Saturday, 5 July 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 05 जूलै २०२५ रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 05 July 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०५ जूलै २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नरत-पंढरपुरात कृषी पंढरी प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

·      संतांच्या पालख्या पंढरपुरात दाखल होण्यास प्रारंभ-उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा

·      मराठी आणि मराठी माणूस यावर तडजोड नाही-राज ठाकरे तसंच उद्धव ठाकरे यांची स्पष्टोक्ती

·      बीड लैंगिक अत्याचार प्रकरणातले सर्व सीडीआर तपासण्याची राज्य महिला आयोगाची ग्वाही

आणि

·      सुपर युनायटेड रॅपिड अँड ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा डी. गुकेश अजिंक्य

****

शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नरत असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज पंढरपूर इथं कृषी पंढरी या शेती प्रदर्शनाचं उद्घाटन करताना बोलत होते. शेतकऱ्यांना शेती फायद्याची झाली पाहिजे, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी आज वाखरी इथं संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासमवेत पालखी खांद्यावर घेऊन दिंडी सोहळ्यात सहभाग घेतला. पालखीचं प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ यांनी मुख्यमंत्र्यांचं माऊलींची प्रतिमा देऊन स्वागत केलं. मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत निर्मल दिंडी, चरण सेवा उपक्रम तसंच आरोग्य वारीचा आज समारोप झाला.

आषाढी एकादशी सोहळा उद्या साजरा होणार आहे. यानिमित्तानं उद्या पहाटे विठ्ठल रुक्मिणीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपुरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यंदाच्या आषाढी वारीसाठी पंढरपुरात वीस लाख भाविक येतील असा प्रशासनाचा अंदाज आहे. मंदिर परिसर वारकऱ्यांच्या गर्दीनं फुलून गेला आहे. दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या व्यवस्थेसाठी गोपाळपूर हद्दीत मंदिर समितीने सर्व सुविधायुक्त दोन जर्मन हँगर उभारले असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. पंढरपूर शहरात पालिकेनं स्वच्छतेसाठी एक हजार ६५० कर्मचारी नियुक्त केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सामाजिक माध्यमावरील आपल्या संदेशाद्वारे ही माहिती दिली. योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधारशी सलग्न बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

****

मराठी भाषा आणि मराठी माणूस यावर कदापिही तडजोड होणार नाही, मराठीसाठीची एकजूट कायम राहावी, असं आवाहन, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. शालेय अभ्यासक्रमात हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात आज मुंबईत वरळी इथं झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. कोणत्याही वाद आणि भांडणांपेक्षा महाराष्ट्र मोठा असल्याचं राज ठाकरे यांनी नमूद केलं, तर एकत्र राहण्यासाठी एकत्र आल्याचं, उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. या दोन्ही नेत्यांच्या भाषणाचा हा संपादित अंश

बाईट – राज ठाकरे, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि

उद्धव ठाकरे, प्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष

****

विविध आव्हानात्मक परिस्थितींचा सामना करतांना प्रत्येक नवीन विषयाचा विद्यार्थी या नात्याने प्रांजळपणे अभ्यास करण्याची गरज, सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली आहे. आज मुंबईत सरन्यायाधीश भूषण गवई यांचा मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने गौरव करण्यात आला, या सत्काराला ते उत्तर देत होते. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उच्च न्यायालयातील लाईव्ह स्ट्रीमिंग प्रणालीचं उद्घाटन करण्यात आलं.

****

फरार आर्थिक गुन्हेगार नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी याला अमेरीकेत अटक करण्यात आली. अंमलबजावणी संचालनालय-ईडी आणि केंद्रीय अन्वेषण ब्युरो-सीबीआय यांनी नेहल मोदी याच्या प्रत्यार्पणाची विनंती केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, फरार नीरव मोदी इंग्लड मधे असून, त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातल्या हाडोळती इथले शेतकरी अंबादास पवार यांची आज सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी भेट घेत, पवार यांच्या पीककर्जाचा संबंधित बँकेकडे भरणा केला. शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक असल्याचं पाटील यांनी सांगितलं. मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे, उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, तहसीलदार उज्वला पांगरकर यांच्यासह अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते.

****

बीड इथल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातले सर्व सीडीआर दूरध्वनीवरील संभाषण ध्वनिमुद्रण तपासलं जाणार असल्याचं, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. आज बीड इथं यासंदर्भातल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. या प्रकरणात इतर विद्यार्थिनींना देखील अशा पद्धतीच्या कृत्याचा सामना करावा लागला असेल तर तक्रारी करण्याचं आवाहन, चाकणकर यांनी केलं, तसंच तपास पूर्ण होत आल्यावर सविस्तर माहिती दिली जाईल, असंही चाकणकर यांनी सांगितलं, त्या म्हणाल्या

बाईट – रूपाली चाकणकर, अध्यक्ष, राज्य महिला आयोग

****

माजी मंत्री अशोकराव पाटील डोणगावकर यांचं आज छत्रपती संभाजीनगर इथं निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. पाटील यांनी गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघातून विधानसभेत प्रतिनिधित्व केलं होतं. डोणगावचे सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, तसंच जिल्हा बँकेचे संचालक म्हणून काम पाहिलेले डोणगावकर यांनी, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून काम केलं होतं. पाटील यांच्या पार्थिव देहावर उद्या डोणगाव इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

****

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यात अनेक शाळांमध्ये आज विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेशभुषेत दिंडी काढण्यात आली. या वारीत विठ्ठल रुक्मिणीसह संतांचे सजीव देखावे साकारून वारकऱ्यांची वेशभूषा साकारली.

छत्रपती संभाजीनगरातूनही ठिकठिकाणी बाल वारकऱ्यांच्या दिंड्या काढण्यात आल्या. टाळ मृदुंगाच्या गजरात निघालेल्या या दिंड्यांनी नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं.

****

आषाढी एकादशी उपवासाच्या काळात भगरीचं मोठ्या प्रमाणावर सेवन होत असतं, परंतु, अलीकडच्या काळात भरगीच्या सेवनामुळे विषबाधेचे प्रकार घडले आहेत, त्यामुळे बीड जिल्ह्यातल्या नागरिकांनी भगरीचं सेवन करतांना योग्य काळजी घेण्याचं आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी केलं आहे.

****

क्रोएशिया इथं सुरू असलेल्या सुपर युनायटेड रॅपिड अँड ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या डी. गुकेशनं विजेतेपद पटकावलं आहे. या स्पर्धेत गुकेशनं अंतिम फेरीत अमेरिकेच्या वेस्ली सो चा पराभव केला. १८ पैकी १४ गुण मिळवून गुकेशनं रॅपिड फॉरमॅट मध्ये पहिलं स्थान पटकावलं. पोलंडचा जान क्रिजस्टोफ दुडा दुसऱ्या स्थानावर असून माजी विश्वविजेता, नॉवेचा मॅग्नस कार्लसन तिसऱ्या स्थानावर आहे. भारताचा प्रज्ञानंद देखील या स्पर्धेत सहभागी असून तो फॅबियानो कारुआनासमवेत संयुक्तपणे चौथ्या स्थानावर आहे.

****

जॉर्जियातल्या बटुमी इथं आजपासून बुद्धिबळ फिडे महिला विश्वचषक स्पर्धा सुरू होत आहे. भारताच्या ९ महिला बुद्धिबळपटू यात सहभागी होणार आहेत.

****

विंम्बल्डन टेनिस स्पर्धेत आज भारतीय खेळाडूंचे सामने होणार आहेत. पुरुष दुहेरीत युकी भांब्री, एन.श्रीराम बालाजी आणि रित्विक चौधरी बोलिपल्ली हे खेळाडू आपापल्या परदेशी जोडीदारांसोबत मैदानावर उतरणार आहेत.

****

कॅनडा खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत भारताच्या किदांबी श्रीकांतनं उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे. श्रीकांतनं जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या चायनीज तैपेईच्या चोऊ टीएन चेन चा २१-१८, २१-९ असा सरळ सेट मध्ये पराभव केला. उपांत्यफेरीत आज श्रीकांतचा सामना जपानच्या केंटा निशिमोटो बरोबर होणार आहे.

****

बर्मिंगहम इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आजच्या चौथ्या दिवसी उपाहारापर्यंत भारताच्या ३ बाद १७७ धावा झाल्या आहेत. आता भारताला एकूण ३५७ धावांची आघाडी मिळाली आहे. कर्णधार शुभमन गिल २४ तर ऋषभ पंत ४१ धावांवर खेळत आहेत.

****

हवामान

मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आज जोरदार ते अति जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यासह इतर काही जिल्ह्यांना आजपासून हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.

****

No comments: