Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 01 June 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ जून २०२५ सायंकाळी ६.१०
****
· नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील कुंभमेळ्याचे पहिले अमृतस्नान २ ऑगस्ट २०२७ ला, तारखांची
घोषणा, कुंभमेळा ऐतिहासिक ठरणार - मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
· दहशतवादाविरोधात भारताच्या कूटनितीक लढाईला वेग, सर्वपक्षीय प्रतिनिधी
मंडळांकडून पाकच्या कारवाया विविध देशांच्या प्रमुखांसमोर केल्या उघड
· व्यावसायिक गॅस सिलिंडर २४ रुपयांनी स्वस्त
आणि
· आयपीएलच्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात आज मुंबई इंडियन्सचा पंजाबशी सामना, विजेत्या
संघाची अंतिम सामन्यात होणार आरसीबीशी तीन जूनला लढत
****
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं होणाऱ्या कुंभमेळ्याच्या
पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात
बैठक घेतली. यावेळी कुंभमेळ्याच्या तारखा घोषित करण्यात आल्या. पुढील वर्षी ३१ ऑक्टोबर
२०२६ रोजी दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी सिंहस्थाला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर
नाशिकमध्ये प्रथम अमृतस्नान २ ऑगस्ट २०२७ ला होणार आहे तर द्वितीय अमृतस्नान ३१ ऑगस्ट
२०२७ आणि तृतीय स्नान ११ सप्टेंबर २०२७ रोजी होणार आहे. त्रंबकेश्वर येथेही ३१ ऑक्टोबर
२०२६ रोजी ध्वजारोहण होणार असून पहिलं अमृतस्नान २ ऑगस्ट २०२७ द्वितीय ३१ ऑगस्ट २०२७
आणि तृतीय स्नान १२ सप्टेंबर २०२७ रोजी होणार आहे.
दरम्यान, नाशिक मध्ये होणारा कुंभमेळा
ऐतिहासिक स्वरूपाचा असेल त्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केलेली आहे सुमारे ६ हजार
कोटी रुपयांच्या कामांच्या आराखड्या पैकी ४ हजार कोटी रुपयांच्या
कामांच्या निविदा मागविण्यात आल्या आहे तर दोन हजार कोटी रुपयांच्या कामांच्या निविदा
प्रक्रियेत आहे. निविदा मागवून प्रक्रियेत असलेली कामे जानेवारी महिन्यापर्यँत पूर्ण
होतील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. नाशिक आणि
त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी सर्व साधु महंतांचे सहकार्य लाभत आहे आखाडा
परिषद कुंभमेळ्याचे संचालन करत असते. कुंभमेळ्यासाठी कोणत्याही प्रकारे निधीची कमतरता जाणवू दिली जाणार नाही, असेही फडणवीस यांनी सांगितलं.
यावेळी राज्याचे जलसंपदा तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, विभागीय आयुक्त डॉक्टर
प्रवीण गेडाम यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते.
****
दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णूतेचा भारताचा
संदेश जगभरात पोहोचवण्यासाठी विविध देशांमध्ये गेलेल्या बहुपक्षीय शिष्टमंडळांपैकी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालचं
शिष्टमंडळ इथिओपिया इथं पोहोचलं आहे. या प्रतिनिधिमंडळानं इथिओपिया मधले संसद प्रतिनिधी, मान्यवर
व्यक्ती आणि आफ्रिकी संघ आयोगाच्या सदस्यांची भेट घेतली. भारताला नियंत्रण रेषेच्या
पलीकडून असलेला दहशतवादाचा धोका आणि देशात सांप्रदायिक सलोखा बिघडवण्याच्या पाकिस्तानच्या
प्रयत्नांची माहिती शिष्टमंडळाने त्यांना दिली. भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांच्या
नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ फ्रांस, इटली आणि डेन्मार्कचा दौरा आटोपून लंडनला
पोहोचलं आहे. भारत आपली भूमिका परिणामकारकपणे मांडेल आणि इतर तीन देशांप्रमाणेच लंडनमध्ये
देखील भारताच्या भूमिकेला पाठिंबा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याशिवाय
भाजप खासदार बैजयंत पांडा यांचं शिष्टमंडळ सध्या अल्जेरियाच्या दौऱ्यावर असून त्यांनी
तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला. तर द्रमुकच्या खासदार कनिमोळी यांच्या नेतृत्वाखालचं
शिष्टमंडळ स्पेनमधल्या माद्रिद इथं पोहोचलं आहे.
