Saturday, 21 June 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 21.06.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 21 June 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ जून २०२ सकाळी.०० वाजता

****

योग ही जगभरातल्या कोट्यवधी लोकांची जीवनशैली झाली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज साजरा होत आहे. योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आंध्रप्रदेशात विशाखापट्टणम् इथं पार पडला, या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना पंतप्रधानांनी सामाजिक समरसतेची भारताची भूमिका मांडतानाच, जगभरात सध्या असलेल्या तणावातून योगसाधनाच आपल्याला शांततेचा मार्ग दाखवते, असं नमूद केलं. ते म्हणाले...

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

यानंतर झालेल्या योगाभ्यासात पंतप्रधानांसह केंद्रीय मंत्री के. राममोहन नायडू, आयुष मंत्री प्रतापराव जाधव, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले. सुमारे अकरा लाखाहून अधिक नागरिकांनी यावेळी एकत्रितपणे योगासनं केली. योगाभ्यास करणाऱ्या नागरिकांच्या गर्दीने विशाखापट्टण शहरातले रस्ते, मैदानं आणि समुद्रकिनारे असा सुमारे २६ किलोमीटरचा परिसर फुलून गेला होता. समुद्रातही नौदलाच्या जहाजांवर नौसैनिकांनी योगाभ्यास केला.

****

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर इथंही बिबी का मकबरा या ऐतिहासिक स्मारकाच्या प्रांगणात योगाभ्यास करण्यात आला. हिंगोली इथं संत नामदेव कवायत मैदानावर योगाभ्यास करण्यात आला. आमदार तानाजी मुटकुळे यांच्यासह अनेक नागरिक यात सहभागी झाले. मराठवाड्यात इतर सर्वच जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होत योगाभ्यास केला. तर, नागपूर इथं झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेकांनी योगाभ्यास केला.

****

पुण्यात राज्य सरकारच्या पुढाकाराने भव्य वारकरी भक्तीयोग उपक्रम घेण्यात आला. सावित्रीबाई फुले विद्यापीठात आज सकाळी झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह नागरिक तसंच वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

****

संसदेच्या अंदाज समितीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मुंबईत विधानभवनात येत्या २३ जूनला दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद होणार आहे. या राष्ट्रीय परिषदेमध्ये "अर्थसंकल्पीय अंदाजांचे पुनर्विलोकन आणि प्रभावी नियंत्रणात अंदाज समितीची भूमिका" या विषयावर विचारमंथन होईल. या दोन दिवसीय परिषदेमध्ये संसदेच्या तसेच सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अंदाज समित्यांचे प्रमुख तसंच सदस्य आणि राज्य विधीमंडळाचे सदस्य सहभागी होणार आहेत.

****

जागतिक संगीत दिनानिमित्त आज सांस्कृतिक कार्य विभागातर्फे पहिला सृजनशील आणि सांस्कृतिक रेडिओ महोत्सव घेण्यात येणार आहे. मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात होणार्या या महोत्सवात पाच रेडीओ संवादक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेणार आहेत. यावेळी ‘आशा रेडिओ गौरव पुरस्कार’ तसंच ‘महाराष्ट्र भूषण आशा भोसले’ पुरस्कार देण्यात येणार आहे. यासह आशा सर्वोत्कृष्ट कम्युनिटी रेडिओ केंद्र, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ मनोरंजन कार्यक्रम, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ सामाजिक कार्यक्रम, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट पुरुष निवेदक, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ महिला निवेदक, आदी पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

****

आषाढी एकादशी वारी करिता तीर्थक्षेत्र पंढरपूर इथं मानाच्या १० पालख्यांसोबत येणाऱ्या एकूण १४०० दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार रुपयांनुसार, २ कोटी ८० लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यास शासनानं मान्यता दिली आहे. या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत. हा निधी अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत वितरित करण्यात आलेला नसून सर्वसाधारण योजनेतील जाहिरात आणि प्रसिद्धीसाठी राखीव असलेल्या निधीतून उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गासाठी आरक्षित निधीवर कोणताही अन्याय झालेला नाही, असं सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभागाने स्पष्ट केले आहे.

****

परभणी जिल्ह्यातल्या संत जनाबाईंचे जन्मस्थान असलेल्या गंगाखेड इथं विदर्भ आणि अन्य भागातून येणाऱ्या पालख्या मुक्कामी थांबतात. शहरातील सवंगडी कट्ट्यातर्फे दिंडीतील वारकऱ्यांना विविध सोयी सुविधा पुरवल्या जातात. गेल्या अठरा तारखेपासून कट्ट्यातर्फे आरोग्य सेवा शिबीर सुरु आहे.

****

पॅरीस डायमंड लीग भालाफेक स्पर्धेत भारताचा नीरज चोपडा अव्वल ठरला आहे. नीरजने ८८ पूर्णांक १६ मीटर अंतरावर भाला फेकून या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं. जर्मनीचा आघाडीचा भालापेकपटू ज्युलियन वेबर ८७ पूर्णांक ८८ मीटर अंतरावर भाला फेकून दुसऱ्या क्रमांकावर राहिला.

****

No comments: