Tuesday, 1 July 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.07.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 01 July 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ जूलै २०२ सकाळी .०० वाजता

****

डिजिटल इंडिया अभियानाचा दशकपूर्ती सोहळा आज देशात साजरा केला जात आहे. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत प्रशासनात सुधारणा करणं आणि नागरिकांचं एकूण जीवन सुलभ करणं, या उद्देशानं २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे अभियान सुरू केलं होतं. यासंदर्भात समाजमाध्यमावर जारी केलेल्या संदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या सामूहिक संकल्पामुळे देशानं डिजिटल पेमेंट्स मध्ये मोठी झेप घेतल्याचं नमूद केलं. या अभियानानं कोट्यावधी लोकांच्या जीवनात स्थान मिळवलं आणि आणि देशानं सशक्तिकरणाच्या एका नव्या युगात प्रवेश केला, असं नमूद करत, आरोग्य आणि शिक्षण, अशा क्षेत्रांनाही यामुळे मोठा लाभ झाल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

****

वस्तू आणि सेवा कर प्रणालीला आज आठ वर्षं पूर्ण झाली. वस्तू आणि सेवा करापोटी जमा होणारा महसूल गेल्या पाच वर्षांत दुप्पट झाला आहे. २०२४-२५ या वर्षात २२ लाख ८० हजार कोटी रुपये उच्चांक करवसुलीत नोंदवला गेला. सरासरी दरमहा महसूल एक लाख ८४ हजार कोटी रुपये राहिला. २०१७ पासून लागू झालेल्या या प्रणालीमुळे करभरणा सुलभ झाला, तसंच वस्तू आणि सेवांचं आदानप्रदान देशभरात कोणत्याही राज्यांमध्ये सहज करता येऊ लागलं. करदात्यांची संख्याही सातत्याने वाढत असून, सध्या एक कोटी ५० लाख करदाते आहेत.

****

 

 

 

व्यावसायिक वापरात येणा-या एकोणीस किलो वजनाच्या एलपीजी गॅस सिलिंडर्सच्या किमतीत अठ्ठावन्न रुपये पन्नास पैशांची कपात करण्यात आली आहे. भारतीय तेल महामंडळानं याबाबत घोषणा केली आहे. या निर्णयामुळे मुंबईत या सिलेंडरची किंमत एक हजार सहाशे पासष्ट रुपये पन्नास पैसे प्रति सिलिंडर, अशी झाली आहे.

****

भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोतले माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ विजय पेंडसे यांचं काल लॉस एंजेलिस इथं निधन झालं, ते ८० वर्षांचे होते. भारताच्या श्रीहरिकोटा इथल्या उपग्रह प्रक्षेपण केंद्राच्या उभारणीत पेंडसे यांचा मोठा सहभाग होता.

****

देशातल्या सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार मंत्र्यांची मंथन बैठक काल नवी दिल्लीत आयोजित करण्यात आली होती. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत देशातील सहकारी चळवळीला बळकटी देण्यासाठी सुरू असलेल्या योजनांचा आढावा घेण्यात आला. राष्ट्रीय सहकार धोरण लवकरच जाहीर केलं जाणार असून, ते २०२५ ते २०४५ पर्यंत लागू असेल, असं शहा यांनी सांगितलं. या धोरणांतर्गत, प्रत्येक राज्याचं सहकार धोरण त्या त्या राज्याच्या परिस्थितीनुसार तयार करण्यात येईल, असं ते म्हणाले. या बैठकीत राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी राज्यातल्या सहकार क्षेत्रातल्या यशस्वी उपक्रमांचा आढावा घेतला.

****

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी विद्यमान कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. भारतीय जनता पक्षाच्या राज्य परिषदेचं अधिवेशन आज वरळी इथं होणार आहे; या अधिवेशनात प्रदेशाध्यक्षपदाच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची अपेक्षा आहे.

****

बीड इथल्या एका खासगी कोचिंग क्लासमध्ये विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक छळाच्या धक्कादायक घटनेची गंभीर दखल घेत विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी काल विशेष पोलीस महानिरीक्षकांना पत्र पाठवून तत्काळ आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हे प्रकरण संतापजनक आणि समाजाला हादरवून टाकणारं असून, अल्पवयीन विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारं असल्याचं गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.

****

यंदा गोकुळाष्टमीच्या पार्श्वभूमीवर गोविंदा उत्सव सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी राज्यातल्या दीड लाख गोविंदांना विमा संरक्षण मिळावं, अशी विनंती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. लवकरच याबाबत शासनाकडून निर्णय जाहीर होईल अशी माहिती सरनाईक यांनी काल दिली.

****

छत्रपती संभाजीनगर महापालिकेने जालना रस्ता, पैठण रस्ता, बीड वळण रस्ता आणि पडेगाव-मिटमिटा रस्त्यावरील अनधिकृत बांधकामं स्वतःहून काढून घेण्यासाठी १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदत दिली आहे. ३१ डिसेंबर २०२० पूर्वीची अनधिकृत बांधकामं असलेल्या नागरिकांसाठी गुंठेवारी नियमितीकरणाची विशेष संधी देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन कायदेशीर अडचणी टाळाव्यात, असं आवाहन महापालिकेने केलं आहे. दरम्यान, महापालिकेने काल पैठण रस्त्यावरची ४७७ अतिक्रमणं निष्कासित केली.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या, आर्थिक गैरव्यवहार झालेल्या सहकारी बँका आणि पतसंस्थांची विशेष तपासणी करण्यासाठी अपर जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमावी आणि तपासाचा अहवाल देण्यासाठी समितीला वेळ ठरवून द्यावी, असे निर्देश हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले आहेत.

****

No comments: