Friday, 7 June 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:07.06.2024 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 07 June 2024

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०७ जून २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      १८ व्या लोकसभेची स्थापना प्रक्रिया पूर्ण-निवडणूक आचारसंहिता समाप्त 

·      सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत राजकीय पक्षांच्या बैठकांची सत्रं सुरू

·      राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन दहा जून ऐवजी २७ जूनपासून

·      छत्रपती शिवाजी महाराजांचा साडे तीनशेवा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा

·      टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत अमेरिकेचा पाकिस्तानवर सुपर ओव्हरमध्ये विजय

आणि

·      नैर्ऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्रात दाखल

****

केंद्रीय निवडणूक आयोगानं १८ व्या लोकसभेच्या स्थापनेची प्रक्रिया काल पूर्ण केली. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना नव्या खासदारांची यादी सुपूर्द केली. त्यानंतर आयोगानं निवडणूक आचारसंहिता समाप्त झाल्याचं घोषित केलं. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया यशस्विरित्या पूर्ण केल्याबद्दल राष्ट्रपतींनी निवडणूक आयोगाचं अभिनंदन केलं.

दरम्यान, महाराष्ट्रात मुंबई पदवीधर आणि शिक्षक, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी निवडणूक जाहीर झाल्यानं, मुंबई, कोकण आणि नाशिक विभागात आदर्श आचारसंहिता लागू राहणार असल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केलं आहे.

****

देशात सात टप्प्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकूण ६५ पूर्णांक ७९ टक्के मतदान झालं. केंद्रीय निवडणूक आयोगानं काल ही सुधारित आकडेवारी जाहीर केली. या निवडणुकीत ६५ पूर्णांक ८० टक्के पुरुष आणि ६५ पूर्णांक ७८ टक्के महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्रात एकूण ६१ पूर्णांक ३३ टक्के इतकं मतदान झालं असून, ६३ पूर्णांक ४५ टक्के पुरुषांनी तर ५९ टक्के महिलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

****

केंद्रात सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर राजकीय बैठकांचं सत्र सुरू आहे. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी काल पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. जनता दल संयुक्तच्या नेत्यांची काल दिल्लीत नीतीशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची बैठक आज नवी दिल्लीत होणार आहे.

****

शिवसेनेच्या सर्व नवनिर्वाचित खासदारांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मुंबईत चर्चा केली. निवडणुकीत नक्की कुठे कमी पडलो याचाही आढावा त्यांनी या बैठकीत घेतला.

दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईत त्यांच्या घरी सदिच्छा भेट घेतली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांनीही मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

****

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची काल मुंबईत बैठक झाली. यानंतर वार्ताहरांशी बोलताना पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताही आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात नाही, असं स्पष्ट केलं. या निकालांची सर्वस्वी जबाबदारी आपण स्वीकारली आहे, मात्र, या अपयशानं खचून न जाता नव्या उमेदीनं विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचंही पवार यांनी सांगितलं.

****

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने काल नवनिर्वाचित खासदारांसह मुंबईत पत्रकार परिषद घेतली. राज्य सरकारच्या विरोधात मतदारांमध्ये अधिक नाराजी असून, येत्या विधानसभेत राज्य सरकारला याचा मोठा फटका बसेल, असं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. अजित पवार गटाच्या आमदारांना पक्षात परत घेण्याबाबत योग्यवेळी भाष्य केलं जाईल, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. पक्षाचा स्थापना दिवस येत्या १० जून रोजी अहमदनगर इथं मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असल्याचं, त्यांनी सांगितलं.

****

सांगलीतून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या विशाल पाटील यांनी काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला आहे. काल त्यांनी नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र त्यांना सोपवलं.

****

राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन दहा जून ऐवजी २७ जूनपासून सुरू होणार आहे. मुंबईत काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली.

पाणी टंचाईच्या समस्येवर अधिक वेगानं तोडगा काढण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी व्हावं यासाठी भाजपाच्या नेत्यांनी ठाकरे यांना विनंती केल्याची चर्चा मुनगंटीवार यांनी फेटाळून लावली.

****

राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या एक आणि केरळच्या तीन जागांसाठी काल अधिसूचना जारी करण्यात आली. महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी राजीनामा दिल्यामुळे एक जागा रिक्त झाली आहे. तर, केरळमधल्या तीन सदस्यांचा कार्यकाल पूर्ण झाला आहे. दोन्ही राज्यात १३ जूनपर्यंत नामांकन दाखल करता येणार असून, २५ जून रोजी मतदान होणार आहे.

****

छत्रपती शिवाजी महाराज यांचा साडे तीनशेवा शिवराज्याभिषेक सोहळा काल राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा झाला.

किल्ले रायगडावर हजारो शिवभक्तांनी ढोल ताशांच्या गजरात छत्रपती संभाजी राजे यांच्या उपस्थितीत शिवरायांना मानवंदना दिली. यावेळी मर्दानी खेळ, शाहिरी नजराणा, पालखी सोहळाही पार पडला.

