक गंभीर रुग्णांची संख्या पाहता तज्ज्ञ डॉक्टरांच्या सक्षम पथकासह दर्जा आणि सुविधांची वाढ होण्याची गरज व्यक्त केली आहे.
दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे आज नांदेडमध्ये येत आहेत. ते शासकीय रुग्णालयास भेट देऊन घटनेची माहिती घेणार आहेत.
****
छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं भारतात आणण्याबाबत, ब्रिटनच्या व्हिक्टोरिया अँड अलबर्ट संग्रहालयासोबत सामंजस्य करार केला जाणार आहे. या करारावर स्वाक्षरी करण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार काल लंडनला रवाना झाले. आज या करारावर स्वाक्षरी होणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने काल तीन रौप्य आणि चार कांस्य पदकांची कमाई केली. पदकतालिकेत १३ सुवर्ण, २४ रौप्य आणि २३ कांस्य पदकांसह एकूण ६० पदकांसह भारत सध्या चौथ्या स्थानावर कायम आहे.
‘‘महिलांच्या स्टिपलचेस प्रकारात भारताच्या पारुल चौधरीने रौप्यपदक तर प्रितीने कांस्य पदक पटकावलं. स्पीड स्केटिंग प्रकारात महिला तसंच पुरुष संघांनी कांस्य पदकं पटकावली. टेबल टेनिस मध्ये महिला दुहेरीत सुतीर्था मुखर्जी आणि अयहिका मुखर्जी जोडीचा उपांत्य फेरीत पराभव झाल्यानं, कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. महिलांच्या लांब उडी स्पर्धेत भारताच्या एडापल्ली एनसी सोजनने रौप्य पदक जिंकलं.’’
‘‘दरम्यान, या स्पर्धेत बीडच्या अविनाश साबळेनं तीन हजार मीटर स्टीपलचेस स्पर्धा प्रकारात सुवर्ण पदक मिळवल्याबद्दल, बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे, कृषिमंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख यांच्यासह अनेकांनी अविनाशचं अभिनंदन केलं आहे. अविनाशच्या या कामगिरीबद्दल त्याचे वडील मुकुंद साबळे आणि आई वैशाली साबळे यांनी या शब्दात आपला आनंद व्यक्त केला:’’
‘‘काल जी स्पर्धा झाली, त्या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक त्याने मिळवल्यामुळे मला मोठा भरपूर आनंद वाटतो. आपल्या मुलाने अविनाशने देशात एकदम नाव उंचावले. अविनाशने भरपूर कष्ट करुन या देशामध्ये नाव उंचावले, म्हणून खूप आनंद वाटतोय. भारताला सुवर्णपदक मिळवून दिलंय त्यानी, त्याचा सगळ्यांना आनंद आहे.’’
****
मेरी माटी मेरा देश अंतर्गत नाशिक जिल्ह्यात सुरगाणा इथं काल अमृत कलश यात्रा काढण्यात आली. या कलशातली माती दिल्लीतल्या अमृतवाटिकेत नेली जाणार असल्यानं सर्वांना अभिमान वाटेल, असं मत केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी यावेळी व्यक्त केलं.
दरम्यान, ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी तालुक्यात राजनोली, पिंपळघर, कोनगांव आणि पिंपलस या गावांतही अमृत कलश यात्रा काढण्यात आली, दोनशे पेक्षा अधिक नागरिक यात सहभागी झाले होते.
****
छत्रपती संभाजीनगर इथं महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीनं काल विविध मागण्यांसाठी महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला. आपल्या विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं. शिक्षकांकडून करून घेतली जाणारी अशैक्षणिक कामं बंद करावीत, शाळांचे खाजगीकरण करू नये यासाख्या विविध मागण्यांचा या निवेदनात समावेश आहे.
****
नांदेड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं काल सात गावठी पिस्तूलासह ११६ जिवंत काडतुस हस्तगत केली. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली, ही गावठी पिस्तूल हैद्राबाद इथं विक्रीसाठी नेत असल्याची माहिती समोर आली आहे.
****
नाशिक जिल्ह्यात सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव आजपासून पुन्हा सुरू होत आहेत. पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत काल झालेल्या बैठकीत, व्यापाऱ्यांच्या मागण्यांवर महिनाभरात निर्णय घेण्याचं आश्वासन भुसे यांनी दिलं, त्यानंतर व्यापाऱ्यांनी लिलाव बंद आंदोलन मागे घेतलं.
****
No comments:
Post a Comment