Sunday, 22 June 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 22.06.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 22 June 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ जून २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      गेल्या दशकभरात योग ही जगभरातल्या कोट्यवधी लोकांची जीवनशैली झाल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन-११ वा आंतरराष्ट्रीय योगदिवस उत्साहात साजरा

·      पुण्यात वारकरी भक्तीयोग उपक्रमात मुख्यमंत्र्यांसह वारकऱ्यांचा सहभाग-मराठवाड्यात योगाभ्यास शिबीरांना नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

·      स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘माझी वसुंधरा अभियानाचा सहावा टप्पा’ राबवण्याचा निर्णय

·      सृजनशील-सांस्कृतिक रेडिओ महोत्सवात आशा भोसले रेडिओ पुरस्कार प्रदान-पंडित विश्वनाथ ओक यांचा गौरव

आणि

·      इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या डावात भारत २६२ धावांनी आघाडीवर

****

गेल्या दशकभरात योग ही जगभरातल्या कोट्यवधी लोकांची जीवनशैली झाल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम काल आंध्रप्रदेशात विशाखापट्टणम् इथं पार पडला, या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना पंतप्रधानांनी सामाजिक समरसतेची भारताची भूमिका मांडतानाच, जगभरात सध्या असलेल्या तणावातून योगसाधनाच आपल्याला शांततेचा मार्ग दाखवते, असं नमूद केलं. ते म्हणाले...

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

**

मुंबईत राजभवनात झालेल्या योगसत्रात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सहभाग घेतला. सर्व विद्यापीठांमध्ये योगाभ्यास सुरू करण्याबाबत कुलगुरूंशी चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

**

पुण्यात राज्य सरकारच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या भव्य वारकरी भक्तीयोग उपक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह नागरिक तसंच वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी वार्ताहरांशी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले.

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

सांस्कृतिक मंत्रालयानं महाराष्ट्रासह देशभरातल्या १०० पर्यटन स्थळांवर आणि ५० सांस्कृतिक स्थळांवर योग प्रात्यक्षिकांचं सादरीकरण केलं.

****

दरम्यान, मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरासह सर्वच जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होत योगाभ्यास केला.

‘‘छत्रपती संभाजीनगर इथं ऐतिहासिक बीबी का मकबरा प्रांगणात योगाभ्यास करण्यात आला. माजी केंद्रीय मंत्री, खासदार डॉक्टर भागवत कराड यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने यात सहभागी झाले. शहरात अनेक ठिकाणच्या योग शिबिरांमध्ये नागरिकांनी उत्साहानं सहभाग घेतला. जालना इथं जिल्हा क्रीडा संकुलावर योगासनाचं प्रात्यक्षिक घेण्यात आल. योग अभ्यासक मनोज लोणकर, सुनीता मोटाळे, ज्ञानेश्वर ठोंबरे आदींनी उपस्थितांकडून प्राणायाम तसंच योगासनं करून घेतली. बीड इथं जिल्हा क्रीडा संकुलावर योग शिबीर घेण्यात आलं. धकाधकीच्या जीवनात तणाव मुक्त राहण्यासाठी, संच शारीरिक आणि मानसिक क्षमता कायम राखण्यासाठी दररोज योगासन करण्याचा आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केलं. शहरातून ‘योगदिंडी आपल्या दारी’ हा उपक्रमही आज राबवण्यात आला. नांदेड इथं भक्ती लॉन्सवर झालेल्या योगशिबीरात राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर आणि आमदार बालाजी कल्याणकर यांच्यासह शेकडो नागरिकांनी सहभागी होत योगाभ्यास केला. जिल्हा प्रशासनाच्या वतीने पोलीस कवायत मैदानावरही योग शिबीर घेण्यात आलं. लातूरचा जिल्हा क्रीडा संकुलावर झालेल्या योगाभ्याशिबिराला नागरिकांनी मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिला. जवळपास पाच हजारांहून वर नागरिक यात सहभागी झाले. आमदार विक्रम काळे यांच्यासह मान्यवरांनीही या शिबिरात सहभाग घेत योगासनं केली. परभणी इथं इंदिरा गांधी क्रीडा संकुलावर योगशिबीर घेण्यात आलं. नागरिक मोठ्या उत्साहात या शिबीरात सहभागी झाले. वसंतराव नाईक मराठावाडा कृषी विद्यापीठातही योग साधना शिबिर घेण्यात आलं. हिंगोली इथं संत नामदेव कवायत मैदानावर योगाभ्यास करण्यात आला. आमदार तानाजी मुटकुळे यांच्या सह अनेक नागरिक यात उत्साहाने सहभागी झाले. धाराशिव इथं तुळजाभवानी क्रीडा संकुलात भव्य योगशिबीर घेण्यात आलं. पतंजली योग समितीचे राम ढेरे यांनी योग्य प्रात्यक्षिक दाखवली. तर अनुरनागटिळक यांनी योगासनांविषयी माहिती दिली. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी नागरिकांनी दररोज योगाभ्यास करावा असं आवाहन केल. विभागातल्या सर्व शैक्षणिक संस्था स्थानिक स्वराज्य संस्था, विविध संस्था संघटनांच्या वतीने ही आज योग शिबिरांच्या माध्यमातून अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.’’

****

राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘माझी वसुंधरा अभियान सहावा टप्पा’ राबवण्यात येणार आहे. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी ही माहिती दिली. नोंदणी केलेल्या ४२२ नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि २७ हजार ८९५ ग्रामपंचायती अशा एकूण २८ हजार ३१७ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३१ मार्च २०२६ पर्यंत हे अभियान राबवलं जाणार आहे.

****

इस्राइल ईराण युद्धात हस्तक्षेप करत, अमेरिकेने ईराणच्या तीन अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ला केला आहे. अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमांवर याबाबत माहिती दिली. हल्ला केल्यानंतर सर्व विमानं परतल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. याबाबत थोड्याच वेळात ट्रम्प जाहीर संबोधन करणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

जागतिक संगीत दिनानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागातर्फे पहिला सृजनशील आणि सांस्कृतिक रेडिओ महोत्सव काल मुंबईत घेण्यात आला. या महोत्सवात पाच रेडिओ संवादकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या हस्ते यावेळी ‘आशा रेडिओ गौरव पुरस्कार’ तसंच ‘महाराष्ट्र भूषण आशा भोसले’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर इथले ज्येष्ठ संगीतज्ञ पंडित विश्वनाथ ओक यांना आशा रेडिओ भोसले पुरस्कारानं गौरवण्यात आलं. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. आशा भोसले यांनी उपस्थितांशी संवाद साधताना आकाशवाणीची सांकेतिक धुन गाऊन दाखवली, तसंच आपल्या कारकिर्दीत आकाशवाणीने दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. नव्या पिढीला जुनं संगीत ऐकवणं गरजेचं असल्याचं मत आशा भोसले यांनी व्यक्त केलं, त्या म्हणाल्या..

बाईट – आशा भोसले

****

आषाढी वारीसाठी पंढरपूर इथं मानाच्या १० पालख्यांसोबत येणाऱ्या एकूण १४०० दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार रुपयांनुसार, २ कोटी ८० लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यास शासनानं मान्यता दिली आहे. या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. या निधी वाटपामुळे कोणत्याही लाभार्थी घटकावर अन्याय झालेला नाही, असा निर्वाळा सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभागाने दिला आहे.

****

शेगाव येथून निघालेल्या संत गजानन महाराज पालखीचं काल दुपारच्या सुमारास परळीहून अंबाजोगाई शहरात आगमन झालं. पालखी आज सकाळी लोखंडी सावरगाव मार्गे पंढरपूरकडे रवाना होईल.

संत नामदेव महाराजांची पालखी काल परभणी जिल्ह्यात दाखल झाली. नर्सी इथून निघालेल्या या पालखीचं नांदगाव आणि त्रिधारा इथं स्वागत करण्यात आलं. पालखी आज सकाळी गंगाखेडकडे मार्गस्थ होईल.

****

क्रिकेट

भारत आणि इंग्लंड यांच्यात हेडिंग्ले इथं सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारत २६२ धावांनी आघाडीवर आहे. काल दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा यजमान संघाच्या तीन बाद २०९ धावा झाल्या होत्या. जसप्रीत बुमराहने हे तीनही बळी घेतले. त्यापूर्वी भारतानं आपल्या पहिल्या डावात ४७१ धावा केल्या. कर्णधार शुभमन गिल १४७ आणि उपकर्णधार ऋषभ पंत १३४ धावा करून बाद झाले.

****

पॅरीस डायमंड लीग भालाफेक स्पर्धेत भारताचा नीरज चोपडा अव्वल ठरला. नीरजने ८८ पूर्णांक १६ मीटर अंतरावर भाला फेकून या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं. जर्मनीचा आघाडीचा भालापेकपटू ज्युलियन वेबर ८७ पूर्णांक ८८ मीटर अंतरावर भाला फेकून दुसऱ्या क्रमांकावर राहिला.

****

हवामान

राज्यात कोकण, घाटमाथ्यासह विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाचा जोर कायम आहे. दरम्यान, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर आणि बीड या चार जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी दिला आहे.

****

No comments: