Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 02 July 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ जूलै २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज घाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील आणि नामिबिया या पाच देशांच्या
दौऱ्यासाठी रवाना झाले. आज दुपारी पंतप्रधान घाना इथं पोहोचणार आहेत. घाना या देशाला
पंतप्रधानांची ही पहिलीच भेट आहे, ते घानाचे अध्यक्ष जॉन
ड्रामानी महामा यांची भेट घेणार आहेत. या दौ-यात पाच ते आठ जुलै या काळात पंतप्रधान
ब्राझीलमध्ये रिओ डी जानेरिओ इथं सतराव्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत.
****
कोविडसाठीची लस आणि कमी वयाच्या लोकांचे
अचानक झालेले मृत्यू, यांचा काहीही परस्परसंबंध
नसल्याचा निष्कर्ष, भारतीय वैद्यकीय संशोधन
परिषद आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्रानं सखोल अभ्यासानंतर काढला आहे. भारतातली कोविडची लस ही अत्यंत सुरक्षित आणि परिणामकारक असल्याचं तसंच
तिचे अत्यंत कमी प्रमाणात साईड इफेक्ट्स असल्याचं या दोन संस्थांनी केलेल्या अभ्यासातून
दिसून आलं आहे. ऑक्टोबर २०२१ ते मार्च २०२३ या काळात, वरकरणी निरोगी वाटणा-या व्यक्तींच्या अचानक झालेल्या मृत्युंबाबत
केलेल्या संशोधनातून, अशा मृत्यूंमागे अनुवांशिकता, जीवनशैली आणि आधीच असलेले आजार, अशी कारणं असल्याचं स्पष्ट झालं आहे, असं या संस्थांच्या निष्कर्षात म्हटलं
आहे.
****
जम्मू इथून अमरनाथ यात्रेसाठी भाविकांचा
पहिला गट आज रवाना झाला. जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज पहाटे यात्रेकरूंना
हिरवा झेंडा दाखवून निरोप दिला. या तीर्थयात्रेसाठी एकूण पाच हजार आठशे ब्याण्णव यात्रेकरू
रवाना झाले आहेत. यात्रेकरुंनी सरकारने
पुरवलेल्या सुविधा आणि सुरक्षेबद्दल समाधान
व्यक्त केलं आहे.
बाईट – यात्रेकरु
****
येत्या काळात अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचं
महत्त्व आणि आवश्यकता वाढणार असल्याच्या पार्श्वभूमीवर उदंचन जलविद्युत प्रकल्प म्हणजेच
पंपस्टोरेज हा प्रकल्प अपारंपरिक ऊर्जा स्रोतात भर घालेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी काल मुंबईत व्यक्त केला. उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठी जलसंपदा विभाग
आणि तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी नवशक्ती निर्माण संस्था मर्यादित, यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
सहकारातून अशा पद्धतीचा प्रकल्प पहिल्यांदाच राज्यात होत आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं.
****
विकसित भारत अभियानात युवकांना सक्रियतेनं
सहभागी करून घेण्यासाठी केंद्र सरकारनं ‘विकसित भारत युवा कनेक्ट’ हा कार्यक्रम राबवण्याचा
निर्णय घेतला आहे. याचा शुभारंभ येत्या १२ ऑगस्टला संपूर्ण देशभर एकाच दिवशी होणार
असून, या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र
मोदी संबोधित करणार आहेत. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी
काल ही माहिती दिली. मांडवीय यांनी सर्व राज्यांच्या क्रीडा मंत्री आणि सचिवांशी दूरदृश्य
प्रणालीद्वारे संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. विकसित भारत
अभियानात देशातल्या युवकांचा जास्तीत जास्त सहभाग वाढवावा, विविध उपक्रमांद्वारे त्यांची सामाजिक जाणीव वाढावी, तसंच क्रीडा क्षेत्रात त्यांची रुची
वाढावी आणि त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळावी यासाठी ‘विकसित भारत युवा कनेक्ट’
कार्यक्रमाअंतर्गत विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात यावं, असे निर्देश मांडवीय यांनी दिले आहेत.
****
भारतीय जनता पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष
म्हणून रवींद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. मुंबईत वरळी इथं काल झालेल्या राज्य
परिषदेच्या अधिवेशनात केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी चव्हाण यांना निवडीचं प्रमाणपत्र प्रदान केलं. चव्हाण यांनी मावळते
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून पदाची सूत्रं स्वीकारली.
****
लातूर जिल्हा वृत्तपत्र विक्रेत्यांनी
लातूर शहरात कालपासून संप पुकारला आहे. कमिशन वाढवून मिळण्यासाठी हा संप सुरू असून, मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत
लातूर शहरात वर्तमानपत्र वितरित करणार नाही, असा निर्णय लातूर जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेनं घेतल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
अँडरसन-तेंडुलकर चषक मालिकेतला दुसरा
कसोटी सामना आज बर्मिंगहम इथे सुरू होणार आहे. भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह
उपलब्ध असल्याचं कप्तान शुभमन गिलनं सांगितलं आहे, मात्र तो हा सामना खेळणार का नाही, याबाबतचा निर्णय संघ व्यवस्थापनाच्या
बैठकीनंतर होईल, असं याबाबतच्या वृत्तात
म्हटलं आहे.
****
राज्यात आज सर्वत्र पावसाच्या सरींची
शक्यता वर्तवण्यात आली असून मध्य महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून
देण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment