Friday, 4 July 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.07.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 04 July 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०४ जूलै २०२ दुपारी १.०० वा.

****

पाच देशांच्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी त्रिनिनाद आणि टोबॅगोनंतर आज अर्जेंटिनाला भेट देणार आहेत. भारतीय पंतप्रधानांचा गेल्या ५७ वर्षांतला हा पहिलाच अर्जेंटिना दौरा आहे. अर्जेंटिनाचे राष्ट्रपती झेवियर मिलेई यांच्या आमंत्रणावरून पंतप्रधानांनी आखलेल्या या दौऱ्यात दोन्ही देशात विविध क्षेत्रातलं सहकार्य आणि भागीदारी वाढवण्यासंदर्भाल्या उपायांवर चर्चा होणार आहे.

****

भारतीय संस्कृतीतल्या शूर योद्ध्यांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवणं आवश्यक असल्याचं, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. पुण्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी- एनडीएच्या परिसरात त्रिशक्ती प्रवेशद्वारावर थोरले बाजीराव पेशवे यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचं शहा यांच्या हस्ते आज अनावरण झालं, त्यावेळी ते बोलत होते. पुण्यात झालेल्या या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांच्यासह अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित आहेत. हा पुतळा तयार करणारे विपुल खटावकर, वास्तुविशारद अभिषेक भोई, यांचा शहा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

दरम्यान, पुणे दौऱ्यात शहा यांच्या हस्ते आज कोंढवा परिसरात जयराज क्रीडा संकुलाचं उद्घाटन होणार असून, बाळासाहेब देवरस रुग्णालयाची पाहणी देखील अमित शहा करणार आहेत. त्यानंतर वडाची वाडी रस्त्यावर उभारण्यात येणाऱ्या पीएचआरसी हेल्थ सीटीचं भूमिपूजनही केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या अन्न आणि औषध प्रशासनातल्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करणारी लक्षवेधी आज चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांनी विधानसभेत दाखल केली. छत्रपती संभाजीनगर इथं सुगंधी सुपारी तसंच गुटखा जप्तीची मोठी कारवाई झालेली आहे, मात्र दोषींवर कारवाई झालेली नाही, असं या वृत्तात म्हटलं आहे. अन्न औषध प्रशासनाचे छत्रपती संभाजीनगरचे आयुक्त याला जबाबदार असल्याचा आरोप या लक्षवेधीतून करण्यात आला आहे.

बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांनीही या चर्चेत सहभाग घेत, छत्रपती संभाजीनगरात शैक्षणिक संस्थांच्या पसिरातल्या पान टपऱ्यांवर गुटख्यासोबतच अंमलीपदार्थ आणि नशेच्या गोळ्या विकल्या जात असल्याची माहिती सदनाला दिली. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी यासंदर्भात कारवाईचं आश्वासन दिलं आहे.

****

एसटी प्रशासनातर्फे एसटी पास थेट तुमच्या शाळेत ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. १६ जून ते ३० जून या केवळ १५ दिवसांच्या कालावधीत तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या योजनेचा लाभ घेतला असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. प्रत्येक आगार प्रमुखांनी आपल्या कार्यक्षेत्रातली शालेय फेरी कोणत्याही परिस्थितीत रद्द होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी सूचनाही एसटी प्रशासनाला दिल्याचं मंत्री प्रताप सरनाईक सांगितलं.

****

अँडरसन-तेंडुलकर चषक कसोटी क्रिकेट मालिकेत दुसऱ्या सामन्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी यजमान इंग्लंड संघ कालच्या तीन बाद सत्त्याहत्तर या धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरूवात करेल.

काल इंग्लंडच्या दुसऱ्या डावाची सुरुवात अडखळत झाली, यजमान संघाचे दोन फलंदाज शुन्यावर तंबूत परत गेले, तर सलामीवीर झॅक क्रॉली १९ धावांवर बाद झाला. आकाशदीपने दोन तर मोहम्मद सिराजने एक बळी घेतला.

याआधी कर्णधार शुभमन गिलच्या दोनशे एकोणसत्तर धावांच्या दमदार खेळीमुळे भारतीय संघाने पहिल्या डावात पाचशे सत्त्याएंशी धावांचा डोंगर रचला. इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यात दुहेरी शतक झळकावणारा तो पहिला भारतीय तसंच आशियाई कर्णधार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं आज सकाळी भरधाव चारचाकीने अनेक जणांना धडक दिली. सकाळी नऊ वाजताच्या सुमारास जळगाव रस्त्यावर काळा गणपती मंदिराच्या परिसरात हा अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून, चार जणांची प्रकृती गंभीर असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान, संबंधित कारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.

****

क्रोएशियात सुरु असलेल्या ग्रँड चेस टूर स्पर्धेत जागतिक विजेता डी. गुकेशनं अव्वल मानांकन असलेल्या मॅग्नस कार्लसनचा सहाव्या फेरीत पराभव केला. दिवसभरात तीन लढती जिंकत गुकेशनं १० गुणांची कमाई केली.

****

विम्बल्डन टेनिस स्पर्धेत भारताच्या एन श्रीराम बालाजीनं आपल्या जोडीदारास दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. बालाजी आणि त्याचा मेक्सिकन जोडीदार मिगलनं पहिल्या फेरीत अमेरिकेच्या जोडीचा पराभव केला.

****

अहिल्यानगर जिल्ह्यातल्या भंडारदरा धरणातून सुमारे दोन हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी प्रवरा नदीपात्रात सोडण्यात येत असून, नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून सुमारे १२ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी गोदावरी पात्रात सोडण्यात येत आहे.

****

No comments: