Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 02 June
2025
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ जून २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
नाशिक कुंभमेळ्याच्या
आयोजनासंदर्भात मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक, कुंभमेळ्यासाठी चार हजार
कोटी रुपयांच्या निविदा काढल्याची माहिती- ३१ ऑक्टोबर २०२६ ला होणार सिंहस्थाला
प्रारंभ
·
दहशतवादाविरुद्ध शून्य
सहिष्णूतेचा भारताचा संदेश जगभरात पोहोचवण्यासाठी विविध देशांमध्ये सर्वपक्षीय
शिष्टमंडळांकडून भारताची भूमिका स्पष्ट
·
अंबाजोगाई इथल्या स्वामी
विवेकानंद शिक्षक सहकारी पतसंस्थेतला गैरव्यवहार उघडकीस, १५
जणांविरुद्ध गुन्हा दाखल
·
आषाढी एकादशीसाठी शेगाव
इथून संत श्री गजानन महाराज पालखीचे आज प्रस्थान
आणि
·
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत
****
नाशिक इथं नियोजित कुंभमेळा सुरक्षित, निर्मळ
आणि पवित्र वातावरणात होण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न
केले जातील,
कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना सर्व प्रकारच्या
सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असं मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी सांगितलं आहे. त्र्यंबकेश्वर आणि
नाशिकमधल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी काल नाशिक
इथं १३ प्रमुख आखाड्यांचे महंत, साधुसंत, सर्व
प्रमुख पुरोहीत संघाचे प्रतिनिधी यांच्यासोबत आढावा बैठक घेतली, त्यावेळी
ते बोलत होते. सर्वांच्या सहकार्याने जग स्तिमित होईल असं भव्य दिव्य आणि स्मरणीय
आयोजन करण्यात येईल,
अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. कुंभमेळ्याच्या
आयोजनाच्या दृष्टीनं करायच्या कामांसाठी चार हजार कोटी रुपयांच्या निविदा काढल्या
आहेत, तसंच आणखी दोन हजार कोटी रुपयांच्या निविदा काढणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
गोदावरी निर्मळ राहावी आणि कायम प्रवाही राहावी हेच कुंभचं
उद्दिष्ट असून,
तसा शासनाचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले,
बाईट
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं होणाऱ्या कुंभमेळ्यातल्या अमृत
स्नानाचे दिवसही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सिंहस्थ
ध्वजारोहण होईल,
पहिलं अमृतस्नान दोन ऑगस्ट २०२७ रोजी, दुसरं
अमृत स्नान ३१ ऑगस्ट २०२७ रोजी, तर तिसरं अमृतस्नान ११ सप्टेंबर २०२७
रोजी होणार आहे.
****
कृषी क्षेत्रात शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाला वाव देऊन
अनेक संधीचा लाभ देता येऊ शकतो, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी
म्हटलं आहे. पुणे इथं काल देशातल्या पहिल्या कृषी हॅकेथॉनचं उद्घाटन पवार यांच्या
हस्ते झालं,
त्यावेळी ते बोलत होते. शेती केवळ अन्न देण्याची व्यवस्था
नसून, ती संस्कृती,
पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे, हे
लक्षात घेऊन सर्व घटकांनी एकत्रित काम केलं तर या डिजिटल युगात राज्यातली शेती ही
जगाला दिशा देणारी शेती ठरेल असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. ते म्हणाले,
बाईट
- उपमुख्यमंत्री अजित पवार
या कार्यक्रमाला कृषिमंत्री माणिकराव कोकाटे उपस्थित होते.
शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्याबरोबरच त्यांच्या उत्पादन खर्चात बचत करण्याच्या
हेतूनं कृषीक्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यासाठी राज्य सरकार
प्रयत्नशील आहे,
असं ते म्हणाले.
****
दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णूतेचा भारताचा संदेश जगभरात
पोहोचवण्यासाठी विविध देशांमध्ये गेलेल्या बहुपक्षीय शिष्टमंडळांपैकी, राष्ट्रवादी
काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालचं
शिष्टमंडळ इजिप्तची राजधानी कैरो मध्ये दाखल झालं.
भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ
फ्रांस,
इटली आणि डेन्मार्कचा दौरा आटोपून लंडनला पोहोचलं आहे. भारत
आपली भूमिका परिणामकारकपणे मांडेल आणि इतर तीन देशांप्रमाणेच लंडनमध्ये देखील
भारताच्या भूमिकेला पाठिंबा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त
केला. याशिवाय भाजप खासदार बैजयंत पांडा यांचं शिष्टमंडळ सध्या अल्जेरियाच्या
दौऱ्यावर असून,
त्यांनी तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला, तर
द्रमुकच्या खासदार कनिमोळी यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ स्पेनमधल्या माद्रिद
इथं पोहोचलं आहे.
****
भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं संरक्षण
मंत्रालय आणि माय जी.ओ.व्ही. इंडिया या संकेतस्थळानं संयुक्तपणे देशभरातल्या युवा
वर्गासाठी विविध स्पर्धांचं आयोजन केलं आहे. कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली.
याअंतर्गत ‘ऑपरेशन सिंदूर - दहशतवादाविरोधातल्या भारताच्या धोरणाची नवी परिभाषा’, या
विषयावरच्या निबंध स्पर्धंच आयोजन केलं आहे. या स्पर्धेतल्या पहिल्या तीन
विजेत्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाईल, तसंच
त्यांना नवी दिल्ली इथं होणाऱ्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला उपस्थित
राहण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धा सर्वांसाठी खुल्या असून, स्पर्धकांना
येत्या ३० जून पर्यंत माय जी.ओ.व्ही. या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल.
****
सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल मुंबईतल्या छत्रपती
शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर, वन्यजीवांची तस्करी करत
असलेल्या एका व्यक्तीला अटक केली. अधिकाऱ्यांनी त्याच्याकडून धोक्यात असलेल्या
विविध प्रजातींचे ५२ जिवंत आणि १ मृत वन्यजीव जप्त केले. यासंदर्भातली खात्रीशीर
माहिती मिळाल्यानंतर सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी विमानतळावर सापळा रचून ही
कारवाई केली.
****
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथल्या स्वामी विवेकानंद शिक्षक
सहकारी पतसंस्थेतला आणखी एक मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. पतसंस्थेत वर्ष २०००
ते २०१२ या कालावधीत एकूण दोन कोटी २९ लाख ९३ हजार ७१७ रुपयांचा अपहार आणि
गैरव्यवहार झाल्याचं,
विशेष लेखापरीक्षक सतीष काकासाहेब पोकळे यांनी केलेल्या
चाचणी लेखा परीक्षणातून स्पष्ट झालं आहे. याप्रकरणी एकूण १५ जणांविरुद्ध अंबाजोगाई
शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतसंस्थेचा तत्कालीन अध्यक्ष
कुरेशी मुजीब अहेमद अब्दुल रहिम याच्या कार्यकाळातच सर्वाधिक गैरव्यवहार झाल्याचं
अहवालात नमूद आहे.
****
सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या माध्यमातून खऱ्या
अर्थानं माणसं निर्माण केली जातात आणि समाज घडतो, असं प्रतिपादन
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केलं. सांगली जिल्ह्यातल्या मिरज
इथं दोन वसतिगृहांच्या इमारतींचं उद्घाटन काल शिरसाट यांच्या हस्ते झालं, त्यावेळी
ते बोलत होते. भाडेतत्त्वावरच्या इमारतीत सुरू असणारी वसतिगृहं भविष्यात शासकीय
इमारतीत व्हावीत,
यासाठी प्रयत्न राहील, असं शिरसाट म्हणाले.
****
आषाढी एकादशीसाठी बुलडाणा जिल्ह्यातल्या शेगाव येथून संत
श्री गजानन महाराज संस्थान मधून संत श्री गजानन महाराजांची पालखी आज प्रस्थान
करणार आहे. या पालखीत ७०० वारकरी आहेत. पालखीचं हे ५६ वं वर्ष असून, अनेक
भक्त शेगाव शहरात पालखी सोहळ्याकरता उपस्थित राहणार आहेत.
****
श्री तुळजाभवानी मंदिर परिसरातल्या अनधिकृत ओटी
विक्रेत्यांवर सुरक्षा विभागाने कारवाई करत २१ पूजेची ताटे आणि एक फळ विक्रीचं
कॅरेट जप्त केले. देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची अनधिकृत विक्रेत्यांकडून
फसवणूक होणार नाही आणि मंदिर परिसरातली सुव्यवस्था अबाधित राहील याची दक्षता
सुरक्षा विभाग घेत आहे.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम
सामना उद्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु आणि पंजाब किंग्ज संघादरम्यान होणार आहे. काल
झालेल्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात पंजाबच्या संघाने मुंबई इंडियन्सचा पाच गडी
राखून पराभव करत अंतिम फेरी गाठली. मुंबईच्या संघाने प्रथम फलंदाजी करत निर्धारित
षटकात २०३ धावा केल्या. पंजाब किंग्जने पाच गडी गमावत हे लक्ष्य साध्य केलं.
****
बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनचा प्रवास सध्या रखडलेला
असून, १० जूनपर्यंत राज्यात पावसाचं प्रमाण कमीच राहाणार आहे. अशा परिस्थितीत
कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून पेरणीची घाई करू नये, असा
सल्ला कृषी विभागानं विशेषतः कोरडवाहू शेतकऱ्यांना दिला आहे. किमान १० जूनपर्यंत
राज्यात बहुतांश भागात हवामान कोरडं राहणार आहे. यामुळे तापमानात वाढ होणार असून, विदर्भात
तापमान ४० अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या कोरड्या हवामानाचा वाईट परिणाम
पेरणी आणि लागवडीवर पडण्याची शक्यता कृषी विभागानं वर्तवली आहे.
****
हवामान
येत्या दोन दिवसांत कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा
आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
****
No comments:
Post a Comment