Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati
Sambhajinagar
Date - 02
June 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ जून
२०२५ दुपारी १.०० वा.
****
पॅराग्वेचे अध्यक्ष सँटियागो पेना पॅलासिओस यांचं आज तीन
दिवसाच्या भारत दौऱ्यावर आगमन झालं. परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी राष्ट्रपती
पॅलासिओस यांची भेट घेतली आणि अनेक क्षेत्रांमध्ये भारत-पॅराग्वे सहकार्य वाढवण्यासाठी
त्यांच्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आभार व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी
पॅलासिओस यांच्या चर्चेनंतर पॅराग्वे आणि दक्षिण अमेरिकेतील देशांसोबत भारताच्या संबंधांसाठी
नवीन मार्ग खुले होतील, असा विश्वास डॉ. जयशंकर यांनी व्यक्त केला. पेना पॅलासिओस मायदेशी
रवाना होण्यापूर्वी बुधवारी मुंबईला भेट देणार आहेत.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनकड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणच्या
जनतेला राज्याच्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रीय प्रगतीमध्ये अमाप
योगदानासाठी हे राज्य ओळखले जाते. गेल्या एका दशकात या राज्यातील जनतेचे जीवन सुखकर
करण्यासाठी रालोआ सरकारने अनेक उपाययोजना हाती घेतल्या, असं पंतप्रधान आपल्या संदेशात म्हणाले.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी आंतरराष्ट्रीय हवाई
वाहतूक संघटना, आयटीएच्या ८१ व्या सर्वसाधारण सभेला
संबोधित करणार आहेत. नवी दिल्ली इथं भारत मंडपमध्ये कालपासून या सर्वसाधारण सभेला सुरुवात
झाली. जागतिक पातळीवर हवाई क्षेत्राला भेडसावत असलेल्या समस्यांवर यात उहापोह होत आहे.
४२ वर्षानंतर भारत आयटीएच्या सर्वसाधारण सभेचं यजमानपद भूषवत आहे.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ५ जून रोजी
नागपूर-मुंबई महामार्गावरील ७६ किमी लांबीच्या शेवटच्या टप्प्यातील समृद्धी महामार्गाचे
उद्घाटन करण्यात येणार आहे. नाशिकमधील इगतपुरी ते ठाण्यातील आमणे यांना जोडणारा हा
शेवटचा टप्पा ७०१ किमी लांबीच्या हाय-स्पीड कॉरिडॉरचा शेवटचा टप्पा आहे. हा टप्पा पूर्ण
झाल्यामुळे समृद्धी महामार्गावरुन आता नागपूर ते मुंबई थेट प्रवास करता येणार असल्याची
माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी
दिली.
****
ऑपरेशन सिंदूरनंतर सात सर्वपक्षीय शिष्टमंडळं भारताची
दहशतवादविरोधी भूमिका जगापुढं मांडत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील
शिष्टमंडळानं इथिओपियाचा दौरा पूर्ण केला. हे शिष्टमंडळ आज इजिप्तमध्ये दाखल झालं आहे.
खासदार संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं मलेशियाच्या उपपंतप्रधानांची
भेट घेतली. तर, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील
शिष्टमंडळानं लायबेरिया इथं भारतीय समुदायाशी संवाद साधला. खासदार रवीशंकर प्रसाद यांच्या
नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं ब्रिटन दौऱ्यावर परराष्ट्रमंत्री प्रिटी पटेल यांची भेट
घेतली. बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं अल्जेरिया दौऱ्यात अल्जेरियाच्या
परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेतली. काँग्रेस खासदार शशी थरुर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ
ब्राझील दौरा पूर्ण करुन उद्या अमेरिकेत दाखल होणार आहे.
****
देशभरात कोविड-१९ चे ३ हजार ९६० हून अधिक सक्रिय रुग्ण
आढळले आहेत. केरळमध्ये सर्वाधिक १ हजार ४३५,महाराष्ट्रात ५०६ आणि दिल्लीत ४८३ रुग्ण आढळले आहेत असं आरोग्य
आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या पत्रकात सांगण्यात आलं आहे.
****
मुंबईत, सहार पोलिसांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून आखाती देशांमध्ये
प्रवास करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार नेपाळी तरुणांना अटक केली आहे. ते बिहारमधून
भारतात आले होते. प्रत्येक आरोपीने प्रवास व्यवस्था आणि बनावट कागदपत्रांसाठी एजंटला
नेपाळी चलनात अडीच लाख रुपये दिल्याचं उघडकीस आलं आहे. अशाच प्रकारे बेकायदेशीरपणे
परदेशात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा नेपाळी तरुणांना गेल्या आठवड्यात अटक करण्यात
आली होती.
****
चौथ्या थायलंड खुल्या आंतरराष्ट्रीय मुष्टीयोद्धा स्पर्धेत, दीपक आणि नमन तंवर यांनी काल भारताच्या मोहिमेचे नेतृत्व
करत दोन सुवर्णपदकं जिंकली. दीपकनं ७५ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत उझबेकिस्तानच्या
अब्दुराखिमोव्ह जावोखिरवर ५-० असा विजय मिळवला तर नमनने ९० किलो वजनी गटात चीनच्या
हान झुएझेनवर ४-१ असा विजय मिळवला. महिलांच्या ८० किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत, किरणला कझाकस्तानच्या येल्दाना तालिपोवाकडून २-३ असा पराभव
पत्करावा लागला आणि तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
पाच भारतीय महिला मुष्टीयोद्धा तमन्ना, प्रिया, संजू, सानेह आणि लालफकमावी राल्टे यांनी आपापल्या गटात दमदार कामगिरी
करत कांस्यपदक जिंकले.
****
महावितरणचे कर्मचारी तसंच नागरिकांनी विद्युत सुरक्षेबाबत
कायम सजग राहावे, तीन पिढ्यांचे नुकसान
टाळण्यासाठी विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या असं आवाहन महावितरणचे संचालक
राजेंद्र पवार यांनी केलं आहे. महावितरणच्या २० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित विद्युत
सुरक्षा सप्ताहानिमित्त कर्मचारी ,शालेय विद्यार्थी आणि नागरिकांसाठी ऑनलाइन खुल्या प्रश्नमंजूषा पोर्टलचे उद्घाटन
काल पवार यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. ‘शून्य विद्युत अपघाता'चे ध्येय घेऊन या सप्ताहात विविध कार्यक्रमांचे आयोजन
करण्यात आले आहे. या www.mahadis.com.in संकेतस्थळावर ही प्रश्नमंजूषा सुरू करण्यात आली आहे.
****
No comments:
Post a Comment