Saturday, 3 May 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक ०३ मे २०२५ रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 03 May 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०३ मे २०२५ सायंकाळी ६.१०

**** 

बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे देशात रेल्वे सुविधांच्या कायापालटासह अर्थव्यवस्थेला चालना मिळणार-रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून विश्वास व्यक्त

वेव्ज परिषदेत दहावे राष्ट्रीय कम्युनिटी रेडिओ पुरस्कार प्रदान-नवोन्मेष श्रेणीत सांगलीच्या येरला वाणी रेडिओला पहिला पुरस्कार 

मिरज विद्यार्थी संघाच्या शतक महोत्सवी वसंत व्याख्यानमालेला आजपासून प्रारंभ 

छत्रपती संभाजीनगर इथल्या दहा विद्यार्थ्यांची इस्रोच्या अभ्यास सहलीसाठी निवड 

आणि

बीड इथल्या कुप्रसिद्ध खिडकी गँगला धुळे पोलिसांकडून अटक

****

बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे देशात रेल्वे सुविधांचा कायापालट होणार असून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असा विश्वास रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला आहे. वैष्णव यांनी आज वांद्रे कुर्ला संकुलातल्या प्रस्तावित बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या जागेला भेट देऊन पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. वैष्णव यांनी अभियंते आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली तसंच हा प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला.


दरम्यान, प्रसारमाध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात भारत जगाचं नेतृत्व करु शकतो असं, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते, ते म्हणाले...

बाईट - केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव

गुगल, मेटा आणि मायक्रोसॉफ्ट सह ७ आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी आज वेव्हज २०२५ परिषदेत Indian Institute of Creative Technology बरोबर सामंजस्य करार केल्याची माहिती वैष्णप यांनी दिली. 

****

कम्युनिटी रेडिओच्या देशभरात सुरु असलेल्या कार्याची, माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांनी प्रशंसा केली आहे. ते आज वेव्हज् परिषदेत कम्युनिटी रेडिओच्या उदघाटन सत्राला संबोधित करताना बोलत होते. सर्व कम्युनिटी रेडिओ काही उद्दिष्टांनी चालवली जात असून त्यामुळे आपल्या परंपरांना प्रोत्साहन मिळत आहे असं ते म्हणाले. यापुढील काळात तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून जास्तीत जास्त समुदायापर्यंत पोहोचण्यासाठी कम्युनिटी रेडिओ यांनी प्रयत्न करावेत, असं आवाहनही मुरुगन यांनी यावेळी केलं.

दहाव्या राष्ट्रीय कम्युनिटी रेडिओ पुरस्कारांचं वितरण मुरुगन यांच्या हस्ते यावेळी झालं. नवोन्मेष श्रेणीत राज्यातल्या येरला वाणी या कम्युनिटी रेडिओला राष्ट्रीय पातळीवर पहिला पुरस्कार प्रदान करण्यात आला. कम्युनिटी रेडिओच्या कामकाजातून समर्पण आणि वचनबद्धता प्रतीत होत असल्याचं माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यावेळी म्हणाले. 

****

गोव्यात शिरगाव इथल्या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. शिरगाव इथं लईराई देवीच्या जत्रेत चेंगराचेंगरीत होऊन सहा जणांचा मृत्यू झाला तर ८० जण जखमी झाले. आज पहाटे देवळाच्या आवारात निखाऱ्यांवरून अनवाणी चालण्याच्या पारंपरिक कार्यक्रमादरम्यान, भाविकांमध्ये अचानक गोंधळ उडाल्याने ही घटना घडली. जखमींना म्हापसा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी या जखमींची विचारपूस केली, तसंच त्यांच्या उपचारांचा पूर्ण खर्च सरकारतर्फे केला जाईल असं जाहीर केलं आहे. 

****

पहलगाम हल्ल्यानंतरच्या धोरणाचा भाग म्हणून भारताने पाकिस्तानकडून आयात बंद केली आहे. पाकिस्तानातून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या निर्यात झालेल्या किंवा वाटेत असलेल्या सर्व प्रकारच्या वस्तूंवर तात्काळ बंदी घातल्याची अधिसूचना परदेश व्यापार महासंचालनालयाने जारी केली आहे. यातून सूट मिळवायची असल्यास सरकारची वेगळी परवानगी घ्यावी लागेल असं अधिसूचनेत म्हटलं आहे.

