Sunday, 25 August 2024

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २५ ऑगस्ट २०२४ सकाळी ७.१० मि.

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 25 August 2024

Time: 7.10 to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २५ ऑगस्ट २०२ सकाळी ७.१० मि.

****

****

·      पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगाव दौऱ्यावर - देशभरातल्या ११ लाख लखपती दिदींना प्रमाणपत्रांचं वाटप

·      एकात्मिक निवृत्तीवेतन-यु पी एस योजनेला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी

·      बदलापूर बाललैंगिक अत्याचार प्रकरणी विविध राजकीय पक्षांकडून राज्यभरात आंदोलन

·      परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकाच्या पिकविमा दाव्याचे प्रलंबित सव्वा दोनशे कोटी रुयपे मिळण्याचा मार्ग मोकळा

आणि

·      मराठवाड्यात सर्वत्र मुसळधार पाऊस - अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगाव दौऱ्यावर येत आहेत. देशभरातल्या ११ लाख लखपती दिदींना पंतप्रधानांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात येणार आहेत. वर्षाला एक लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न कमावणाऱ्या लखपती दिदींबरोबर ते यावेळी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमात पंतप्रधान राज्यातल्या स्वयंसहाय्यता गटांसाठी अडीच हजार कोटी रुपयांचा फिरता निधी, तसंच पाच हजार कोटी रुपयांचं बँक कर्ज जारी करतील. लखपती दीदींचा हा राज्यातला पहिला ऐतिहासिक मेळावा असेल, ३४ राज्यांमधल्या जवळजवळ ३० हजार ठिकाणांहून या कार्यक्रमात लखपती दीदी दूरदृष्यप्रणाली द्वारे सहभागी होणार आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेच्या तिसऱ्या आवृत्तीतला हा तिसरा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

केंद्रीय मंत्रीमंडळानं एकात्मिक निवृत्तीवेतन-यु पी एस योजनेला काल मंजुरी दिली. केंद्र सरकारच्या २३ लाख अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना याचा लाभ होईल. राज्य सरकारचे अधिकारी-कर्मचारी यात सहभागी झाले, तर ही संख्या ९० लाखांनी वाढेल, असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितलं. या योजनेअंतर्गत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शेवटच्या १२ महिन्यांच्या वेतनाच्या निम्मी रक्कम निवृत्तीवेतन म्हणून मिळेल. मात्र यासाठी त्यांना किमान २५ वर्ष सेवेत राहावं लागेल. किमान १० वर्ष सेवा केलेल्यांना किमान १० हजार रुपये निवृत्तीवेतन दिले जाईल. संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला मूळ वेतनाच्या ६० टक्के रक्कम निवृत्ती वेतन म्हणून दिली जाईल. पुढच्या आर्थिक वर्षापासून ही योजना लागू होईल.

****

राज्यातल्या शेवटच्या बहिणीचा अर्ज सादर होईपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी सुरूच राहील, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. यवतमाळ इथं लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती मेळाव्यात ते काल बोलत होते. या योजनेसाठी आतापर्यंत एक कोटी ४० लाख महिलांनी नोंदणी केली असून, एक कोटी सात लाख लाभार्थ्यांच्या खात्यात योजनेची रक्कम जमा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

****

बदलापूर बाललैंगिक अत्याचार प्रकरणी काल विविध राजकीय पक्षांच्या वतीनं राज्यभरात आंदोलन करण्यात आलं.

ठाणे इथं काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत मूक निदर्शनं करण्यात आली. शासन आणि प्रशासनाचा वचक नसल्याने अशा घटना वाढत असल्याने, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या दोघांनीही राजीनामे द्यावेत, अशी मागणी पटोले यांनी यावेळी केली.

विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर इथं तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर इथं आंदोलनात सहभाग घेतला. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्यानं राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी थोरात यांनी केली. मुंबईत दादर इथं शिवसेना भवनासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आंदोलन करण्यात आलं.

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काळ्या फिती बांधून भर पावसात आंदोलन केलं. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी सरकारवर टीका केली.

छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौकात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात तोंडावर काळ्या फिती बांधून निदर्शनं करण्यात आली.

जालना इथं शहरातल्या गांधीचमन चौकात महाविकास आघाडीच्यावतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं. भोकरदन, मंठा, जाफ्राबाद, बदनापूर इथंही महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.

बीड इथं आमदार संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आलं.

****

 

दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या वतीनेही काल बदलापूर घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात 'जागर जाणिवेचा' हे अभियान राबवण्यात आलं. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावती इथं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मौन धारण केलं. मुंबई, छत्रपती संभाजीनगर, अमरावती यासारख्या ठिकाणी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले.

****

नेपाळ इथल्या बस दुर्घटनेतल्या २५ जणांचे मृतदेह काल जळगावच्या विमानतळावर वायुदलाच्या विशेष विमानानं आणण्यात आले. त्यानंतर संपूर्ण शासकीय प्रक्रियेच्या पूर्ततेनंतर ते नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आले. केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांसह अन्य लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते. 

