Tuesday, 24 June 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 24.06.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 24 June 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ जून २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      लोकशाही व्यवस्थेत संसदीय समित्यांचं स्थान महत्त्वपूर्ण-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन

·      तुकडाबंदी कायद्याची सुधारणा करण्यासंदर्भात पावसाळी अधिवेशनात विधेयक सादर करणार- महसूलमंत्र्यांची माहिती

·      एसटी महामंडळाची आर्थिक श्वेतपत्रिका प्रसिद्ध-महामंडळाला चार वर्षात फायद्यात आणण्याचा प्रयत्न करू-परिवहन मंत्र्यांची ग्वाही

·      बनावट सातबारा उताऱ्यांच्या आधारे शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी जालन्यात दहा जणांविरुध्द गुन्हा दाखल

आणि

·      लिडस कसोटी सामन्यात इंग्लंडसमोर ३७१ धावांचे लक्ष्य, दोन्ही डावांत शतकी खेळी करणारा ऋषभ पंत ठरला पहिलाच भारतीय यष्टीरक्षक

****

लोकशाही व्यवस्थेत संसदीय समित्यांचं स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचं, प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल मुंबईत संसदेच्या अंदाज समितीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते. अंदाज समितीच्या माध्यमातून सरकारच्या कामकाजावर नियंत्रण ठेवलं जातं, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले...

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या परिषदेत बोलतांना, विकासासाठी खर्च केला जाणारा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहचला पाहिजे, संसदेच्या अंदाज समितीचं काम यासंदर्भात खूप परिणामकारक ठरते असं मत व्यक्त केलं. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या परिषदेचा आज समारोप होत आहे.

****

सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या त्रिसूत्रीच्या माध्यमातून देशात गेल्या दशकात उल्लेखनीय परिवर्तन घडून आलं आहे. आकाशवाणी तुमच्यासाठी गेल्या ११ वर्षात सरकारने प्रमुख क्षेत्रांत केलेल्या कामकाजाची माहिती घेऊन येत आहे. आजच्या भागात केंद्र सरकारने अल्पसंख्याक समुदायाचे सक्षमीकरण, संधी आणि सुधारणांबाबत केलेल्या कामंबद्दल जाणून घेऊया.

‘‘गेल्या दशकात, सरकारनं अल्पसंख्यांक समुदायाचं जीवनमान उंचावण्यासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. यात शिक्षण, आर्थिक सक्षमीकरण आणि पायाभूत सुविधांचा विकास यांचा समावेश आहे.

प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून १८ हजार ४०० कोटी रुपयांचे विविध प्रकल्प राबवले. तसंच राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास आणि आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून सुमारे पावणेदोन कोटी लाभार्थ्यांना ७५२ कोटी रुपये हस्तांतरीत केले.

सरकारनं सांस्कृतिक आणि समुदाय-विशेष कार्यक्रमांवर भर दिला आहे. हज यात्रेकरुंसाठी हज सुविधा ऍपच्या माध्यमातून सुलभता प्रदान केली. पारदर्शकता आणि सुशासनासाठी ऐतिहासिक वक्फ कायदा-२०२५ लागू केला. तसंच उम्मीद पोर्टलच्या माध्यमातून वक्फ संपत्तीच्या डिजीटल व्यवस्थापनाची तरतूद करण्यात आली.

याशिवाय सरकारनं बुद्धीस्ट विकास योजना, जियो पारसी तसंच विविध समुदायांच्या संस्कृती जतनासाठी आणि सामुदायिक कल्याणासाठी विविध निर्णय घेतले आहेत.’’

****

राज्यामध्ये तुकडाबंदी कायद्याची सुधारणा करण्यासंदर्भात विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधेयक सादर केलं जाणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल दिल्लीत पत्रकारांशी बोलतांना ही माहिती दिली. या कायद्यामुळे राज्यात रहिवाशी क्षेत्रामध्ये एक गुंठा जमीनीचा तुकडा पाडता येईल, असं सांगतानाच, या अधिवेशनात वन स्टेट वन रजिस्ट्रेशन, व्हर्टिकल स्वामित्व आदी संदर्भात प्रयत्न करणार असल्याचं, बावनकुळे यांनी सांगितलं.

****

गेली अनेक वर्षे सातत्याने तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाला येत्या चार वर्षात फायद्यात आणण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते काल एस टी महामंडळाची आर्थिक श्वेतपत्रिका प्रसिद्ध करताना बोलत होते. दरवर्षी ५ हजार बसची खरेदी, इलेक्ट्रिक तसेच सीएनजी- एलएनजी आधारित बसचा समावेश, महामंडळाच्या जागांचा पीपीपी तत्त्वावर विकास, आदी मुद्यांचा समावेश या श्वेतपत्रिकेत आहे.

****

साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांचा काल नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने सत्कार करण्यात आला. आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते सावंत यांना त्यांच्या निवासस्थानी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलं.

****

जालना जिल्ह्यात बनावट सातबारा उताऱ्यांच्या आधारे शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. भोकरदन तालुक्यात जानेफळ गायकवाड इथल्या वीर छत्रपती सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेच्या अध्यक्षासह संचालक मंडळातील दहाजण आणि खासगी व्यापाऱ्यांनी संगनमत करून खोटा सोयाबीन पीकपेरा दाखवला, या बनावट कागदपत्रांच्या आधारे सदर सोयाबीनची शासकीय हमीभावाने खरेदी दाखवून शासनाची सुमारे एक कोटी दोन लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी दहा जणांविरुध्द फसवणूक आणि अन्य कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

नांदेड जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५ या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्यातल्या एक हजार ५३२ गावातल्या स्‍वच्‍छतेची तपासणी होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी दिली.

****

तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा इथं महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद अभियानांतर्गत महिला बचत गटाच्या सदस्यांनी हिरकणी महिला खरेदी विक्री उत्पादक गटाची स्थापना केली आहे. वर्षभरापूर्वी स्थापन झालेल्या या व्यवसायातून साडे बारा लाख रुपयांची उलाढाल होऊन बारा हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळाला आहे. या उत्पादक गटाच्या महिलांनी यासंदर्भात अधिक माहिती दिली..

बाईट – अर्चना राऊत

****

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड इथून संतश्रेष्ठ जनाबाई यांच्या पालखीने काल आषाढी वारीसाठी पंढरपूर कडे प्रस्थान ठेवलं, शहरातील चौकाचौकात भाविकांनी पारंपरिक पद्धतीने पालखीला निरोप दिला. पैठणच्या संत एकनाथ महाराजांच्या पालखी दिंडीचं काल बीड जिल्ह्यात शिरूर कासार इथं ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात स्वागत केलं. नागरिकांनी दर्शन घेतल्यानंतर नाथांची पालखी राक्षसभुवनकडे मार्गस्थ झाली.

****

लातूर इथं केंद्रीय राखीव पोलिस दल- सीआरपीएफच्या प्रशिक्षण केंद्रात काल पोलिस शिपायांच्या ३१ व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ पार पडला. या तुकडीतले ८९ प्रशिक्षणार्थी आता देशभरातल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या विविध ठिकाणी रुजू होणार आहेत. सीआरपीएफचे पोलिस उपनिरीक्षक तथा प्राचार्य अमिरुल हसन अन्सारी यांनी प्रशिक्षार्थी शिपायाचं अभिनंदन केलं.

****

धाराशिव -बीड - छत्रपती संभाजीनगर या प्रस्तावित रेल्वेमार्गाचे पुन्हा सर्व्हेक्षण करून काम तत्काळ सुरु करण्याची मागणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली आहे. मध्य रेल्वेच्या विभागीय समितीची बैठक काल पुण्यात झाली, या बैठकीत राजेनिंबाळकर यांनी रेल्वेच्या विविध मागण्यांसंदर्भात पाठपुरावा केला.

****

नाशिक जिल्ह्यात गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला. यामुळे गोदावरीला पुन्हा पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. गंगापूर धरण ६१ पूर्णांक ८७ टक्के भरल्यामुळे काल विसर्गात दुपटीने वाढ करण्यात आली. सध्या ६ हजार १६० दशलक्ष घनमीटर प्रतिसेकंद या वेगाने विसर्ग करण्यात येत आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 'अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावरी' हा उपक्रम जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आला. शेतकऱ्यांच्या विविध तक्रारीचं निराकरण करण्यासाठी अधिकारी थेट बांधावर पोहोचले. जिल्हाधिकारी स्वामी यांनी वैजापूर तालुक्यात नांदगाव इथं लक्ष्मण खंडेराव रहाणे, यांची त्यांच्या बांधावर भेट घेतली.

दरम्यान, काल जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याच्या विविध प्रश्नांवर बैठक झाली, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विविध प्रश्न तसंच समस्या मांडत, त्या सोडवण्याच्या सूचना केल्या.

****

गुजरात मध्ये भूज इथं होणाऱ्या राष्ट्रीय वरिष्ठ महिला हँडबॉल स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर इथल्या सायली वैभव किरगत यांची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. भूज इथं २८ जून ते ३ जुलै दरम्यान ही स्पर्धा होणार आहे.

****

क्रिकेट

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडसमोर भारतीय संघानं ३७१ धावांचं आव्हान ठेवलं आहे. काल चौथ्या दिवशी भारतीय संघानं दुसऱ्या डावात ३६४ धावा केल्या. तर दुसऱ्या डावात काल दिवसअखेर इंग्लंडने बिनबाद २१ धावा केल्या आहेत. आज इंग्लंडचा संघ ३५० धावांचं लक्ष्य ठेवून मैदानात उतरेल. या कसोटी सामन्यात ऋषभ पंतनं दोन्ही डावात शतकी खेळी करुन इतिहास रचला. अशी खेळी करणारा रिषभ जगातला तिसरा फलंदाज तर पहिलाच भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे.

****

नांदेड जिल्ह्यात अजूनही पुरेसा पाऊस झाला नाही, त्यामुळं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये, असं आवाहन नांदेडचे जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ. नीलकुमार ऐतवडे यांनी केलं आहे.

****

No comments: