Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 12 May 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ मे २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने केलेल्या कारवाईत १०० दहशतवादी
आणि पाकिस्तानी सैन्यदलाचे ४० सैनिक ठार
·
शस्त्रसंधीनंतरही सीमेवर आगळीक करणाऱ्या पाकिस्तानला चोख
प्रत्युत्तर देण्याचे लष्करी कमांडर्सना सर्वाधिकार, डिजीएमओ पातळीवर
आज पुन्हा चर्चा
·
ऑपरेशन सिंदूर - केवळ लष्करी कारवाई नाही तर भारताच्या
राजकीय, सामाजिक आणि धोरणात्मक इच्छाशक्तीचं प्रतिक, संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन
·
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरात
शिवसृष्टी उभारणार, मुख्यमंत्र्यांची माहिती
·
खेलो इंडिया स्पर्धेत ८० पदकांसह महाराष्ट्र अव्वल स्थानी
कायम
आणि
·
मराठवाड्यात पुढील दोन दिवसांत पुन्हा अवकाळी पावसाचा
हवामान विभागाचा अंदाज
****
ऑपरेशन
सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त जम्मू-काश्मीरमध्ये नऊ दहशतवादी अड्ड्यांवर
केलेल्या हल्ल्यात १०० दहशतवादी आणि पाकिस्तानी सैन्यदलाचे ४० सैनिक ठार झाले. भारतीय
लष्कराचे डिजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी काल पत्रकारपरिषदेत ही माहिती दिली.
ठार झालेल्या दहशतवाद्यांमद्ये IC-814 विमान अपहरण आणि पुलवामा बॉम्बस्फोटात
सहभागी असलेल्या युसूफ अझहर, अब्दुल मलिक रौफ आणि मुदासिर अहमद
यांचा समावेश आहे. ऑपरेशन सिंदूर ही मोहीम दहशतवादी, त्यांचे
आश्रयदाते आणि दहशतवादाची योजना आखणाऱ्यांना शिक्षा करणं तसंच दहशतवाद प्रशिक्षणाचे
तळ नष्ट करणं या स्पष्ट लष्करी उद्दिष्टानं आखण्यात आली होती. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत
सीमेपलीकडील दहशतवाद्यांच्या छावण्या आणि प्रशिक्षण स्थळांची ओळख पटवून कारवाई करण्यात
आल्याचं सैन्यदलानं सांगितलं. यासंदर्भात डिजीएमओ म्हणाले...
बाईट
- डिजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई
दरम्यान, दोन्ही देशांचे
डिजीएमओ सध्याच्या परिस्थितीवर आज दुपारी पुन्हा संवाद साधणार आहेत.
****
पाकिस्तानबरोबर
शस्त्रसंधी जाहीर केल्यानंतर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतल्या निवासस्थानी
महत्त्वाची बैठक घेतली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग तसंच तिन्ही सेनादलांचे प्रमुख
बैठकीला उपस्थित होते. दोन्ही देशांदरम्यानच्या शस्त्रसंधीनंतर पंतप्रधानांनी ही बैठक
बोलावली होती.
****
दहा आणि
अकरा मे च्या रात्री झालेल्या युद्धविराम आणि हवाई हद्दीच्या उल्लंघनाच्या पार्श्वभूमीवर
लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पश्चिम सीमेवरील लष्करी कमांडरसोबत काल सुरक्षा
परिस्थितीचा आढावा घेतला. डिजीएमओ चर्चेनंतर झालेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाच्या
बाबतीत चोख प्रत्युत्तर देण्याचे पूर्ण अधिकार लष्कर प्रमुखांनी लष्कर कमांडर्सना दिले
आहेत.
****
ऑपरेशन
सिंदूर ही केवळ लष्करी कारवाई नाही तर भारताच्या राजकीय, सामाजिक आणि
धोरणात्मक इच्छाशक्तीचं प्रतिक असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी
केलं आहे. त्यांनी काल लखनऊमध्ये ब्रह्मोस एरोस्पेस एकीकरण आणि परीक्षण सुविधेचं दूरदृष्य
प्रणाली द्वारे उद्घाटन केलं. ते म्हणाले...
बाईट
- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
****
पहलगाम
दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतरचा युद्धविराम या मुद्द्यांवर संसदेचं
विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल
गांधी आणि राज्यसभेतले विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांना यांदर्भात पत्र लिहिलं आहे.