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनीही रायगडावर येऊन शिवरायांना अभिवादन केलं.

**

कोल्हापुरात महाराजांच्या सुवर्णमूर्तीवर श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्यासह करवीर जनतेच्या उपस्थितीत अभिषेक करण्यात आला. या सोहळ्यानंतर पोवाडा, शौर्य गीत, मराठी स्फूर्ती गीत आणि मर्दानी खेळांचा थरार देखील अनुभवायला मिळाला.

**

छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास शिवभक्तांकडून अभिवादन करण्यात आलं. या ठिकाणी मराठा सेवा संघाच्या वतीने शाहीर पोवाडा आणि व्याख्यानही पार पडलं.

**

नांदेड जिल्हा परिषदेच्‍यावतीने भगव्या ध्वजासह स्वराज्य गुढी उभारली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी महाराजांच्या पुतळयास पुष्‍पहार अर्पण करुन अभिवादन केलं.

हिंगोली इथं विविध पक्ष संघटनांच्या वतीने शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. परभणी इथंही जिल्हा परिषदेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांनी भागवी पताका उभारुन शिवरायांच्या पुतळ्याचं पूजन केलं.

दरम्यान, नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय कलादालनातही या सोहळ्यानिमित्त विशेष प्रदर्शन भरवण्यात आलं होतं.

****

टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल टेक्सास इथं झालेल्या सामन्यात अमेरिकेनं पाकिस्तानचा सुपर ओव्हरमध्ये पाच धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानच्या संघाने निर्धारित षटकात सात बाद १५९ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल अमेरिकेच्या संघाने देखील २० षटकात १५९ धावा केल्यानं, सुपर ओव्हर घेण्यात आली. यामध्ये अमेरिकेनं १८ तर पाकिस्ताननं १३ धावा केल्या.

अन्य सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियानं ओमानचा ३९ धावांनी, तर युगांडानं पापुआ न्यू गीनीचा तीन गडी राखून पराभव केला. भारतीय वेळेनुसार आज पहाटे बार्बाडोस इथं झालेल्या सामन्यात स्कॉटलंडनं नामिबियावर पाच गडी राखून विजय मिळवला.

****

जर्मनी मधल्या म्युनिक इथं सुरू असलेल्या आयएसएसफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताचा नेमबाज सरबज्योत सिंगने सुवर्णपदक पटकावलं. त्याने दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात २४२ पूर्णांक सात गुण मिळवत ही कामगिरी केली.

****

नैऋत्य मोसमी पावसाचं काल महाराष्ट्रात आगमन झालं. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी तसंच सोलापुरात पाऊस पोहचला असल्याची माहिती, हवामान विभागाने दिली आहे. लातूर शहरासह जिल्ह्यातल्या अनेक भागात काल जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातल्या बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामं पूर्ण केली आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या बहुतांश भागात आज पहाटे जोरदार पाऊस झाला.

नांदेड जिल्ह्यात बिलोली तालुक्यातल्या तळणी इथं वीज पडून शंकर धर्मेकर या तरुणाचा मृत्यू झाला. शंकर हा त्याच्या भावासह पाऊस पडत असल्यानं एका शेतात झाडाखाली थांबला असताना ही घटना घडली.

दरम्यान, नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामाची पूर्व तयारी सुरु झाली असून पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग आहे. बाजारात जर बियाणे, खते आणि कीटकनाशकांची बोगस किंवा अनधिकृत विक्री तसंच साठा केल्याचं आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी काल खरीप हंगाम पूर्व तयारीबाबत आढावा बैठकीत दिले.

दरम्यान, येत्या दोन दिवसांत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. नांदेड जिल्ह्यासाठी आठ जूनपर्यंत पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

****

धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते काल दहा रास्तभाव दुकानदारांना नविन ई-पॉस मशिनचं वितरण करण्यात आलं. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे उपस्थित होत्या.

****

परभणी जिल्ह्यात काल पिता पुत्राचा रस्ता अपघातात मृत्यू झाला तर आठजण जखमी झाले. ताडकळस परिसरात उभ्या असलेल्या जीपला भरधाव पिकअपनं धडक दिल्यानं हा अपघात झाला.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात टॅंकरने पाणी पुरवठा करावा लागलेल्या प्रत्येक गावात जलसमृद्ध गाव अभियान राबवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. ते काल यासंदर्भातल्या आढावा बैठकीत बोलत होते. जिल्ह्यात जलपुनर्भरणाच्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत, यासाठी भीषण पाणीटंचाई असलेल्या गावांची प्राधान्याने निवड करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

****

जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्त्य साधून बीड जिल्ह्यात किल्ले धारुर आणि घागरवडा इथं भारतीय सेनेच्या इको बटालियनच्या वतीनं दहा हजार झाडं लावण्यात आली. भारतीय सेनेची बी कंपनी १३६ इको बटालियन ही तुकडी बीड जिल्ह्यात वृक्षआच्छादन आणि वनआच्छादन वाढवण्यासाठी कार्यरत आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 24 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...