Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 06 June 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ जून २०२४ सकाळी ७.१० मि.
****
· सतरावी लोकसभा राष्ट्रपतींकडून बरखास्त, नरेंद्र मोदी यांची सर्वानुमते एनडीएच्या नेतेपदी निवड
· इंडिया आघाडीच्या बैठकीत भाजप सरकारविरोधात लढा देण्याचा निर्णय
· लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीस यांचे राजीनाम्याचे संकेत
· जागतिक पर्यावरण दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा
आणि
· टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताची विजयी सलामी, आयर्लंडवर आठ गडी राखून विजय
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सतरावी लोकसभा बरखास्त केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं राष्ट्रपतींकडे कालच याबाबतची शिफारस केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राष्ट्रपतींची भेट घेऊन, मंत्रिमंडळासह आपला पंतप्रधानपदाचा राजीनामा सादर केला, नवीन सरकार स्थापन होईपर्यंत कामकाज सांभाळण्याची सूचना राष्ट्रपतींनी मोदी यांना केली आहे. राष्ट्रपतींनी केंद्रीय मंत्रिमंडळासाठी काल 'रात्रीभोज' आणि निरोप समारंभही ठेवला हाोता.
दरम्यान, दिल्ली इथं काल राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या घटकपक्षांची बैठक झाली. या बैठकीत नरेंद्र मोदी यांची सर्वानुमते एनडीएच्या नेतेपदी निवड करण्यात आली. या बैठकीत घटक पक्षांचे सर्व नेते सहभागी झाले होते, सर्व घटक पक्षांनी मोदी यांच्या नेतृत्वासाठी समर्थनपत्रं दिली. मोदी यांच्या विकसित भारतासाठीच्या कार्यात आपलंही योगदान असेल, असं या नेत्यांनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे या बैठकीला हजर होते. आपण काही मागण्यासाठी नव्हे, तर पंतप्रधानांना सरकार स्थापनेकरता पाठिंबा देण्यासाठी आलो असल्याचं, शिंदे यांनी सांगितलं.
****
काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीचीही काल दिल्लीत बैठक झाली. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह या आघाडीतल्या घटक पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर बोलतांना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकाजुर्न खरगे यांनी, निवडणुकीत मिळालेला जनादेश हा नरेंद्र मोदी आणि भाजपच्या विरोधात असल्याचं सांगत, मोदींच्या नेतृत्वातल्या भाजपच्या हुकूमशाही सरकारविरोधात इंडिया आघाडी सातत्याने लढा देईल, असं नमूद केलं. ते म्हणाले...
‘‘The people’s mandate has given a befitting reply to the BJP and their politics of hate, corruption and deprivation.’’
‘‘The INDIA Bloc will continue to fight against the fascist rule of the BJP led by Modi.’’
‘‘We will take appropriate steps at the appropriate time to realise the people's desire not to be ruled by the BJP govt.’’
****
लोकसभा निवडणुकीत राज्यात आलेल्या अपयशाची जबाबदारी स्वीकारत राज्य सरकारमधून बाहेर पडण्याचे संकेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. काल मुंबईत भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आपल्याला सरकारमधून मोकळं करावं, अशी मागणी आपण वरिष्ठांकडे करणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं, ते म्हणाले...
‘‘हा जो काही भारतीय जनता सेटबॅक महाराष्ट्रामध्ये सहन करावा लागला, याची सगळी जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस, मी या ठिकाणी सगळी स्वीकारतो. आणि मी पक्षाला एक विनंती अजून करणार आहे, की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ याठिकाणी उतरायचं आहे. त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाला ही विनंती करणार आहे, त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची संधी द्यावी. जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत, त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल.’’
या पत्रकार परिषदेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते, फडणवीसांनी सरकारमध्ये राहूनच पक्षासाठी काम करावं अशी विनंती करणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या संदर्भात बोलतांना, निवडणूक निकाल ही सामुहिक जबाबदारी असल्याचं सांगितलं. महायुतीला जागा अपेक्षेपेक्षा कमी मिळाल्या असल्या तरीही मतांची टक्केवारी कायम असल्याकडे आणि काही ठिकाणी ती वाढल्याकडे शिंदे यांनी लक्ष वेधलं...
‘‘ही जी कही जबाबदारी आहे, जे काही निकाल लागले, ती आमची सामूहिक जबाबदारी आहे. आम्ही टीम म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळे निवडणुकीमध्ये जागा आमच्या कमी झाल्या असल्या, तरी सुद्धा मतं जी आहेत ती intact राहिली आहेत. मतं काही ठिकाणी मुंबईत वाढलेली आहेत. आणि मूळ मतदार जो आहे, तो महायुतीबरोबर राहिला.’’
****
विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसनं रमेश कीर यांना उमेदवारी दिली असल्याची माहिती, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल दिली.
मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून दीपक सावंत यांनी काल उमेदवारी अर्ज भरला आहे. तर मुंबई शिक्षक मतदार संघासाठी भाजपने शिक्षक परिषदेचे उमेदवार शिवनाथ दराडे यांना पाठिंबा दिल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काल चार उमेदवारांनी सहा नामनिर्देशन पत्रं सादर केली. या जागेसाठी आतापर्यंत १९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
****
राज्यसभेचे सदस्य प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक घेण्याची सूचना राज्य विधीमंडळ सचिवालयानं जारी केली आहे. त्यानुसार उमेदवार अथवा त्याच्या सूचकाला १३ जून पर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार असून, आवश्यकता भासल्यास, येत्या २५ जून रोजी मतदान होणार आहे.
****
जागतिक पर्यावरण दिवस काल विविध कार्यक्रमांनी साजरा झाला.
मुंबईत काल एका विशेष कार्यक्रमात, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बांबू प्रक्रियेला उद्योगाचा दर्जा देण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले असून, आचारसंहिता संपल्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती दिली. कल्पवृक्ष बांबू पर्यावरण शाश्वतता परिषद २०२४ स्मरणिकेचं अनावरणही यावेळी करण्यात आलं. पर्यावरण संरक्षण आणि जनजागृतीबद्दल तज्ज्ञांनी यावेळी सादरीकरण केलं.
**
छत्रपती संभाजी नगर शहरातल्या विविध प्रशासकीय, सामाजिक, शैक्षणिक संस्थांच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. महानगरपालिकेच्या वतीने शहरातल्या रामनगर, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उद्यान, झोन क्रमांक सात सह विविध परिसरात सुमारे एक हजार वृक्षांची लागवड करण्यात आली.
**
प्रत्येकाने पर्यावरणपुरक जीवनशैली आत्मसात केल्यास पर्यावरणाचा ऱ्हास कमी होऊन निसर्गाचा समतोल कायम राखण्यास मदत होईल, असा विश्वास ‘आत्मा’ प्रकल्पाचे संचालक दौलतराव चव्हाण यांनी केलं आहे. परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यात पोहेटाकळी इथं काल विशेष प्रचार कार्यक्रम घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विद्यार्थ्यांची पर्यावरणाविषयक भित्तीपत्रक स्पर्धा घेण्यात आली.
**
लातूर जिल्हा प्रशासनाच्या ‘माझा जिल्हा, हरित जिल्हा’ उपक्रमाला कालपासून प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यातील वन क्षेत्र वाढवण्यासाठी प्रशासनाने हाती घेतलेल्या रोपवाटिका तसंच सीडबॉल निर्मिती आदी उपक्रमांनाही प्रारंभ झाला आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान सामाजिक संपर्क माध्यमांवर अफवा पसरवणाऱ्या दोन जणांना बीड पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, तसंच आक्षेपार्ह माहिती प्रसारित करू नये, असं आवाहन पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात आलं आहे.
****
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा- दहावीच्या गुणपत्रिका येत्या मंगळवारी सर्व शाळांना वाटण्यात येणार आहेत. त्याच दिवशी दुपारनंतर विद्यार्थ्यांना आपापल्या शाळांमधून गुणपत्रिका मिळणार असल्याची माहिती मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे. सर्व शाळांचे मुख्याध्यापक, विद्यार्थी तसंच पालकांनी यांची नोंद घ्यावी, असं आवाहन ओक यांनी केलं आहे.
****
टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल न्यूयॉर्क इथं झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं आयर्लंडवर आठ गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत आयर्लंडच्या संघाने दिलेलं ९६ धावांचं लक्ष्य, भारताने १३ व्या षटकात दोन गडी गमावत पूर्ण केलं. येत्या रविवारी नऊ तारखेला भारताचा पुढचा सामना पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.
****
फ्रेंच खुल्या टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा जोडीदार मॅथ्यू एब्डेन या यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. अटीतटीच्या सामन्यात त्यांनी बेल्जियमच्या जोडीचा ७-६, ५-७, ६-१ असा पराभव केला.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काल अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. कन्नड तालुक्यात चापानेर, देवगाव रंगारीसह गल्लेबोरगाव परिसरात, पैठण तालुक्यातही सर्वदूर पाऊस झाला.
****
नांदेड जिल्ह्यात देगलूर इथं काल दुपारी जोरदार पाऊस झाला. या पावसाने बाजारपेठेत व्यापारी तसंच ग्राहकांची मोठी तारांबळ उडाली. दरम्यान, दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे शेतकरी खरीपाच्या पेरणीला लागले असून, बी -बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे.
****
No comments:
Post a Comment