Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 04 July
2025
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ जुलै २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांना घाना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान
·
बार्टी, सारथी, महाज्योती
आणि आर्टी संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश-रोजगाराभिमुख
अभ्यासक्रमांवर शासनाचा भर
·
राज्यातल्या सर्व मॉलचं
येत्या ९० दिवसांत संपूर्ण सर्वेक्षण-उद्योग मंत्री उदय सामंत यांची घोषणा
·
मराठवाड्यात आतापर्यंत
खरीपाच्या ७७ टक्के पेरण्या-मशागतीला वेग
·
आषाढी वारीसाठी निघालेल्या
संतांच्या पालख्या पंढरपूर तालुक्यात दाखल
आणि
·
बर्मिंगहम क्रिकेट कसोटीत
दुसऱ्या दिवसअखेर भारताचे पारडे जड, कर्णधार शुभमन गिलचे
द्विशतक
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घाना देशाच्या Companion of the Order
of the Star of Ghana या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित
करण्यात आलं आहे. घानाचे अध्यक्ष जॉन ड्रामानी महामा यांनी काल पंतप्रधानांना हा
पुरस्कार प्रदान केला. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर पंतप्रधानांनी आपल्या भावना
व्यक्त केल्या,
ते म्हणाले...
बाईट
- पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी त्रिनिदाद आणि टोबॅगो दौऱ्यावर
आहेत.
****
बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी
या संस्थांमध्ये यापुढे विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर विविध
अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यात येणार असून विद्यार्थी संख्या, सर्वसाधारण
शिष्यवृत्ती,
परदेशी शिष्यवृत्ती, प्रवेश प्रक्रियेबाबत समान
धोरण राबवण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल विधान परिषदेत एका
प्रश्नावर उत्तरात ही माहिती दिली. रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना
प्रवेश देण्यात येईल,
असंही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले...
बाईट
- उपमुख्यमंत्री अजित पवार
****
राज्यातील सर्व मॉलचं येत्या ९० दिवसांत अग्निसुरक्षा
सर्वेक्षण करण्याची घोषणा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. मुंबईतील विविध
मॉलमध्ये आगीच्या घटना घडून त्यात जीवितहानी आणि वित्त हानी झाल्याच्या
पार्श्वभूमीवर कोणती कारवाई केली, याबाबत विधान परिषदेत आमदार कृपाल
तुमाने यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. ज्या मॉलमध्ये नियमांचं
पालन केलेलं नसेल,
त्या मॉलचं पाणी आणि विद्युत जोडण्या खंडित केल्या जातील, असा
इशाराही सामंत यांनी दिला.
****
विधीमंडळ अधिवेशनात काल झालेल्या इतर कामकाजाचा हा
संक्षिप्त आढावा...
राज्यात
शाळाबाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी १५
जुलैपर्यंत विशेष मोहीम राबवली जात आहे. शिक्षणमंत्री दादाभुसे यांनी विधान
परिषदेत ही माहिती दिली. आधार लिंकिंग आणि अपार आयडी यामार्फत प्रत्येक
विद्यार्थ्याचा शिक्षण प्रवास ट्रॅक केला जाणार आहे. सध्या राज्यात ८६%
विद्यार्थ्यांची माहिती संकलित झाली असून ९५% आधार लिंकिंग पूर्ण झाल्याचं मंत्री
भुसे यांनी सांगितलं. राज्यभरातल्या शाळांमध्ये आतापर्यंत नऊ हजार उच्चशिक्षित
शिक्षक नियुक्त झाले असून आणखी १० हजार शिक्षक भरती प्रक्रियेत असल्याचं भुसे
यांनी सांगितलं.
कृषीपंपांसाठी
दिवसा वीज देण्याच्या उद्देशाने सौर ऊर्जेवर आधारित कृषी पंप देण्यावर
राज्यशासनाने भर दिला आहे. मात्र भौगोलिक परिस्थितीनुसार सौर पंप व्यवहार्य
नसल्यास,
त्या ठिकाणी पारंपरिक कृषी पंप देण्याबाबत शासन विचार करेल, अशी माहिती ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली. त्या
विधानसभेत सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर बोलत होत्या.
शेतकऱ्यांसाठी कृषी पंपांना वीज जोडणी देण्यासंदर्भात लवकरच बैठक घेऊन याबाबत
सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असं बोर्डीकर यांनी
सांगितलं.
वाळू
वाहतुकीसाठी चोवीस तास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी जीपीएस
प्रणाली आणि सीसीटीव्ही कॅमेरा पद्धती लागू करण्यात येणार आहे. महसूलमंत्री
चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधीमंडळात एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली. महाखनिज
या पोर्टलवरून हा परवाना देण्यात येईल. घरकुलांना पाच ब्रास वाळूची रॉयल्टी घरपोच
दिली जाते,
मात्र सदर वाळुची वाहतूक घरकुल बांधणाऱ्या व्यक्तीला करावी
लागते,
त्याचे पैसे कोण देणार, याबाबत याच अधिवेशनात निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही महसूल मंत्री बावनकुळे
यांनी दिली.
राज्यात
थॅलेसीमिया रोगाची विवाहपूर्व चाचणी बंधनकारक करण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी विधानसभेत ही माहिती दिली.
राज्यातल्या
घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात लवकरच व्यापक धोरण लागू करण्यात येईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली. सदस्य प्रज्ञा सातव
यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. डम्पिंग ग्राउंडऐवजी कचऱ्यावर आधारित वीज
निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी राज्य शासन विचाराधीन असल्याचं सामंत यांनी यावेळी
सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या आडगाव परिसरात सुमारे १२
वर्षांपूर्वी पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीने विद्युत वाहिनी टाकली आहे, मात्र
या कंपनीने अद्यापपर्यंत बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली नाही. विधान
परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काल विशेष उल्लेखाद्वारे ही बाब
सदनासमोर मांडली.
****
मराठवाड्यात यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत जवळपास ७७
टक्के हेक्टर क्षेत्रावर पीक पेरणी झाली आहे. कृषी विभागाच्या अहवालात ही माहिती
देण्यात आली. लातूर जिल्ह्यात सर्वाधिक ८८ टक्के पेरणी झाली असून हिंगोली
जिल्ह्यात सर्वात कमी ६४ टक्के पेरणी झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ८७
पूर्णांक ३५ टक्के,
जालना सुमारे ७० टक्के, बीड ६८, परभणी
७१ पूर्णांक ३५,
नांदेड ८१ तर धाराशिव जिल्ह्यात ८३ पूर्णांक ५५ टक्के
क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. मराठवाड्यात आतापर्यंत सरासरीच्या १२१
टक्के पावसाची नोंद झाली असल्याचं हवामान विभागाच्या अहवालात म्हटलं आहे.
****
बर्मिंगहम इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट
सामन्यात काल दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेंव्हा इंग्लंड संघाच्या पहिल्या डावात
३ बाद ७७ धावा झाल्या आहेत. आकाशदीपनं दोन बळी टिपले. भारतीय संघानं पहिल्या डावात
५८७ धावा केल्या. कर्णधार शुभमन गिलनं २६९ धावांची खेळी केली, तर
रविंद्र जडेजा ८९ आणि वाशिंग्टन सुंदरने ४२ धावांची खेळी केली.
****
आषाढी वारीसाठी निघालेल्या संतांच्या पालख्या काल पंढरपूर
तालुक्यात दाखल झाल्या. तालुका प्रशासनाच्या वतीने तहसीलदार सचिन लंगुटे यांनी
सर्व पालख्यांचं स्वागत केलं.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं काल सोलापूर
जिल्ह्यात ठाकूर बुवा समाधी गोल रिंगण पार पडलं. त्यानंतर सोपानकाकांच्या पालखीची
आणि माउलींच्या पालखीची भेट झाली. दोन्ही संस्थानकडून परस्परांना मानाचे नारळ
देण्यात आले.
जगद्गुरू संत तुकारम महाराज यांची पालखी काल बोरगावइथून
मार्गस्थ होत तोंडले बोंडले या ठिकाणी पोहचली. या ठिकाणी पालखीतील सर्व
वारकऱ्यांनी प्रथेप्रमाणे पंढरीच्या दिशेने धाव घेतली. आज पालखी पिराची कुरोली
इथून पुढे मार्गस्थ होईल.
संत एकनाथ महाराज यांची पालखी आज करकंब इथून प्रस्थान करेल, पालखीचा
आजचा मुक्काम होळे इथं होणार असून, उद्या दुपारी शिराढोण इथं
उभं रिंगण करून,
सायंकाळच्या सुमारास पालखी पंढरपुरात दाखल होईल.
****
छत्रपती संभाजीनगर नजिक पंढरपूर इथं आषाढी एकादशीनिमित्त
होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर या मार्गावरील वाहतुक शनिवारी रात्रीपासून
तात्पुरत्या स्वरूपात बंद राहणार आहे, वाहन धारकांनी या काळात
पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहनही पोलिस विभागाच्या वाहतुक शाखेनं केलं
आहे.
****
नांदेड इथं बार्टीच्या कंत्राटी महिला जिल्हा प्रकल्प
अधिकारी सुजाता मधुकर पोहरे हिला काल १५ हजार रुपयांची लाच घेतांना लाच लुचपत
प्रतिबंधक विभागानं अटक केली. तक्रारदाराला जात वैधता प्रमाणपत्र मिळवून
देण्याच्या बदल्यात पोहरे हिने ३० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. या
कारवाईनंतर पोहरे हिच्याकडे रोख ५० हजार रुपयांसह एक मोबाईल आढळून आला. लाचलुचपत
प्रतिबंधक विभागाने तिच्या हडको इथल्या घराचीही झडती घेतल्याची माहिती आमच्या
वार्ताहरानं दिली आहे.
****
प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियाना अंतर्गत काल बीड इथं
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी अढावा बैठक घेतली. जिल्ह्यात एकूण एक हजार २३९
क्षय रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी ३५० रूग्णांना निक्षय मित्र यांच्यामार्फत
निक्षय पोषण आहार किटचं वाटप करण्यात आलं.
****
अहिल्यानगर जिल्ह्यातल्या भंडारदरा धरणातून कालपासून सुमारे
१८०० घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी प्रवरा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. या
विसर्गात वाढ होण्याची शक्यता असल्याने, नदीकाठच्या सर्व गाव तसंच
वस्त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, नाशिक तसंच जळगाव जिल्ह्यांना आणि
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरसह इतर काही जिल्ह्यांना उद्या पाच जुलैपासून हवामान
विभागाने यलो अलर्ट दिला आहे.
****
No comments:
Post a Comment