Monday, 12 May 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 12.05.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 12 May 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: १२ मे २०२ सकाळी .०० वाजता.

****

जम्मू काश्मीरच्या सीमावर्ती भागात, सीमेवर तसंच देशातल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर काल रात्रीपासून आज पहाटेपर्यंत सर्वत्र शांतता होती, असं भारतीय लष्करानं म्हटलं आहे. पाकिस्तानकडून कुठेही हल्ले किंवा चिथावणीखोर हालचालींचं वृत्त नाही. दरम्यान १० मे रोजी पाकिस्ताननं सीमेवर केलेल्या गोळीबारात, शहीद झालेले सीमा सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक एम. डी. इम्तियाज यांचा मृतदेह आज सकाळी दिल्लीत आणण्यात आला. त्यांच्या मुळ गावी बिहारमध्ये छप्रा इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

****

देशातली सद्यपरिस्थिती लक्षात घेता राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणजेच एनडीएमएनं नागरिकांना सतर्कतेच्या सूचना जारी केल्या आहेत. समाज माध्यमांवरून दिलेल्या संदेशात नागरिकांनी कोणत्याही अज्ञात वस्तूला स्पर्श करु नये. त्यामध्ये स्फोटक धोकायदायक पदार्थ असू शकतात. त्यामुळे लोकांना गंभीर दुखापत होण्याचा धोका असल्याचं एनडीएमएनं म्हटलं आहे. अज्ञात सामग्री आढळल्यास स्थानिक अधिकाऱ्यांना तातडीनं कळवावं, अशा सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत.

****

राष्ट्रीय तपास संस्था एनआयए नं परदेशातल्या बब्बर खालसा दहशतवाद्यांशी संबंधित एका प्रमुख खलिस्तानी दहशतवाद्याला अटक केली आहे. मोतिहारी बिहार इथं ही कारवाई झाली. कट रचण्यात सहभाग, खलिस्तानी दहशतवाद्यांच्या साथीदारांना आश्रय देणं, रसद आणि निधी पुरवणं असे आरोप त्याच्यावर आहेत.

****

नासा आणि इस्रो यांनी संयुक्तपणे विकसित केलेला सिंथेटिक ऍप्रोच रडार उपग्रह पुढच्या महिन्यात प्रक्षेपित केला जाण्याची शक्यता आहे. इस्रोचे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन यांनी काल इंफाळमधल्या केंद्रीय कृषी विद्यापीठाच्या पाचव्या दीक्षांत समारंभात  बोलताना ही माहिती दिली.

****

राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाअंतर्गत २०२३-२४ यावर्षीचे गुणवंत अधिकारी आणि कर्मचारी पुरस्कार जाहीर करण्यात आले असून यामध्ये अकोला जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे यांना गुणवंत अधिकारी पुरस्कार जाहीर झाला आहे, तसंच अकोला जिल्हा परिषदेचे कर्मचारी वीरेंद्रकुमार महाजन यांची गुणवंत कर्मचारी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांशी उत्तम संबंध, कामातील वक्ताशीरपणा, वेळोवेळी जिल्हा परिषदेची प्रतिमा जनमाणसात उंचावण्याकरिता केलेले प्रयत्न, खर्चात केलेली काटकसर इत्यादी मुद्दे लक्षात घेऊन या पुरस्कारासाठी पात्रता ठरवली जाते. महाराष्ट्र विकास सेवा स्तरावर नंदुरबार जिल्हा परिषदेचे अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांनाही गुणवंत अधिकारी पुरस्कार जाहीर झाला आहे. तसंच जिल्हा परिषद गट क मधील राज्यातील एकूण २७ कर्मचाऱ्यांना गुणवंत कर्मचारी पुरस्कार जाहीर झाला आहे.

****

राज्यातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी मंदिरात भाविकांची वाढती गर्दी आणि अलीकडील पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कडक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. मंदिर परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी आता महिलांना पर्स, बॅग आणि तत्सम वस्तू घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. भाविकांनी कोणतंही सामान मंदिर परिसरात आणू नये, असं स्पष्ट आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. भाविकांनी संयम बाळगून सुरक्षाव्यवस्थेला सहकार्य करावं, असं आवाहनही श्रीक्षेत्र तुळजापूर मंदिर प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

****

आधुनिक नर्सिंगच्या संस्थापक फ्लोरेन्स नाईटिंगेल यांच्या जयंतीनिमित्त आज जगभरात आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा केला जात आहे. ‘आमच्या परिचारिका-आमचं भविष्य’ ही यंदाच्या दिनाची मध्यवर्ती संकल्पना असल्याचं आंतरराष्ट्रीय परिचारिका परिषदेनं म्हटलं आहे.

****

देशाच्या सीमाभागात सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंन्टट्स ऑफ इंडिया या संस्थेनं आपल्या पुढं ढकललेल्या परीक्षांचं नवीन वेळापत्रक जाहीर केलं आहे. सीए फायनल, इंटरमिडिएट, पोस्ट क्वालिफिकेशन कोर्स आणि सेल्फ पेस्ड ऑनलाईन मोड्युल या परीक्षा आता १६ मेपासून सुरू होणार आहेत. सुधारित वेळापत्रकाचा तपशील इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंन्टट्स ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

****

बुलढाणा जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये काल दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळं प्रचंड नुकसान झालं आहे, जिल्ह्यातील खामगाव शहर संग्रामपूर, चिखली, मोताळासह अनेक तालुक्यांमध्ये ग्रामीण भागातल्या अनेक कच्च्या घरांचं नुकसान झालं आहे.

****

No comments: