Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 08 June
2025
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ जून २०२५ सकाळी ७.१० मि.
****
· नदीजोड
प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून राज्यातल्या पाणी प्रश्नावर यशस्वी
मात करु - मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
· कुठल्याही
शैक्षणिक दाखल्यासाठी स्टॅम्प पेपरची मागणी न करण्याचे महसूलमंत्र्यांचे निर्देश
· गेल्या
११ वर्षात देशात सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या तत्वांच्या माध्यमातून मध्यमवर्गाचं
सक्षमीकरण
· महाराष्ट्र
विधानसभा निवडणुकीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे दावे निराधार असल्याचं निवडणूक
आयोगाचं स्पष्टीकरण
· देशभरात
बकरी ईदचा सण पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा
आणि
· मराठवाड्यासह
राज्यातल्या अनेक भागात पुढील दोन ते तीन दिवस जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा
****
नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील
जलसंधारणाच्या कामातून राज्यातल्या पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु, असा विश्वास
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नागपूर इथं काल राष्ट्रसंत तुकडोजी
महाराज विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि जनकल्याणकारी समिती यांच्या संयुक्त
विद्यमाने आयोजित तीन दिवसीय विदर्भ पाणी परिषदेचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते
झाल, त्यावेळी ते बोलत होते.
पश्चिमी वाहिनीतल्या नद्यांचं
समुद्रात वाहून जाणाऱ्या पाण्यापैकी ५४ टी.एम.सी. पाणी गोदावरी खोऱ्यात आणणं, नळगंगा-वैनगंगा
नदीजोड प्रकल्पाद्वारे विदर्भातल्या अर्वषणग्रस्त भागात पाणी आणणं, तापी खोऱ्यातलं
जे पाणी गुजरात मार्गे समुद्रात वाहून जातं त्यातलं ३५ टी.एम.सी. पाणी तापी खोऱ्यातच
राहील, असं नियोजन केलं आहे. या प्रकल्पातून भविष्यातला महाराष्ट्र हा दुष्काळाचा आव्हानावर
यशस्वी मात करुन उभा राहिलेला महाराष्ट्र म्हणून ओळखला जाईल, असं मुख्यमंत्री
म्हणाले.
****
शासकीय कार्यालयातल्या ई
- सेवा केंद्रातून विविध शैक्षणिक दाखले तसंच न्यायालयातील प्रतिज्ञापत्रासाठी शंभर
किंवा पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरची करण्यात येणारी मागणी नियमबाह्य असल्याचं महसूल
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. यापुढे अशा स्टॅम्प पेपरची मागणी करण्यात
येऊ नये, अशा आशयाचं पत्र त्यांनी, राज्यातल्या सर्वच विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय
अधिकारी, तहसीलदारांना पाठवलं आहे. साध्या कागदावर स्वयं-प्रमाणित शपथपत्र सादर करणं पुरेसं
असल्याचं, बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.
****
गेल्या ११ वर्षात सेवा, सुशासन
आणि गरीब कल्याण या तत्वांच्या माध्यमातून देशातल्या नागरिकांच्या जीवनमानात आमुलाग्र
परिवर्तन घडून आलं आहे. गेल्या ११ वर्षातील प्रमुख क्षेत्रांत झालेल्या बदलांचा आढावा
आकाशवाणी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. आज आपण मध्यमवर्गाचं सक्षमीकरण करणाऱ्या आर्थिक
सुधारणांविषयी जाणून घेऊया.
‘‘गेल्या दशकभराच्या
कार्यकाळात सरकारनं मध्यमवर्गाची आर्थिक प्रगती केंद्रस्थानी ठेवली आहे. कर
सुधारणा आणि दिलासा, सामाजिक सुरक्षा आणि कौशल्य
विकास या त्रिसूत्रीच्या माध्यमातून सरकार मध्यमवर्गाचं सक्षमीकरण करत आहे. २०२५-२६
च्या केंद्रीय अर्थसंकल्पात नवीन कर रचनेत १२ लाख रुपयांपर्यंत करमाफी करण्यात आली
आहे. तसंच पूर्वसंकलित आयकर परतावा पद्धत जलद, सुलभ
आणि अधिक पारदर्शक केली आहे. एकात्मिक निवृत्तीवेतन योजनेच्या माध्यमातून २५ वर्ष
सेवा झालेल्या कर्मचाऱ्याला मूळ वेतनाच्या अर्ध्या निवृत्तीवेतनाची सुनिश्चिती
सरकारनं केली आहे.
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून एक
कोटी ६३ लाखांहून अधिक युवकांना उद्योगप्रणित प्रशिक्षण देण्यात आलं आहे. तर, नॅशनल
ऍप्रेन्टससीशप योजनेचा २०१६ पासून ४० लाखांहून अधिक युवकांना लाभ झाला आहे. मध्यमवर्गाच्या
सक्षमीकरणासाठी सरकार नागरिकांच्या समस्या ऐकून व्यवस्था सुलभीकरणाला प्राधान्य
देत वचनांची पूर्तता करत आहे.’’
****
केंद्र सरकारने सुरु केलेल्या
स्टार्ट अप इंडिया या योजनेमुळे अनेक नवउद्योजकांना चालना मिळाली. छत्रपती संभाजीनगरचे
उद्योजक गणेश शेळके यांना या योजनेमुळे नवीन उद्योग त्यांना सुरु करता आला. याबद्दल
ते सांगतात,
बाईट – गणेश शेळके, उद्योजक
****
काँग्रेस नेते राहुल गांधी
यांनी राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या संदर्भात केलेले दावे निराधार
असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. राज्याच्या मतदार यादीसंदर्भात त्यांनी केलेले
आरोप कायद्याचा अवमान करणारे असल्याचंही आयोगानं सांगितलं. राहुल गांधी यांनी राज्यातल्या
निवडणुकीच्या निकालासंदर्भात लिहिलेला लेख विविध वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला, त्यावर
निवडणूक आयोगानं ही प्रतिक्रिया दिली आहे. मतदारांकडून अपेक्षित कौल नाही मिळाला, म्हणून
निवडणूक आयोग पक्षपाती असल्याचा आरोप करणं हास्यास्पद आहे. काँग्रेसनं केलेल्या आरोपांवर
२४ डिसेंबर रोजीच आयोगानं सर्व तथ्यांसह प्रत्युत्तर दिलं आहे आणि ते आयोगाच्या वेबसाइटवर
उपलब्ध असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.
****
देशभरात काल ईद-ऊल-अझहा अर्थात
बकरी ईदचा सण पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. मुस्लिम बांधवांनी ईदगाह
आणि मशिदीत जाऊन ईद निमित्त नमाज पठण करुन, परस्परांना शुभेच्छा दिल्या.
छत्रपती संभाजीनगर शहरात छावणी परिसरातल्या ईदगाह मैदानावर नमाज पठण करण्यात आलं. बीड
शहरात २७ ठिकाणी नमाज अदा करण्यात आली. जालना शहरातही मुस्लीम समुदायाने कदीम जालना
ईदगाह मैदानावर सामुहिक नमाज अदा केली.
****
गोड्या पाण्यातल्या मासेमारी
व्यवसायावर स्वतंत्र धोरण तयार करण्याचं राज्य सरकारच्या विचाराधीन असल्याचं, राज्याचे
मत्स्यविकास मंत्री नितेश राणे यांनी सांगितलं. ते काल धाराशिव इथं पत्रकार परिषदेत
बोलत होते. धाराशिव जिल्ह्यातल्या मत्स्य व्यवसायात आणि मत्स्य व्यवसाय अंमलबजावणीत
पारदर्शकता दिसली नाही तर, तलाव ठेका देण्याच्या प्रक्रियेत बदल करण्याची गरज असल्याचं
ते म्हणाले.
****
बीडच्या जिल्हा क्रीडा संकुलात, जिल्हा
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि जिल्हा क्रिडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
बारा दिवसीय "आपदा मित्र प्रशिक्षण" कार्यक्रमाचं उद्घघाटन निवासी जिल्हाधिकारी
शिवकुमार स्वामी यांच्या हस्ते काल करण्यात आलं. नैसर्गिक आपत्तींमधून नागरिकांचे प्राण
वाचवण्यासाठीचं प्रशिक्षण या कार्यक्रमात दिलं जात आहे.
****
येत्या २१ जून रोजी ११ वा
आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येणार आहे. योग दिनाला १३ दिवस बाकी आहेत. आज
जाणून घेऊया, योगशिक्षक डॉ. शैलेश माकणीकर यांनी दिलेली, ताडासनाविषयी माहिती.
बाईट – डॉ. शैलेश
माकणीकर
****
लातूरच्या वसुंधरा प्रतिष्ठानतर्फे
खिळेमुक्त झाड अभियान राबवण्यात येत आहे. यात व्यावसायिकांनी झाडांना खिळे ठोकून लावलेले
फलक प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी काढून टाकले. व्यावसायिकांनी झाडांना खिळे न ठोकण्याचं
तसंच याबाबत प्रशासनानं कारवाई करण्याचं आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आलं आहे.
****
जालना इथं काल शिवसेना उद्धव
बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महायुती सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. बदनापूर
तालुक्यातल्या बाजार गेवराई इथं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत झालेल्या
या आंदोलनात सरकारला विविध आश्वासनांची पूर्तता न केल्याबद्दल जाब विचारण्यात आला.
****
राज्यातल्या आगामी स्थानिक
स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढवणार आहे, मात्र गरज पडल्यास या निवडणुका
स्वबळावर लढवण्याची देखील तयारी असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे
परभणी जिल्हाध्यक्ष आमदार राजेश विटेकर यांनी म्हटलं आहे. ते काल परभणी इथं पक्षाच्या
संवाद आणि संघटनात्मक बैठकीत बोलत होते.
लातूर जिल्हा भाजपचे ग्रामीण
जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील मुरूमकर आणि भाजप शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनीही
काल स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातल्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधींची
बैठक घेतली.
****
राज्यातल्या अनेक भागात पुढील
दोन ते तीन दिवस वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागानं
दिला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाचा, तर कोकणात
हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.
****
No comments:
Post a Comment