****

केंद्रीय रेल्वे आणि अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री रवनीत सिंघ आज नांदेड दौऱ्यावर येत आहेत. सकाळी ११ वाजता ते सचखंड गुरूद्वाऱ्याला भेट देतील. दुपारी १२ वाजता ते नांदेड रेल्वे स्थानकावर विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील. दुपारी अडीच वाजता विभागीय रेल्वे कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन, सायंकाळी ते हैदराबादकडे प्रयाण करतील.

****

परभणी जिल्ह्यातल्या जवळपास दोन लाख शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकाच्या पिकविमा दाव्याचे प्रलंबित असलेले दोनशे ते सव्वा दोनशे कोटी रुयपे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय तांत्रिक सल्लागार समितीने संबंधित पीक विमा कंपनीला प्रलंबित रक्कम एका आठवड्यात शेतकऱ्यांना देण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान २१ ऑगस्ट रोजी नांदेड दौऱ्यावर आले असता, त्यांनी परभणीतल्या शेतकऱ्यांनी पिकविम्याची समस्या ऐकून घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या संदर्भात कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने केंद्रीय तांत्रिक सल्लागार समितीची बैठक घेतली. या बैठकीत पीक विमा कंपनीने पीक कापणी संबंधी घेतलेले आक्षेप समितीने फेटाळून लावत प्रलंबित पैसे आठवडाभरात अदा करण्याचे आदेश दिले.

****

मराठवाड्यात काल सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर शहरात काल दिवसभर कमी अधिक प्रमाणात पावसाच्या सरी कोसळत होत्या. जिल्ह्यातल्या पाचोड, लाडगाव आडुळ या मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. या पावसामुळे पैठण तालुक्यातल्या कडेठाण इथल्या मजरदरा तलावाच्या पाणी पातळीत वाढ झाली. जगप्रसिद्ध वेरूळ इथला सिता न्हाणी धबधबा पाहण्यासाठी काल पर्यटकांनी गर्दी केली होती. या मार्गावर काही काळ वहातूक कोंडी झाली होती.

बीड जिल्ह्यात बीड तालुक्यातल्या पाली, नलावंडी पाटोदा, लिंबागणेश तसंच पाटोदा गेवराई, माजलगाव, केज, परळी आणि वडवणी या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. धाराशिव जिल्ह्यात कळंब इथं तर नांदेड जिल्ह्यात नांदेड, मुखेड, कंधार इथं अतिवृष्टीची नोंद झाली. परभणी जिल्ह्यातही पाथरी, सोनपेठ, मानवत इथं तर हिंगोली जिल्ह्यात वसमत आणि टेंभुर्णी इथं अतिवृष्टीची नोंद झाली. नांदेड जिल्ह्यातल्या लिंबगाव इथं सर्वाधिक ११६ पूर्णांक ५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

जालना जिल्ह्यात सहा मंडळात अतिवृष्टी झाली. या पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहिले. कपाशी, सोयाबीन, ऊस या पिकांमध्ये पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात साचलं. या पावसामुळे खरिपातल्या पिकांना जीवनदान मिळाले असून, शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

नांदेडमधला विष्णुपुरी प्रकल्प ९८ टक्के भरला असून, प्रकल्पाचे दोन दरवाजे काल सायंकाळी उघडण्यात आले. त्यामुळे गोदावरी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मराठवाड्यात येत्या पाच सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता परभणीच्या वंसतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं वर्तवली आहे.

****

नाशिक जिल्ह्यात गेले तीन दिवस सुरु असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला यंदाच्या पावसाळ्यात दुस-यांदा पूर आला आहे. गंगापूर धरणातून काल संध्याकाळी सात हजार ४३१ घनफुट प्रति सेकंद वेगानं पाणी सोडण्यात आलं. तर नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून रात्री नऊ नंतर तीस हजार १६९ घनफुट प्रति सेकंद विसर्ग करण्यात येत आहे, तर पालखेड धरणातून कादवा नदीत पाणी विसर्ग प्रवाहित करण्यात आला.

****

जालना इथल्या गजकेसरी स्टील कंपनीत भीषण स्फोट होऊन ३४ कामगार जखमी झाले. काल दुपारी हा अपघात झाला. यापैकी १५ जणांना किरकोळ जखमा असल्याने त्यांना प्रथमोपचार करून सुटी देण्यात आली. बारा कामगार ३० ते ६५ टक्क्यांपर्यंत भाजले असून, त्यांच्यावर जालना इथं, तर सात कामगार ६५ टक्क्यांपेक्षा अधिक भाजल्याने त्यांना अधिक उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कारखाना मालकासह अन्य तिघांविरुद्ध चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथं उभारण्यात येणाऱ्या साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह, संग्रहालय आणि अभ्यासिका इमारतीचं भूमिपूजन काल क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते झालं.

****

बीड जिल्ह्यात परळी इथल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवाला शेतकऱ्यांच्या मिळणाऱ्या उत्स्फुर्त प्रतिसादामुळे हा महोत्सव उद्या २६ ऑगस्ट पर्यंत सुरु राहणार आहे.

****

धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं येत्या तीन ते १८ ऑक्टोबर या कालावधीत श्री तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव साजरा होणार आहे. या महोत्सवादरम्यान भाविकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता यंत्रणांनी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिले आहे.

****

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 13.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 13 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...