Wednesday, 4 June 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.06.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 04 June 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०४ जून २०२ दुपारी १.०० वा.

****

केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया योजनेचा राज्याला मोठा लाभ झाल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते आज मुंबईत बँक ऑफ अमेरिका फ्लॅगशिप इंडिया परिषदेत बोलत होते. महाराष्ट्राची वाटचाल संरक्षण उत्पादन निर्मिती हब आणि स्टार्ट अप हबच्या दिशेनं सुरु असल्याचं ते म्हणाले. राज्याच्या प्रशासनात डिजीटल तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करुन जनतेला सुलभता देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. महानगरांवरील वाढता भार कमी करण्यासाठी टीयर टू, टीयर थ्री शहरं विकसित करण्यात येत आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून औद्योगिकरणाचे विकेंद्रीकरण करुन छत्रपती संभाजीनगर, नांदेड, गडचिरोली ही शहरं विकसित करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

****

दहशतवादाविरुद्ध भारताने आपली भूमिका जगासमोर मांडण्यासाठी नियुक्त केलेल्या सात बहुपक्षीय शिष्टमंडळांपैकी चार शिष्टमंडळ संबंधित देशांच्या यशस्वी दौऱ्यानंतर भारतात परतले आहेत. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज सकाळी नवी दिल्लीत पोहोचलं. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील बहुपक्षीय शिष्टमंडळ आज दुपारी मायदेशी परतणार आहे. खासदार रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील संसदीय शिष्टमंडळ सध्या बेल्जियममधील ब्रुसेल्स येथील युरोपियन युनियन मुख्यालयाच्या भेटीवर आहे. काँग्रेस खासदार डॉ. शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळानं वॉशिंग्टन डीसी इथं अमेरिकन काँग्रेसचे सदस्य, प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन दहशतवादाविरुद्ध भारताच्या भूमिकेची माहिती दिली.

****

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पत धोरण बैठकीला आज सुरुवात झाली. या बैठकीत रेपो दर कपातीसंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली, परवा शुक्रवारी या समितीच्या निर्णयाची घोषणा केली जाईल. रिझर्व बँकेनं गेल्या दोन आढाव्यात रेपो दरात ५० बेस पॉईंटनी कपात करत रेपो दर ६ टक्क्यांवर ठेवला आहे.

****

देशभरात मोठ्या प्रमाणावर सुरु असलेल्या बँकिंग क्षेत्रातल्या फसवणुकीत सहभागी टोळीचा दिल्ली पोलिसांच्या सायबर शाखेनं छडा लावला आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी १५ संशयितांना अटक केली आहे. अनेक माध्यमांतून ही टोळी सक्रीय होती आणि बोगस कर्जवाटपासाठी ग्राहकांना संपर्क करत होती. या शिवाय सुनियोजित पद्धतीने अनेकांना अश्लील चित्रफितीच्या माध्यमातून धमकावत असल्याचं उघडकीस आलं आहे. ही टोळी बँक कीट्स खरेदी करुन नागरिकांना मोठ्या कर्जाचं आमिष देऊन सायबर गुन्हेगारी करत असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.

****

शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमाचं रायगड किल्ल्यावर तारखेनुसार सहा जून आणि तिथीनुसार नऊ जून रोजी आयोजन करण्यात आलं आहे. यावर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्याला साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे याठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमाला शिवप्रेमी नागरिकांची मोठी उपस्थिती राहणार आहे. संभाव्य गर्दी लक्षात घेऊन शिवराज्याभिषेक सोहळ्यासंदर्भात कार्यक्रमांची पूर्वतयारी करताना संबंधित विभागांनी सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी आज आढावा बैठकीत दिले.

****

रायगड जिल्ह्यातली प्रसिद्ध नेरळ - माथेरान मिनी ट्रेन पुढील सूचनेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. दरवर्षी पावसाळ्यात माथेरानची ही मिनीट्रेन बंद ठेवली जाते आणि पावसाळा संपल्यावर ती पुन्हा सुरू होते. मात्र, अमन लॉज ते माथेरान दरम्यानची शटलसेवा सुरू राहणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

सुमारे ९०० कोटी रुपयांचा संचित तोटा असलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी राज्य सहकारी बँकेची संस्थात्मक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सध्या प्रशासक असून या बँकेची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे. या बँकेचा परवाना रद्द करण्याची नोटीसही रिझर्व बँकेने दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर या बँकेला वाचवण्यासाठी विद्याधर अनास्कर यांच्या नेतृत्वाखालील राज्य सहकारी बँकेची संस्थात्मक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

****

ज्येष्ठ साहित्यिक पु.ल. देशपांडे यांचा पंचविसावा स्मृतीदिन आणि सुनिता देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त येत्या ९ ते १२ जून या कालावधीत पुण्यात ग्लोबल पुलोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यंदाचा पुलोत्सव जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ सरोद वादक उस्ताद अमजद अली खान यांना, पु. ल. स्मृती सन्मान ज्येष्ठ रंगकर्मी सई परांजपे यांना, विशेष सन्मान दिवंगत प्रभा अत्रे यांना, तर पु. ल. कृतज्ञाता सन्मान चिंतामणी हसबनीस यांना प्रदान केला जाणार आहे. महोत्सवाचे निमंत्रक आणि उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल ही घोषणा केली.

****

No comments: