Monday, 23 June 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 23.06.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 23 June 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ जून २०२ सकाळी.०० वाजता

****

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतीदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. देशाची अखंडता अबाधित ठेवण्यासाठी डॉ. मुखर्जी यांनी अमूल्य धाडस दाखवत प्रयत्न केले. राष्ट्र उभारणीतील त्यांचं योगदान देश नेहमीच स्मरणात ठेवेल, असं मोदी यांनी एका सामाजिक माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

****

इराणहून मायदेशी परतलेल्या २८५ प्रवाशांचं परराष्ट्र व्यवहारमंत्री पबित्र मार्गारेटा यांनी रात्री दिल्ली विमानतळावर स्वागत केलं. ऑपरेशन सिंधु अंतर्गत आतापर्यंत एक हजार ७१३ भारतीयांना मायदेशी आणल्याची माहिती त्यांनी दिली. पुढील दोन दिवसांत आणखी दोन ते तीन विमानांच्या माध्यमातून भारतीयांना परत आणण्यात येणार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालय इराण आणि इस्रालयच्या नियमित संपर्कात असल्याचं मार्गारेटा म्हणाले. 

****

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी शांततेसाठी आवाहन केलं आहे. न्यू यॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात सुरक्षा परिषदेच्या आपत्कालीन विशेष सत्रात ते बोलत होते. इराणच्या अणु सुविधांवर अमेरिकेच्या लष्करी हल्ल्यांनंतर इराणमधील संकट कमी करण्यासाठी त्वरित पावलं उचलण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.  दरम्यान, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्‍बास अराग्‍ची रशियाच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर ते आज रशियाचे अध्यक्ष व्‍लादिमिर पुतिन आणि अन्य नेत्यांशी चर्चा करणार असल्याचं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.

****

इराण-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम आशियातील घडामोडींवर भारताचं लक्ष असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुरवठा व्यवस्थेत वैविध्य आणलं आहे, तसंच भारत पेट्रोलियम पदार्थांसाठी आता केवळ हॉर्मूज जलमार्गावर अवलंबून नसल्याचं मंत्री म्हणाले.

****

अमेरिकेने इराणच्या तीन अणु केंद्रांवर रविवारी पहाटे हल्ला केला. अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी इराणवर हल्ले करण्यासाठी भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केल्याचा दावा समाज माध्यमांवरील काही संदेशात केला होता. हा दावा खोटा असल्याचा सरकारकडून सांगण्यात आलं. पीआयबी फॅक्ट चेकनं स्पष्ट केलं की, अमेरिकेनं भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला नाही.

****

संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यारंभाला ७५ वर्षे पूर्ण होत असून, या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेला आज मुंबईत विधान भवनात प्रारंभ झाला. या परिषदेत "प्रशासकीय कामं सक्षमपणे आणि कमी खर्चात होण्याकरता अर्थसंकल्पीय अंदाजांचं पुनर्विलोकन आणि प्रभावी नियंत्रणात अंदाज समितीची भूमिका" या विषयावर विचारमंथन होईल. संसदेच्या तसंच सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अंदाज समित्यांचे समिती प्रमुख आणि सदस्य या परिषदेत सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे सर्व सदस्य आणि राज्यातले खासदार या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.

****

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यस्तरीय अधिवेशनाला कालपासून नाशिक इथं प्रारंभ झाला. कम्युनिस्ट पक्षाचा लढा प्रस्थापित सरकारच्या जनविरोधी धोरणांच्या विरोधात कायम राहील, असं यावेळी अधिवेशनाचे अध्यक्ष भालचंद्र कांगो यांनी  म्हटलं आहे. तर देशातील दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक यांचे लढे एकमेकांशी जोडले गेले आहेत, म्हणून नव्या पद्धतीने पक्ष बांधण्याची गरज आहे, असं भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या अमरजीत कौर यांनी म्हटलं आहे.

****

१८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्य लढ्यात हुतात्मा झालेल्या क्रांतिवीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आज छत्रपती संभाजीनगर इथं इतिहास तज्ज्ञांचं व्याख्यान आणि शौर्य गाथेचा संगीतमय कार्यक्रम होणार आहे. भारतरत्न मौलाना आझाद संशोधन केंद्र इथं दुपारी तीन वाजता हा कार्यक्रम होणार आहे. २३ जून १८५७ रोजी तत्कालीन औरंगाबाद शहराच्या खाम नदीवरील लोखंडी पुलाजवळ भारतीय स्वातंत्र्याची पहिली लढाई सुरू झाली होती. या लढ्यातील हिंदी सैनिक तसंच क्रांतिकारकांना तोफेच्या तोंडी देण्यात आलं होतं.

****

थायलंडमध्ये झालेल्या आशियाई पॅरा-बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी एकूण २७ पदकांची कमाई केली. यामध्ये चार सुवर्ण, १० रौप्य आणि १३ कांस्य पदकांचा समावेश आहे. या स्पर्धेत भारताची ही आजवरची सर्वोत्तम कामगिरीचा ठरली आहे. पॅरिस पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते नितेश कुमार, रौप्यपदक विजेती तुलसीमथी मुरुगेसन आणि ब्राँझपदक विजेती मनीषा रामदास यांचा पदक विजेत्यांमध्ये समावेश आहे. नितेश कुमार आणि तुलसीमथी मुरुगेसन यांनी सुवर्णपदक जिंकले, तर चिराग बरेठा आणि मनदीप कौर यांनी कांस्य पदक पटकावलं. १७ ते २२ जून दरम्यान ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

*****

मलेशियात सुरू होणाऱ्या आशियाई स्क्वॅश डबल्स चॅम्पियनशिप २०२५ मध्ये भारताकडून अनाहत सिंग आणि अभय सिंग हे आज आपले पात्रता सामने खेळणार आहेत. या जोडीने २०२३ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकलं होतं. पुरुष, महिला आणि मिश्र दुहेरीच्या ड्रॉमध्ये एकूण सहा जोड्या भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

****

 

No comments: