Tuesday, 3 June 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 03.06.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 03 June 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ जून २०२ सकाळी .०० वाजता

****

राज्य सरकारनं कोविड प्रतिबंधासाठी नवीन नियमावली जारी केली आहे. इन्फ्लुएन्झासदृश ताप आणि गंभीर श्वसन आजारानं संक्रमित असलेल्या रुग्णांपैकी पाच टक्के रुग्णांची तपासणी करण्याच्या सूचना आरोग्य विभागानं नगर परिषद, जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनांतर्गत असलेल्या सर्व आरोग्य सेवा केंद्रांना दिल्या आहेत. राज्यात सध्या कोविडचे ५०६ सक्रीय रुग्ण आहेत.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातल्या अग्रणी हवाई वाहतूक कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्याचं आमंत्रण दिलं आहे. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या ८१व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते काल बोलत होते. बाजारपेठ, तंत्रज्ञान तसंच नवोन्मेषासाठी वाव आणि व्यापारासाठी खुलं धोरण, यामुळे भारत जगातलं वेगानं विकसित होणारं तिसरं मोठं हवाई क्षेत्र असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. भारत सरकारच्या उडान योजनेचा उल्लेख करत पंतप्रधानांनी, २०१४ पासून देशातल्या हवाई क्षेत्रात झालेल्या बदलांची माहिती दिली. हवाई क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर झालेल्या सुविधांमुळे आगामी काळातही हे क्षेत्र मोठ्या बदलांचं केंद्र बनेल, असं पंतप्रधान म्हणाले. तर, पुढच्या पाच वर्षात देशात पन्नास विमानतळं विकसित करणार असल्याची घोषणा नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी यावेळी केली.

****

ऑपरेशन सिंदूरनंतर भारताची दहशतवादाविरुद्धची धोरणात्मक आणि दृढ भूमिका जगातल्या प्रमुख देशांसमोर मांडण्यासाठी गेलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळांच्या विविध देशांना भेटी सुरू आहेत. काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं काल ब्राझीलच्या विविध अधिका-यांची भेट घेतली. हे प्रतिनिधीमंडळ आज अमेरिकेला भेट देणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालच्या मंडळानं इजिप्तला तर शिवसेना नेते श्रीकांत शिंदे यांच्या शिष्टमंडळानं लायबेरियाला भेट दिली. द्रमुक नेत्या कनिमोळी यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ आपल्या चार देशांच्या भेटी पूर्ण करून आज भारतात परतत आहे.

****

व्हिएतनाममध्ये भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष महिनाभर ठेवल्यानंतर आज भारतात परत आणणयात आले. व्हिएतनाममधील प्रदर्शन २१ मे रोजी संपणार होते, मात्र, व्हिएतनाम सरकारच्या विनंतीवरुन भारतानं हे प्रदर्शन दोन जूनपर्यंत ठेवले. या दौऱ्यात भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष नऊ शहरांमध्ये दर्शनासाठी ठेवण्यात आले होते, ज्याला एक कोटींहून अधिक भाविकांनी भेट दिली.

****

केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे जिल्ह्यात नारायणगाव इथं ते टोमॅटो बाजारपेठेला भेट देणार असून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते पुण्याच्या कृषी महाविद्यालयाला भेट देणार असून तिथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विकसित कृषी संकल्प अभियानाअंतर्गत सुरू असलेल्या कृषी हॅकेथॉन कार्यक्रमात चौहान सहभागी होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत आज पुण्यातल्या बालेवाडी क्रीडा संकुलात प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांचा मेळावा तसंच महा आवास अभियानाचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळाही होणार आहे.

****

द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया - आय सी ए आय नं सप्टेंबर २०२५ मध्ये होणाऱ्या सनदी लेखापाल - सीए परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. या परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पाच जुलैपासून सुरू होणार आहे. ही परीक्षा तीन ते बावीस सप्टेंबर दरम्यान होणार असल्याचं ICAI ने सांगितलं आहे.

****

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री, भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची आज पुण्यतिथी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनी त्यांना अभिवादन केलं आहे.

****

आगामी ईद सणानिमित्त मुंबईबरोबरच राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल आढावा घेतला. आगामी ईदसाठी शासनानं योग्य नियोजन केलं असून, या काळात कायदा आणि सुव्यवस्था चोख राखत सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयानं काम करावं, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी संबंधित अधिका-यांना दिले.

****

इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना होणार आहे. संध्याकाळी साडे सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.

****

विश्वविजेता डी गुकेशनं नॉर्वे बुद्धीबळ स्पर्धेच्या सातव्या फेरीत काल ग्रँडमास्टर अर्जुन एरिगसीवर विजय मिळवला. गुकेशनं मॅग्नस कार्लसनला हरवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अर्जुनवर विजय मिळवला आहे. आता स्पर्धेत त्याच्यापुढे केवळ फेबियाने कारुयाना आघाडीवर आहे.

****

No comments: