Saturday, 21 June 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 21.06.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 21 June 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ जून २०२ दुपारी १.०० वा.

****

इस्रायल-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं इराणमध्ये अडलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी राबवलेल्या ऑपरेशन सिंधू मोहिमेअंतर्गत आज दुपारी मशाद इथून दोन विमानं दिल्लीला आली आहेत. दरम्यान, आतापर्यंत एकूण ५१७ भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांना भारतात सुखरुप आणण्यात आलं. तत्पुर्वी काल साडे तीनशेहून अधिक भारतीय विद्यार्थी मध्यरात्री दोन विमानांनी नवी दिल्लीमध्ये आले आहेत. इराणनं भारतासाठी आपलं हवाई क्षेत्र काही वेळ खुलं करुन भारताला सहकार्य केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

२०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी एकूण प्रत्यक्ष कर संकलन चार पुर्णांक आठ टक्क्यांनी वाढून १९ जूनपर्यंत सुमारे ५ लाख ४५ हजार कोटी रुपये झाले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कर संकलन सुमारे ५ लाख १९ हजार कोटी रुपये होते. निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात एक दशांश तीन टक्क्यांनी किरकोळ घट झाली. ही घट जारी केलेल्या परताव्यांमुळे झाली आहे.

आयकर विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आगाऊ कर संकलन एक लाख ५५ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे, हे संकलन तीन दशांश आठ टक्के इतकी वाढ दर्शवत असून बिगर- सामुदायिक करदात्यांच्या संकलनात दोन दशांश सहा टक्क्यांनी घट झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

जागतिक समुदायाला योगाबद्दल अधिक आदर निर्माण झाला असून योग हा केवळ व्यायामाचा एक प्रकार नाही, तर निरोगी आणि संतुलित जीवनशैलीचा आधार असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. योगदिनानिमित्त आज डेहराडूनमध्ये पोलिस लाईन इथं आयोजित योग शिबिराला राष्ट्रपतींनी संबोधित केलं. दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करण्याचं महत्त्वही त्यांनी यावेळी अधोरेखित केलं.

****

११वा आंतरराष्ट्रीय योग दिन जगभरात उत्साहाने साजरा केला जात आहे. देशविदेशात आज योगदिनाचे कार्यक्रम घेतले जात आहेत. श्रीलंकेत आज सकाळी स्वातंत्र्य चौकात श्रीलंकेच्या अनेक वरिष्ठ मंत्र्यांसह एक हजार लोकांनी योगासनं केली. भारतीय उच्चायोगानं श्रीलंकेच्या आयुर्वेद विभागाच्या सहकार्यानं १९ जून रोजी श्रीलंकेतील सर्व आयुर्वेद प्रतिष्ठानांमध्ये एकाच वेळी विक्रमी ११७ कार्यक्रमांचे आयोज केलं. बांगलादेशात ढाका इथंही भव्य योग कार्यक्रम घेण्यात आला.

****

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांच्या उपस्थितीत मुंबई इथं संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासह ठिकठिकाणी जागतिक योग दिनाचे उपक्रम पार पडले. यावेळी आजी माजी लोकप्रतिनिधींसह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

****

छत्रपती संभाजीनगर इथं आंतरराष्ट्रीय योगादिनानिमित्त बीबी का मकबरा परिसरात आज सकाळी योग उपक्रम संपन्न झाला. योग ही आपल्या संस्कृती भाग असून सर्व अर्थानी योग आरोग्यासाठी महत्वपूर्ण असल्याचं खासदार डॉ. भागवत कराड यांनी यावेळी म्हटलं, तर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी धावपळीच्या जीवनात आरोग्य सुदृढ आणि निरोगी ठेवण्यासाठी सर्वांनी दैनंदिन जीवनात योग अंगीकारावा असं आवाहन केलं. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्यासह विविध योग संस्थेचे प्रतिनिधी, महानगरपालिका व विविध विभागाचे अधिकारी, नागरिक उपस्थित होते.

****

हिंगोली इथं संत नामदेव कवायत मैदानावर योग दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमाला आमदार तानाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

****

नांदेड जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, पोलिस अधीक्षक कार्यालय आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं पोलिस कवायत मैदान इथं योग शिबीर घेण्यात आलं. या कार्यक्रमास नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आदींची उपस्थिती होती, भक्ती लॉन्स इथं राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर आणि आमदार बालाजी कल्याणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत योग शिबीर घेण्यात आलं.

****

लातूर इथं राजा नारायणलाल इंग्लिश स्कूलच्या वतीनं दरवर्षी योगाचे महत्त्व सांगणारा संदेश रांगोळीच्या माध्यमातून दिला जातो. यंदाही शहरातील प्रमुख चौकासह सात ठिकाणी ही रांगोळी काढली जात आहे. वाशिम इथं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं वाटाणे मंगल कार्यालयात आणि शिर्डी इथंही साईबाबा योग ट्र्स्टच्या वतीनं योग दिवस साजरा करण्यात आला.

****

सांगली जिल्ह्यात योगिनी स्मार्त एकादशी आणि जागतिक संगीत दिनानिमित्त भक्तीयोगाचा विश्वविक्रम करण्यात आला. जिल्हा परिषद, विश्व योग दर्शन केंद्र  आणि चितळे डेअरी यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित भक्तियोगामध्ये  जिल्ह्यातील पाच लाखांपेक्षा जास्त नागरिक सहभागी झाले होते. मुख्य केंद्राच्या माध्यमातून सोळाशे केंद्रांवर आभासी पद्धतीनं एकाच वेळी आणि एकाच तालावर योगासनं करण्यात आली.

****

आज सकाळपासून रत्नागिरी तालुक्यात अधूनमधून अत्यंत जोरदार पावसाच्या सरी कोसळत असून खेडमधली जगबुडी नदी सध्या इशारा पातळीवरून वाहत आहे.

****

क्रिकेट - भारत आणि इंग्लंड यांच्यात हेडिंग्ले इथं सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी काल भारतानं तीन बाद ३५९ धावा केल्या. आज दुसऱ्या दिवसाचा खेळ दुपारी साडे तीन वाजता सुरू होईल. भारताचा कर्णधार शुभमन गिल १२७ आणि उपकर्णधार ऋषभ पंत ६५ धावांवरुन आपला खेळ पुढे सुरु करतील. तत्पुर्वी काल यशस्वी जयस्वालनं १०१ धावा पूर्ण केल्या आणि के. एल. राहुलनं ४२ धावांची खेळी करत भारताला शानदार सुरुवात करुन दिली.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 25.12.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 25 December 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छ...