Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 05 June 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ जून २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
आज जागतिक पर्यावरण दिन सर्वत्र विविध
कार्यक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या औचित्याने सर्वांना
वसुंधरेच्या रक्षणासाठी प्रयत्न करण्याचं तसंच यासाठी येणाऱ्या आव्हानांवर मात करण्यासाठी आपले प्रयत्न
आणखीन मजबूत करण्याचं आवाहन केलं आहे.
पर्यावरण संवर्धन आणि रक्षणासंदर्भात पंतप्रधानांनी
सामाजिक प्रसार माध्यमावर एक चित्रफीत जारी केली असून पर्यावरणाला हरित बनवण्याचं संवर्धनाचं
कार्य करण्यासाठी विशेष योगदान देणाऱ्यांची प्रशंसा केली आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या जम्मू
काश्मीरच्या दौर्यावर जाणार असून, जगातला सर्वात उंच रेल्वे
कमान पूल -चिनाब पुलाचं ते उद्घाटन करणार आहेत. स्थापत्यशास्त्रातील अद्भुत असा चिनाब
रेल्वे पूल नदीपात्रापासून ३५९ मीटर उंचीवर असून, हा एक हजार ३१५
मीटर लांबीचा पोलादी कमानदार पूल आहे. जो
भूकंप आणि वाऱ्याच्या परिस्थितीला तोंड देण्याच्या दृष्टीने आरेखित केलेला आहे. या
पुलामुळे जम्मू आणि श्रीनगरमधील संचारसंपर्क आता वाढू शकेल. त्याचबरोबर अंजी या देशातल्या
पहिला केबल-स्टेड रेल्वे पुलाचं उद्घाटन, तसंच कटरा
इथं ४६ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पणही पंतप्रधानांच्या
हस्ते होणार आहे.
****
गंगा दशहराच्या मुहुर्तावर, प्रभु श्रीरामांची जन्मभूमी अयोध्येत आज प्रभु श्रीराम आणि अन्य देवी
देवतांच्या मूर्तींची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे.
****
पुढील महिन्याच्या २१ तारखेपासून
सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचं वेळापत्रक केंद्रसरकारनं काल जाहीर केलं.
ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यासाठी संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याच्या विरोधी पक्षांच्या
मागणीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू
यांनी वार्ताहरांना नवी दिल्लीत सांगितलं. हे अधिवेशन १२ ऑगस्टपर्यंत चालेल.
****
देशातली जनगणना एक ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणार असल्याचं, केंद्रीय गृहमंत्रालयानं सांगितलं
आहे. ही जनगणना दोन टप्प्यात होईल. एक ऑक्टोबर २०२६ पासून जम्मू काश्मीर, लडाख, उत्तराखंड, आणि हिमाचल प्रदेशमध्ये
जातनिहाय जनगणनेला सुरुवात होईल. तर १ मार्च २०२७ पासून देशातल्या उर्वरित राज्यांमध्ये
जनगणना सुरू होईल.
****
लातूर ते मुरूड या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे
कराड - लातूर ही एसटी बस घसरून एका बाजूला
पलटी झाली. ज्यात जवळपास १५ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना मुरुड अकोला ते
रामेगाव दरम्यान काल रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास घडली. चालकाने प्रसंगावधान दाखवल्यामुळे
मोठी दुर्घटना टळली. जखमींना लातूर इथल्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय संस्थेत
उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
****
महायुती सरकारने राज्यातील शेतकऱ्यांच्या
जमिनीच्या वाटणी पत्रकाच्या दस्तासाठी लागणारं नोंदणी शुल्क माफ करण्याचा घेतलेला निर्णय शेतकऱ्यां साठी मोठा हिताचा असल्याचं मत
भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश सचिव तथा धाराशिवाचे माजी जिल्हा परिषद सदस्य
रामदास कोळगे यांनी व्यक्त केलं आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्याच्या आर्थिक फायद्यासोबतच
कुटुंबातले वादही कमी होणार असल्याचं कोळगे
यांनी म्हटलं आहे.
****
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी
मॉल उभारण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी या धोरणावर आधारित धोरण तयार करावं अशा
सूचना कृषीमंत्री कोकाटे यांनी दिल्या आहेत. सोलापूर इथं कृषी भवन आणि बाजारपेठ मॉल
उभारण्यात येणार आहे. या मॉलमुळे शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठ उपलब्ध होईल तसंच शहरातील
नागरिकांना, शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला भाजीपाला, फळे आणि बाकीची कृषी आधारित उत्पादने
थेट व माफक दरात खरेदी करता येतील. याच धर्तीवर राज्यात कृषी विभागाकडे
उपलब्ध असलेल्या जमिनीवर प्रत्येक जिल्ह्यात कृषी मॉल उभारल्यास शेतक-यांना याचा फायदा
होईल, असं कोकाटे म्हणाले. एक पीक एक गाव
ही संकल्पना देखील विकसित करण्यासाठी कृषीविभाग विचाराधीन आहे.
****
शालेय शिक्षण विभागानं शैक्षणिक गुणवत्ता
संवर्धनासाठी वार्षिक कृती आराखडा विकसित केला
असून येत्या शैक्षणिक वर्षात अधिका-यांनी त्याची प्रभावी अंमजबजावणी करावी, असं प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री
दादाजी भुसे यांनी केलं आहे. राज्यातील
प्रत्येक मुलाला चांगलं आणि दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी शिक्षण विभाग कटीबद्ध आहे. शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी राज्यातील
शाळांमध्ये पायाभूत आणि भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिलं जात आहे.
तसंच प्रत्येक विद्यार्थ्याचं हेल्थ कार्ड तयार करण्यात येणार असून त्याअंतर्गत नियमित
आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याचं मंत्री दादा भुसे म्हणाले.
****
No comments:
Post a Comment