****

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणजवळ राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य ६० फूट उंच पुतळा उभारण्यात आला आहे. प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या कंपनीने ३१ कोटी ७५ लाख खर्चून शिवरायांचा हा ब्रांझ पुतळा उभारला आहे. या पुतळ्याचं संकल्पन आयआयटी मुंबई या तज्ज्ञ संस्थेकडून तपासून घेण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या ११ मे रोजी राजकोट इथं महाराजांना अभिवादन करण्यासाठी येणार असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

श्रीक्षेत्र आळंदी येथे सुरु असलेल्या संत श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर ज्ञानेश्वरी ग्रंथाचं मोफत वाटप करण्यात येणार आहे. राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी ही घोषणा केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आणि शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या माध्यमातून हे वितरण केलं जाणार असल्याची माहिती गोगावले यांनी दिली. 

****

सांगली जिल्ह्यात मिरज विद्यार्थी संघाच्या शतक महोत्सवी वसंत व्याख्यानमालेला आज विद्यावाचस्पती शंकरराव अभ्यंकर यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर, मिरज विद्यार्थी संघाचे अध्यक्ष डॉ. मुकुंद पाठक, यांच्यासह रसिक मोठ्या संख्येनं या उद्वाटन सोहळ्याला उपस्थित होते. १७ मे पर्यंत चालणाऱ्या या व्याख्यानमालेत यंदा १६ व्याख्यानं होणार असल्याची माहिती मुकुंद पाठक यांनी दिली, ते म्हणाले..

बाईट -  डॉ. मुकुंद पाठक

****

छत्रपती संभाजीनगर इथले दहा विद्यार्थी बंगळूरू इथं भारतीय अवकाश संशोधन संस्था-इस्रोला भेट देण्यासाठी जाणार आहेत. या दौऱ्याची निवड चाचणी म्हणून सातवीच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांची स्मार्ट स्टुडंट परीक्षा घेण्यात आली. यातून निवड झालेल्या दहा विद्यार्थ्यांमध्ये महापालिकेच्या हर्सुल इथल्या शाळेचे कोमल गायकवाड, क्षितिज कांबळे आणि श्रावण लोखंडे या तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शिक्षिका सविता बांबर्डे यांनी या चाचणीसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. मनपा आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत तसंच उपायुक्त अंकुश पांढरे यांनी या विद्यार्थ्यांचं तसंच शिक्षकांचं अभिनंदन केलं आहे.

****

नांदेड जिल्हा पोलीस दलाने आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात आज दुपारपर्यंत ३ हजार उमेदवारांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आली. जिल्हा पोलीस मुख्यालयात आज सकाळपासून सुरु झालेल्या या मेळाव्यासाठी ११ हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. देशभरातल्या ९६ कंपन्यांच्या प्रतिनिधींनी मेळाव्यात मुलाखती घेऊन विद्यार्थ्यांची निवड केली आहे. 

****

धुळे पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने बीड जिल्ह्यातील चोरट्यांच्या टोळीला अटक केली आहे. पाच जणांच्या या टोळीतल्या प्रत्येकावर राज्यभरात ३० पेक्षाही अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. खिडकी गँग म्हणून कुप्रसिध्द असलेली ही टोळी, खिडक्यांना लावलेली लोखंडी जाळी काढून घरात घुसून चोऱ्या करत असल्याचं समोर आलं आहे. पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांच्यासह पथकाने अत्यंत शिताफीने तपास करून या टोळीला अटक केली, त्यांच्याकडून ५ मोबाईल, एक चारचाकी आणि इतर साहित्यासह चोरी केलेले ११ लाख ३३ हजार रुपयांचे दागिनेही पोलिसांनी हस्तगत केले आहेत.  

****

प्रतिबंधित सुगंधी सुपारीची अवैध वाहतुक करणारे सात कंटेनर धुळे पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केले आहेत. सात वाहनांसह जप्त करण्यात आलेला मुद्देमाल जवळपास दोन कोटी ५२ लाख ९२ हजार ४६४ रुपये किमतीचा असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. या वाहनांवरील चालकांना वाहतुक होत असलेल्या मालाच्या कागदपत्राबाबत विचारपुस केली असता, त्यांनी नागपूरहून गुजरात राज्यात जात असल्याची माहिती दिली, परंतु संबंधित मालाची कागदपत्रं त्यांना सादर करता आली नाहीत, त्यानंतर ही कारवाई केल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

****

सोलापूर जिल्ह्यातील महसूल प्रशासनाचे माजी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांची विद्यमान पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे  तर सोलापूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे यांची राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत

****

हवामान 

विदर्भात काही ठिकाणी आज सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला, 

राज्यात आज सर्वात जास्त ४४ पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं.  मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं ४२ पूर्णांक दोन, धाराशिव इथं ४२ पूर्णांक सहा, बीड इथं ४२ पूर्णांक आठ तर परभणी इथं ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

****


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 12.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 12 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...