****
पश्चिम बंगालच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर
असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दहशतवादाविरोधात भारताची लढाई सुरूच असून
ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेलं नाही, असं स्पष्ट केलं. विजय संकल्प
कार्यकर्ता संमेलनात भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. भारतानं
पाकिस्तानमध्ये १०० किलोमीटर आत असलेले अतिरेकी तळ उद्ध्वस्त केले आहेत. पुन्हा अतिरेकी
हल्ला करण्याची हिंमत होणार नाही, असंही ते म्हणाले. पश्चिम बंगालमध्ये हिंदूवर
अत्याचार वाढत असून ते रोखणं गरजेचं आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत ममता सरकारला
सत्तेवरून खाली खेचलं जाईल आणि भाजपचं सरकार राज्यात येईल, असा
दावाही शहा यांनी केला.
****
देशातल्या १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या
किंमती २४ रुपयांनी कमी करण्याचा निर्णय तेल विपणन कंपन्यांनी घेतला आहे. आता व्यावसायिक
सिलिंडर दिल्लीत १ हजार ७२३ रुपयांना, मुंबईत १ हजार ६७४ रुपये, कोलकाता
१ हजार ८२६,
चेन्नईत १ हजार ८८१, बंगळुरूत १ हजार ७९६, नोएडा
१ हजार ७२३ आणि चंडीगडमधे १ हजार ७४३ रुपयांना मिळेल.
****
बदललेल्या वातावरणामुळं मान्सूनचा प्रवास
सध्या रखडलेला असून,
१० जूनपर्यंत राज्यात पावसाचं प्रमाण कमीच राहाणार आहे. अशा
परिस्थितीत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून पेरणीची घाई करू नये, असा
सल्ला कृषी विभागानं विशेषतः कोरडवाहू शेतकऱ्यांना दिला आहे. किमान १० जूनपर्यंत राज्यात
बहुतांश भागात हवामान कोरडं राहणार आहे. यामुळे तापमानात वाढ होणार असून, विदर्भात
तापमान ४० अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या कोरड्या हवामानाचा वाईट परिणाम पेरणी
आणि लागवडीवर पडण्याची शक्यता आहे.
****
छत्रपती संभाजीनगर परिमंडल महावितरणच्या
विसाव्या वर्धापन दिनानिमित्त ‘शून्य अपघात महावितरण, शून्य
अपघात महाराष्ट्र’ ही संकल्पना घेऊन आजपासून ते येत्या सहा जून दरम्यान राज्यभरात विद्युत
सुरक्षा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्त छत्रपती संभाजीनगर परिमंडलात आज
कर्मचाऱ्यांसाठी मॅरेथॉनचं आयोजन करून सुरक्षा सप्ताहास प्रारंभ करण्यात आला. क्रांती
चौकातून सुरू झालेल्या मॅरेथॉनमध्ये साडेसातशे कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला. उद्या
परिमंडलातील सर्वच उपविभागांमध्ये रहिवासी परिसरात विद्युत सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात
येणार आहे. तर येत्या तीन आणि चार जून रोजी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी
आणि कुटुंबीयांसाठी तसंच शालेय विद्यार्थ्यांसाठी विद्युत सुरक्षेविषयी निबंध आणि चित्रकला
स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
****
शेती ही संस्कृती, पर्यावरण
आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे असं समजून एकत्र काम केले तर महाराष्ट्रातील शेती ही डिजिटल
युगात जगाला दिशा देणारी ठरेल असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त
केला. पुण्यात कृषी विभाग,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि कृषी महाविद्यालयासह आंतरराष्ट्रीय
संस्थांच्या सहकार्यानं देशातील पहिल्या कृषी हॅकेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. याचे
उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी
ते बोलत होते. याप्रसंगी कृषिमंत्री विधीज्ञ माणिकराव कोकाटे यांची प्रमुख उपस्थिती
होती.
****
जिल्हा परिषद शाळांची घटती पटसंख्या ही ग्रामीण
भागातील गंभीर समस्या बनली आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्याच्या सांगोळा तालुक्यातील
जवळा येथील ग्रामपंचायतीने एक स्तुत्य पाऊल उचललं आहे. गावातील पालकांनी आपल्या मुलास
किंवा मुलीचे नाव जिल्हा परिषद शाळेत घातल्यास त्यांची ग्रामपंचायतीची घरपट्टी माफ
करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
****
राज्य शासनाकडून समाजातल्या सर्व घटकांसाठी
विविध योजना राबविण्यात येतात. प्रशासनानं पात्र नागरिकांना याचा लाभ देताना त्यांच्या
यासंदर्भातील समस्याही तत्परतेनं सोडवाव्यात, अशी सूचना महसूल मंत्री तथा
नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज अधिकाऱ्यांना केली. नागपूर इथल्या
नियोजन भवनात आयोजित जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
****
नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार
बालाजी कल्याणकर यांची प्रकृती काल मध्यरात्री अचानक बिघडल्यानं त्यांना तातडीनं पुढील
उपचारासाठी मुंबईला हलविण्यात आलं आहे. त्यांना अतिउच्च तापासह रक्तदाबाचा त्रास सुरू
झाला होता.
****
आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम
सामन्यात स्थान मिळवण्याकरता आज मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज्स यांच्यात दुसरा
पात्रता सामना होणार आहे. अहमदाबाद इथं आज संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू
होईल. या दुसऱ्या पात्रता सामन्यात प्रवेश मिळवण्यासाठी गुणतालिकेत तिसऱ्या आणि चौथ्या
क्रमांकावर असलेल्या मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्समध्ये झालेल्या निर्णायक सामन्यात
मुंबईनं गुजरातचा पराभव केला होता. या सामन्याआधी साखळी फेरीत गुणतालिकेत सर्वोच्च
दोन स्थानी असलेल्या पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अंतिम सामन्यात
थेट प्रवेशासाठी पहिला पात्रता सामना झाला होता. त्यात पंजाबचा पराभव करून बंगळुरूनं
थेट अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आजच्या सामन्यातला विजेता
संघ आणि बंगळुरू यांच्यात येत्या तीन जूनला अहमदाबाद इथं अंतिम लढत होईल.
****
भंडारा जिल्हा अक्वाटिक असोसिएशनच्या वतीनं
आयोजित यंदाची प्रेसिडेंट कप जलतरण स्पर्धा आज जल्लोषात पार पडली. या स्पर्धेचं उद्घाटन
जिल्हाधिकारी संजय कोलते यांच्या हस्ते करण्यात आलं. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे
खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे देखील याप्रसंगी उपस्थित होते. स्पर्धेचं बक्षीस वितरण
भंडारा-पवनी विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते करुन स्पर्धेतील
विजेत्यांना गौरविण्यात आलं. स्पर्धेत ३०० जलतरणपटूंनी सहभाग नोंदवला होता.
****
अहिल्यानगर जिल्ह्यातल्या केडगावमध्ये झालेल्या
मुसळधार पावसानं पूर सदृश्य स्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. मुसळधार
पावसामुळे केडगावात राहणाऱ्या काही नागरिकांच्या घरात
देखील पाणी शिरलं. या नुकसानीची मनपा उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी पाहणी केली.
****
No comments:
Post a Comment