****
आजच्या
बुद्ध पौर्णिमेनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या
आहेत. करुणेचा अवतार असलेल्या भगवान गौतम बुद्धांनी दिलेला अहिंसा, प्रेम आणि
दयेचा संदेश मानवाच्या कल्याणाचा मूळ आधार असल्याचं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात
म्हटलं आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही बुद्धपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
गौतम बुद्धांनी सर्वांसाठी दिलेला शांती आणि दयेचा संदेश सामंजस्यपूर्ण समाज बनवण्याप्रति
मार्गदर्शन करत असल्याचं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
****
सिंधुदूर्ग
जिल्ह्यातल्या मालवणमधील राजकोट इथं उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या
पुतळ्याच्या परिसरातील भव्यता आणखी वाढवण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी दिली. काल या पुतळ्याचं पूजन केल्यानंतर ते बोलत होते. या परिसरात
शिवसृष्टी उभारण्याचं काम लवकर सुरू होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
नव्याने उभारण्यात आलेला हा पुतळा भौगोलिक परिस्थिती विचारात घेऊन उभारल्याचं त्यांनी
सांगितलं, ते म्हणाले...
बाईट
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
खेलो इंडिया
युवा क्रीडास्पर्धांमध्ये महाराष्ट्रानं सुरेख कामगिरी बजावताना पदक तालिकेतलं अव्वल
स्थान कायम ठेवलं आहे. राज्यातल्या खेळाडुंनी आतापर्यंत ३० सुवर्ण आणि २५ रौप्य पदकांसह
८० पदकं जिंकली आहेत. कर्नाटक ४२ पदकांसह दुसऱ्या स्थानावर आहे तर राजस्थान पदक तालिकेत
तिसऱ्या स्थानावर कायम आहे.
****
चीनमध्ये
शांघाय इथं आयोजित तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत तिरंदाज दीपिका कुमारी आणि पार्थ साळुंखे
यांनी कांस्यपदकाची कमाई केली. दीपिकाने टोकियो ऑलिंपिक संघाच्या सुवर्णपदक विजेत्या
कोरियाच्या कांग चाययुंगचा ७-३ असा पराभव केला. तर पार्थ साळुंखे याने पॅरिस ऑलिंपिक
पदक विजेत्या फ्रान्सच्या बॅप्टिस्ट एडिसचा ६-४ असा पराभव केला. शांघाय तिरंदाजी विश्वचषक
स्पर्धेत भारताने दोन सुवर्ण, १ रौप्य आणि ४ कांस्य पदकांसह एकूण सात
पदकांची कमाई केली आहे.
****
श्रीलंकेत
सुरु असलेल्या तिरंगी एकदिवसीय क्रिकेट मालिकेत महिला संघानं श्रीलंकेचा पराभव करत
तिरंगी मालिकेचं विजेतेपद पटकावलं. काल कोलंबो इथं झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं
श्रीलंकेवर ९७ धावांनी विजय मिळवला. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय
घेतला, आणि निर्धारित ५० षटकात ३४२ धावा केल्या. स्मृती मंधानानं ११६
धावांची खेळी केली. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव सामन्यातले १० चेंडू
बाकी असतानाच २४५ धावांवर आटोपला. भारताकडून
स्नेह राणानं ४, तर अमनज्योत कौरनं ३ बळी मिळवले. या मालिकेत
एकूण १५ बळी मिळवत स्नेह राणा मालिकेतली सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली.
****
नांदेड
जिल्ह्यातल्या देगलूर तालुक्यातील तमलूर गावाचे सुपुत्र, भारतीय लष्करातील
शहीद जवान सचिन वनंजे यांच्या कुटुंबीयांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल त्यांच्या
राहत्या घरी सांत्वनपर भेट घेतली. शहीद सचिन यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या वतीनं
सर्वोतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
****
भारत-पाकिस्तान
तणावाच्या परिस्थितीत भारतीय जवानांचे मनोबल उंचावण्यासाठी आणि ऑपरेशन सिंदूर मोहिमेत
हुतात्मा झालेल्या जवानांना आदरांजली वाहण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने काल
जालना शहरातून तिरंगा रॅली काढण्यात आली. शहरातल्या मस्तगड इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या पुतळ्यापासून निघालेली तिरंगा रॅली मराठवाडा मुक्ती संग्राम हुतात्मा स्मारक
इथं विसर्जित झाली.
****
हवामान
छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यासह मराठवाड्यात काल अवकाळी पाऊस झाला. लातूर जिल्ह्यात हरंगुळ खुर्द
इथं राहुल जाधव या युवकाचा वीज पडून मृत्यू झाला. दरम्यान, पुढील दोन
दिवसांसाठी हवामान विभागानं छत्रपती संभाजीनगर, जालना,
बीड आणि नांदेड जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. तर, लातूर, धाराशिव आणि हिंगोली जिल्ह्यात आज तुरळक ठिकाणी
पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
****
No comments:
Post a Comment