Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 03 July 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ जुलै २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
नागरिकांचे आकस्मिक मृत्यू आणि कोविड लसीकरणाचा परस्पर
संबंध नसल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट
·
अंमली पदार्थांच्या तस्करांवर 'मकोका'
अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
·
पोलिसांच्या अनुकंपा भरती संदर्भातली सर्व प्रकरणं मिशन
मोडवर निकाली काढणार-मुख्यमंत्र्यांचं विधीमंडळात प्रतिपादन
·
खासगी वापराची नोंदणी असलेल्या दुचाकींना बाईक टॅक्सी
सेवा देण्यास केंद्राची परवानगी
·
पैठण तालुक्यातील अनधिकृत वाळू उपशाबाबत ड्रोन सर्वेक्षण
करण्याचे महसूलमंत्र्यांचे निर्देश
आणि
·
बर्मिंगहॅम कसोटीत पहिल्या दिवसअखेर भारताच्या पाच बाद
310 धावा, शुभमन गिलचे सलग दुसऱ्या कसोटीत शतक
****
नागरिकांचे
आकस्मिक मृत्यू आणि कोविड लसीकरणाचा परस्पर संबंध नसल्याचं, केंद्र सरकारने
स्पष्ट केलं आहे. भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्था तसंच राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राने
केलेल्या सखोल अभ्यासातून ही बाब स्पष्ट झाल्याचं, केंद्रीय आरोग्य
आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. भारतात तयार झालेली कोविड लस ही
सुरक्षित असल्याचं सांगत, ज्येष्ठांच्या मृत्यूंमागे अनुवांशिकता,
जीवनशैली आणि आधीच असलेले आजार, अशी कारणं असल्याचं
या संस्थांच्या निष्कर्षात नमूद केलं आहे.
****
अंमली पदार्थांच्या
तस्करांवर 'मकोका' अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचा निर्णय
राज्य सरकारनं घेतला आहे. यासंदर्भातलं विधेयक या अधिवेशनात आणून त्यानुसार कारवाई
केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल
विधान परिषदेत केली. आमदार परिणय फुके यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर
देतांना मुख्यमंत्री म्हणाले...
बाईट
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
राज्य शासनाच्या
१५० दिवस आराखडा कार्यक्रमात पोलिसांच्या अनुकंपा भरती संदर्भातली सर्व प्रकरणं मिशन
मोडवर निकाली काढली जाणार असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या
तासात सांगितलं. आपलं सरकार पोलिसांच्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घेत असून,
वैद्यकीय तपासण्या, समुपदेशन, आणि आठ तास कामकाज, या निकषांवर लक्ष दिलं जात असल्याचं
मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
पोलीस कर्मचाऱ्यांच्या
घरांच्या अवस्थेबाबतचा मुद्दा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित
केला, यावर उत्तर देताना, पोलिसांसाठी मोठ्या प्रमाणात
चांगल्या दर्जाची घरं बांधल्याचं आणि हे काम आणखी वाढवण्यासाठी मुंबईत योजना तयार केल्याचं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
****
विधीमंडळ
अधिवेशनात काल झालेल्या कामकाजाचा हा संक्षिप्त आढावा..
‘‘राज्यातल्या
शाळांमध्ये पटसंख्या कमी असली तरी त्या शाळा बंद केलेल्या नाहीत, आणि यापुढेही बंद होणार नाहीत, अशी
ग्वाही शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत
दिली. आमदार विक्रम काळे यांच्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते. कमी
विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये अतिरिक्त असलेल्या शिक्षकांना इतर शाळांमध्ये
समयोजित केलं जात असल्याचंही भोयर यांनी नमूद केलं.
राज्यात वीज कोसळून
मृत्युमुखी पडलेल्या शेतकरी किंवा शेतमजुरांच्या कुटुंबियांना दिली जाणारी चार लाख
रुपयांची मदत वाढवून दहा लाख रुपये करावी, अशी
मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या
तासात केली. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आश्वासन,
आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिलं, ते
म्हणाले.’’
बाईट – गिरीश महाजन, आपत्ती
व्यवस्थापन मंत्री
‘‘बांधावर जाऊन
शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीचा परवाना
बंधनकारक करण्यात येणार आहे. पणन मंत्री जयकुमार रावल
यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात ही माहिती दिली.
शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे गुन्हे कमी करण्यासाठी 'कृषी
गुन्हे शाखा' आणि कृषी न्यायालय स्थापन करण्याबाबत शासन
सकारात्मक असल्याचंही रावल यांनी सांगितलं.
परभणी जिल्ह्यात बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातल्या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी पाथरीचे आमदार राजेश विटेकर यांनी काल विधानसभेत केली. पात्र परंतु वंचित नागरिकांना महामंडळाचा लाभ मिळवून देण्यासाठी गावोगावी शिबीरं घेण्याची मागणीही विटेकर यांनी यावेळी केली.
आमदार बबनराव लोणीकर यांच्या कथित वक्तव्यासंदर्भात विरोधकांनी केलेल्या आरोपांना लोणीकर यांनी काल विधानसभेत उत्तर दिलं, या उत्तरावरून विरोधक आणि सत्ताधारी सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यावरून झालेल्या गदारोळामुळे सदनाचं कामकाज दहा मिनिटं तहकूब करावं लागलं.
पंढरपूरच्या आषाढी
वारीत काही नास्तिक, शहरी नक्षल संघटनांनी शिरकाव
केल्याचा आणि वारकऱ्यांचा बुद्धिभेद करायचा प्रयत्न
होत असल्याचा दावा आमदार मनीषा कायंदे यांनी विधान परिषदेत विशेष उल्लेखाद्वारे
केला. याबाबत चौकशीचे आदेश संबंधित विभागाला दिल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांनी सांगितलं.
दरम्यान, गडचिरोली खनिकर्म प्राधिकरण, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण, ही विधेयकं विधान सभेने काल संमत केली, तर विधान सभेनं पर्वा संमत केलेलं नगर परिषदा, नगर पंचायती आणि औद्योगिक नगरी विधेयक विधान परिषदेनं काल संमत केलं.’’
****
केंद्र
सरकारनं, खासगी वापरासाठीची नोंदणी असलेल्या दुचाकींना राईड-हेलिंग अॅग्रीगेटर
प्लॅटफॉर्मवर बाईक टॅक्सी सेवेची परवानगी दिली आहे. यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि
महामार्ग मंत्रालयानं ‘मोटार वाहन अॅग्रीगेटर मार्गदर्शक तत्त्वे २०२५’ अधिसूचित केली
आहे. मात्र या सेवेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी संबंधित राज्य सरकारांची मान्यता
आवश्यक राहणार आहे.
****
छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यात गोदावरी नदी पात्रात पैठण तालुक्यातील हिरडपुरी इथल्या वाळू घाटामध्ये
मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या अनधिकृत वाळू उपशाबाबत ड्रोन सर्वेक्षण करावं, तसच त्याबाबतचा
अहवाल सादर करण्यात यावा, असे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
यांनी दिले आहेत. काल विधीमंडळात विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांच्या
दालनात ते बोलत होते. हिरडपुरी इथं १० बोटींची परवानगी असताना २२ बोटींच्या माध्यमातून
वाळू उपसा केला जात असल्याबाबत दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
****
छत्रपती
संभाजी नगर इथं केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आयुक्तालयात १ जुलै रोजी जीएसटी लागू झाल्याचा
८ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. छत्रपती संभाजी नगर कार्यालयानं २०२४-२५ या आर्थिक
वर्षात ४ हजार ४६६ कोटी रुपयांचा महसूल नोंदवला असून करदात्यांची संख्या सुमारे ५७
हजार इतकी झाली आहे. या कार्यक्रमात अव्वल करदात्यांना सीजीएसटी कार्यालयानं सन्मानित
केलं.
****
नांदेड
जिल्ह्यात कृषी विभागानं सुरू केलेल्या कृषी सेवा केंद्रांच्या तपासणीत, अनेक केंद्रांमध्ये
मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळल्यानं एकूण २८ कृषी केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे.
याशिवाय, विक्री परवानगी घेतलेली असतानाही दुकानं बंद ठेवणाऱ्या
केंद्रांचीही विशेष नोंद घेण्यात आली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत
यांनी ही माहिती दिली.
****
राजर्षी
शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंत मानधन सन्मान योजने अंतर्गत परभणी इथं पात्र
अर्जांची पडताळणी करून कलावंतांनी सादरीकरण केलं. दरवर्षी जिल्ह्यातील १०० कलावंतांची
या योजनेच्या मानधनासाठी निवड करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी
सांगितलं.
****
नांदेड
जिल्हा परिषदेच्या वित्त विभागातर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या २०२४-२५ च्या
भविष्य निर्वाह निधी विवरणपत्रांचं संगणकीकरण करण्यात आलं आहे, या नव्या
सुविधा प्रणालीचं लोकार्पण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक
मेघना कावली यांच्या हस्ते काल करण्यात आलं.
****
बर्मिंगहॅम
कसोटीत पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेंव्हा भारतीय संघानं ५ बाद तीनशे १० धावा केल्या
आहेत. कर्णधार शुभमन गिलनं सलग दुसऱ्या कसोटीत शतक झळकावंल. गिल ११४ तर रविंद्र जडेजा
४१ धावांवर खेळत आहेत. यशस्वी जयस्वालनं ८७ धावांची खेळी केली. पाच सामन्यांच्या मालिकेत
इंगलंड १-० नं आघाडीवर आहे.
****
महाविद्यालयाच्या
तपासणीसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या काही समिती रवाना झाल्या
आहेत. विद्यापीठाशी संलग्नित पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या जालना, बीड,
धाराशिव जिल्ह्यातल्या महाविद्यालयातल्या सुविधांची या समितींमार्फत
तपासणी केली जाणार आहे. पुढच्या काही दिवसांत या तपासणीचे अहवाल प्राप्त होतील,
त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पदव्युत्तर महाविद्यालयांची
तपासणी सुरू होईल, अशी माहिती प्र-कुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे
यांनी दिली.
****
हवामान
राज्यात
ठाणे, रायगड तसंच रत्नागिरी जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट तर मुंबई तसंच
पालघर जिल्ह्याला आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते
मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
****
No comments:
Post a Comment