Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 04 June 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०४ जून २०२४ सायंकाळी ६.१०
****
· राष्ट्रीय लोकशाही आघाडी-एनडीएची २९० जागांसह बहुमताकडे वाटचाल-२३४ जागांवर इंडिया आघाडीचे उमेदवार पुढे.
· महाराष्ट्रातून अनिल देसाई, नारायण राणे, सुनील तटकरे, अनूप धोत्रे, श्रीरंग बारणे, स्मिता वाघ, हेमंत सावरा, तसंच गोवाल पाडवी विजयी.
· औरंगाबादहून संदिपान भुमरे यांना एक लाखावर तर बीडमधून पंकजा मुंडेंना २२ हजार मतांची आघाडी-जालन्यातून रावसाहेब दानवे पिछाडीवर.
आणि
· देशात परिवर्तनाची लाट आल्याची प्रतिक्रिया महाविकास आघाडीकडून व्यक्त.
****
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार राष्ट्रीय लोकशाही आघाडी-एनडीएची बहुमताकडे वाटचाल दिसून येत आहे. त्यांना जवळपास २९० जागांवर आघाडी मिळाली आहे. तर २३४ जागांवर इंडिया आघाडीचे उमेदवार आघाडीवर दिसून येत आहेत.
एकूण ५४३ जागांपैकी भारतीय जनता पक्षानं १७, काँग्रेसनं चार, जनता दलानं दोन, तर शिवसेना ठाकरे गट, आम आदमी पक्ष आणि हिंदुस्थानी आवाम मोर्चानं प्रत्येकी एक जागा जिंकली आहे.
भाजपनं २२७ जागांवर आघाडी मिळवली असून, सर्वात मोठा पक्ष ठरण्याकडे भाजपची वाटचाल सुरू आहे. काँग्रेस ९४ जगांवर आघाडीवर असून, इतर पक्षांचे उमेदवार १८ जागांवर आघाडीवर आहेत.
****
महाराष्ट्रातल्या ४८ जागांपैकी काँग्रेस सर्वाधिक १२ जागांवर आघाडीवर आहे. भाजप ११, शिवसेना ठाकरे गट दहा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सात, शिवसेना सहा, तर राष्ट्रवादी काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे.
****
दक्षिण मध्य मुंबईतून महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल देसाई ५३ हजार ३८४ मतांनी विजयी झाले.
****
जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपच्या स्मिता वाघ विजयी झाल्या आहेत. निवडणूक आयोगाकडून स्मिता वाघ यांच्या विजयाची औपचारिक घोषणा होणं बाकी आहे.
****
रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपचे नारायण राणे विजयी झाले आहेत. मतमोजणीच्या एकूण २४ फेऱ्या झाल्यानंतर राणे यांच्याकडे जवळपास ४० हजार मतांची आघाडी आहे.
****
पालघर मध्ये भाजपचे हेमंत सावरा एक लाख ८३ हजार ३८६ मतांनी विजयी झाले. मतमोजणीच्या एकूण २९ फेऱ्याअंती सावरा यांना सहा लाख २०८ मतं मिळाली.
****
नंदुरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे गोवाल पाडवी एक लाख ५९ हजार १२० मतांनी विजयी झाले. पाडवी यांना सात लाख ४५ हजार ९९८, तर भाजपच्या हिना गावित यांना पाच लाख ८६ हजार ८७८ मतं मिळाली.
****
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे संदीपान भुमरे एक लाखांहून अधिक मताधिक्यानं आघाडीवर आहेत. भुमरे यांना आतापर्यंत तीन लाख ४४ हजार ६२३, एमआयएमचे सय्यद इम्तियाज जलिल यांना दोन लाख ६२ हजार ९०६, तर महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे यांना दोन लाख १४ हजार १९७ मतं मिळाली आहेत.
****
बीड लोकसभा मतदारसंघात २५व्या फेरीअंती महायुतीच्या पंकजा मुंडे २२ हजार ५२१ मतांनी आघाडीवर आहेत. आतापर्यंत मुंडे यांना पाच लाख ९७ हजार ७९३, तर महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे यांना पाच लाख ६७ हजार ३२२ मतं मिळाली.
****
जालना लोकसभा मतदार संघात आतापर्यंत प्राप्त आकडेवारीनुसार महायुतीचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांनी ६० हजारांहून अधिक मतांची निर्णायक आघाडी घेतली आहे. काळे यांना आतापर्यंत चार लाख ३२ हजार ३३२, तर भाजपाचे रावसाहेब दानवे यांना तीन लाख ७१ हजार ७७६ मतं मिळाली.
****
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात मतमोजणीच्या २० व्या फेरीनंतर महाविकास आघाडीचे ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना दोन लाख ५७ हजार मतांची आघाडी मिळवली आहे.
****
परभणी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे संजय जाधव ६२ हजार ४४४ मतांनी आघाडीवर आहेत. जाधव यांना आतापर्यंत दोन लाख १९ हजार ९०, तर महायुतीचे महादेव जानकर यांना एक लाख ५६ हजार ६४६ मतं मिळाली आहेत.
परभणीच्या मतदारांनी जातीवाद करणाऱ्यांना नाकारल्याची प्रतिक्रिया संजय जाधव यांनी दिली आहे -
ह्या विजयाचं श्रेय माझ्या मतदारसंघातील सर्व मतदारांना. ज्यांनी ज्यांनी जातीयवाद केला, त्यांना जनतेनं नाकारलं. त्यामुळे जातीयवादावर आणि धर्माच्या नावावर एखादेवेळेस ठीक होतं, पूर्वीच्या काळात. पण आता जातीपातीच्या नावावर राजकारण करून मतं मिळवत नसतात. सर्वसमावेशक असंच राजकारण करावं लागतं ज्यांना निवडणुका लढायच्या आहेत, जिंकायच्या आहेत, त्यांनी सगळ्यांना घेऊनच चालायची भूमिका ठेवली पाहिजे. जातीच्या नावावर मतं मागितल्यानंतर जसं आज पराभवाला सामोरं जावं लागलं, त्यांना तशाच पद्धतीची भूमिका मतदार हा ठरवत असतो.
****
हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. आष्टीकर यांनी आकाशवाणी बोलतांना ही प्रतिक्रिया दिली.
हा विजय माझा नसून हा सर्वसामान्य माणसाचा विजय आहे. महाविकास आघाडीचा विजय आहे. या महाराष्ट्रामध्ये अतिशय संवेदनशील आणि आमचे कुटुंबप्रमुख उद्धवसाहेब, माननीय शरद पवार साहेब, काँग्रेसचे नेते सर्व मंडळीचा हा विजय आहे असं मी मानतो. हा शिवसेनेचा बालेकिल्लाच आहे. जनतेने खूप मनाभावतून मतदान केलेलं आहे. खूप विचारपूर्वक मतदान केलेलं आहे. आणि मी सर्व जनतेच्या समोर नतमस्तक होतो.
****
नागपूर लोकसभा मतदार संघात बाराव्या फेरीनंतर महायुतीचे नितीन गडकरी ७७ हजार ९५९ मतांनी आघाडीवर आहेत.
अकोला लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे अनुप धोत्रे ४० हजार १२ मतांनी विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे अभय पाटील, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांचा पराभव केला.
****
मावळ लोकसभा मतदारसंघात २२व्या फेरीअंती महायुतीचे श्रीरंग बारणे यांनी एक लाख ३१२ मतांची निर्णायक आघाडी घेतली आहे.
****
चंद्रपूर मतदारसंघात महाविकास आघाडीचे प्रतिभा धानोरकर यांनी एक लाख ६९ हजार ६४० मतांची आघाडी घेतली आहे. आतापर्यंत धानोरकर यांना चार लाख ५८ हजार ७०, तर भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांना दोन लाख ८८ हजार ४३० मतं मिळाली आहेत.
****
रायगड लोकसभा मतदार संघातून महायुतीचे सुनील तटकरे दुसऱ्यांदा विजयी झाले. त्यांनी महाविकास आघाडीचे अनंत गिते यांचा ८२ हजार ७८४ मतांनी पराभव केला. तटकरे यांना पाच लाख आठ हजार ३५२, तर गीते यांना चार लाख २५ हजार ५६८ मतं मिळाली.
****
मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे तिसर्यांदा विजयी झाले. बारणे यांना सहा लाख ९२ हजार १०१, तर महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे यांना पाच लाख ९५ हजार ५४२ मतं मिळाली.
****
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे शाहू महाराज छत्रपती यांनी विजयी आघाडी घेतली आहे. आतापर्यंत शाहू महाराजांना चार लाख २४ हजार २४९, तर महायुतीचे संजय मंडलिक यांना तीन लाख ३१ हजार ६५५ मतं मिळाली आहेत.
****
हातकणंगले मतदारसंघातही महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील आघाडीवर आहेत.
****
उत्तर मुंबईतून महायुतीचे पियुष गोयल, ईशान्य मुंबईतून महायुतीचे संजय दिना पाटील, वायव्य मुंबईतून महायुतीचे रविंद्र वायकर, दक्षिण मुंबईतून महाविकास आघाडीचे अरविंद सावंत आघाडीवर आहेत.
****
देशातल्या जनतेने विकासाला मतदान केलं असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यादा पंतप्रधान होत आहेत, त्यामुळे त्यांचं अभिनंदन करत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. काही जागा आमच्या कमी फरकाने गेल्या, काही ठिकाणी आम्ही उमेदवारी देण्यात उशीर केला, त्या सर्व बाबींची आम्ही कारणमीमांसा करू, असं मुख्यमंत्री म्हणाले.
ठाण्यात नरेश म्हस्के यांनी शिवसेनेचा गड राखला असून, महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करत असल्याचंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीचा पराभव झालेला असून, मोदींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
मै दावे के साथ कहता हूं, मोदीजी की सरकार नही बनेगी। मोदीजी ने सबसे पहले इस्तिफा देना चाहिये। मोदी हार गये है। भारतीय जनता पार्टी हार गई है। आगे तोडफोड करके सरकार बनाने की कोशिश की तो जनता सडक पर उतरेगी। बीजेपी को बहुमत नही है, बीजेपी हार गई है।
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशभरात काढलेल्या भारत जोडो यात्रांमुळे देशात परिवर्तनाची लाट आल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले…
तानाशाह व्यवस्था को सत्ता से बाहर निकालने का जो मार्ग बनाया था, और उसका नेतृत्व हमारे नेता राहुल गांधीजी ने कन्याकुमारी से कश्मीर जो भारत जोडो यात्रा की थी, मणिपूर से मुंबई जो न्याय यात्रा की थी, और राहुल गांधीजी के नेतृत्व मे जो देश की जनता उनके साथ खडी हुई। और उसीका नतीजा है, की आज देश मे परिवर्तन की लहर आप देख रहे हो।
****
महाराष्ट्रात आणि देशात लागलेल्या निकालावरून परिवर्तनाची प्रक्रिया सुरु झाली असून, देश पातळीवरचं चित्र आशादायक असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. इंडिया आघाडीची बैठक उद्या दिल्लीमध्ये होणार असून, या बैठकीला आपण उपस्थित राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
No comments:
Post a Comment