Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 04 July 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०४ जूलै २०२५ सायंकाळी ६.१०
****
· शिक्षक आणि शिक्षकेतर बोगस भरती प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश
· बालविवाहासह कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात कडक कारवाईच्या महिला आयोगाच्या सूचना
आणि
· बर्मिंगहम कसोटीच्या तिसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत इंग्लंडच्या पाच बाद २४९ धावा
****
भारतीय संस्कृतीतल्या शूर योद्ध्यांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत
पोहोचवणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन, केंद्रीय गृहमंत्री अमित
शहा यांनी केलं आहे. पुण्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी- एनडीएच्या परिसरात त्रिशक्ती
प्रवेशद्वारावर थोरले बाजीराव पेशवे यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचं शहा यांच्या हस्ते
आज अनावरण झालं,
त्यावेळी ते बोलत होते. पुरुषार्थ, समर्पण
आणि बलिदान याची प्रेरणा देणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे बाजीराव पेशवे असल्याचं शहा यांनी
नमूद केलं. ते म्हणाले –
बाईट – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
एनडीएने बाजीराव पेशव्यांचा पुतळा उभारण्याची परवानगी देऊन, देशसेवेत जाणाऱ्या भावी सैनिकांना उत्तुंग व्यक्तीमत्त्वाकडून प्रेरणा घेण्याची
संधी दिली,
या शब्दांत शहा यांनी या पुतळा उभारण्याच्या संकल्पनेचं कौतुक
केलं. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे,
उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्यासह
अनेक मान्यवर उपस्थित होते. हा पुतळा तयार करणारे विपुल खटावकर, वास्तुविशारद अभिषेक भोई, यांचा शहा यांच्या हस्ते सत्कार
करण्यात आला.
****
केंद्र सरकारने गेल्या १० वर्षांत सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून २८ कोटींपेक्षा अधिक रोजगारांच्या
संधी निर्माण केल्याची माहिती केंद्रीय सूक्ष्म, लघु
आणि मध्यम उद्योग- मंत्री जितनराम मांझी यांनी दिली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत
बोलत होते. प्रधानमंत्री रोजगार हमी योजनेतून ८० टक्के ग्रामीण भागात तर २० टक्के शहरी
भागात रोजगार उपलब्ध करून दिल्याची माहिती मांझी यांनी दिली.
****
राज्यातल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा बोगस पदभरती
प्रकरणी,
संबंधित विभाग आणि शिक्षणसंस्थांचे अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश शासनानं दिले
आहेत. शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात
ही माहिती दिली. या प्रकरणी एका महिन्याच्या आत राज्यस्तरीय चौकशी समिती स्थापन केली
जाणार असल्याचंही भोयर यांनी सभागृहाला सांगितलं. राज्य सरकारच्या १५ मार्च २०२४ च्या
शासन निर्णयानुसार ठरवलेल्या, शाळांच्या संचमान्यतेच्या निकषात
सुधारणा केली जाणार आहे, तसंच शालार्थ ओळखपत्र तातडीनं
देण्याचा प्रस्तावही विचाराधीन आहे, असंही भोयर यांनी एका तारांकित
प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं.
****
धाराशीव जिल्ह्यात पवनचक्की कंपन्या स्थानिक गुंड आणि पोलीस
अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याबद्दलच्या सर्व तक्रारींची
पोलिस महानिरीक्षकाकडून उच्चस्तरीय चौकशी करायची घोषणा गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी
केली. यासंदर्भातील लक्षवेधी कैलास पाटील यांनी उपस्थित केली होती. पवनचक्कीप्रकरणी
प्राप्त झालेल्या ३१३ तक्रारींपैकी २१० तक्रारी निकाली निघाल्या आहेत, तर १०३ तक्रारींवर कार्यवाही सुरू असल्याची माहिती भोयर यांनी दिली. या प्रकरणांची
पोलीस महानिरीक्षकांमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करू असं आश्वासन त्यांनी दिलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या अन्न आणि औषध प्रशासनातल्या अधिकाऱ्यांवर
कारवाईची मागणी करणारी लक्षवेधी आज चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांनी विधानसभेत
दाखल केली. छत्रपती संभाजीनगर इथं सुगंधी सुपारी तसंच गुटखा जप्तीची मोठी कारवाई झालेली
आहे,
मात्र दोषींवर कारवाई झालेली नाही, असं
या वृत्तात म्हटलं आहे. अन्न औषध प्रशासनाचे छत्रपती संभाजीनगरचे आयुक्त याला जबाबदार
असल्याचा आरोप या लक्षवेधीतून करण्यात आला आहे.
बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांनीही या चर्चेत सहभाग घेत, छत्रपती संभाजीनगरात शैक्षणिक संस्थांच्या पसिरातल्या पान टपऱ्यांवर गुटख्यासोबतच
अंमलीपदार्थ आणि नशेच्या गोळ्या विकल्या जात असल्याची माहिती सदनाला दिली. अन्न आणि
औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी यासंदर्भात कारवाईचं आश्वासन दिलं आहे.
****
राज्यातल्या मालमत्ता खरेदी विक्रीच्या नोंदणीनंतर संबंधित स्थानिक
स्वराज्य संस्थांना त्यांच्या हिश्शाची एक टक्का रक्कम त्वरित देण्यासाठी वेगळी यंत्रणा
तयार केली जाणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत एका लक्षवेधीच्या
उत्तरात ही माहिती दिली.
****
राज्यातल्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, अपुरा हमीभाव, अपुरी नुकसान भरपाई आणि कर्जमाफीच्या अंमलबजावणीतील
दुर्लक्ष यामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागत असल्याचा आरोप विधान परिषदेत विरोधी
पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. नियम २६० अन्वये मांडलेल्या ठरावादरम्यान बोलतांना
दानवे यांनी शेतकऱ्यांना पीककर्ज घेण्यासाठी अनेक अडचणी येत असल्याकडे सदनाचं लक्ष
वेधलं,
ते म्हणाले –
बाईट – अंबादास दानवे, विधान परिषद विरोधी
पक्षनेते
****
आदिवासी विभागाच्या वसतिगृहांमध्ये राहून उच्च शिक्षण घेणाऱ्या
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध भत्त्यांमध्ये मोठी वाढ करण्यात
आली आहे. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे ही माहिती
दिली.
****
बालविवाह, गर्भलिंगनिदान, हुंडाबळी तसंच कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात कडक कारवाईच्या सूचना, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिल्या आहेत. आज नंदुरबार
इथं जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात झालेल्या भरोसा सेलच्या आढावा बैठकीत त्या बोलत
होत्या. शासकीय,
निमशासकीय आणि खाजगी आस्थापनांमधून कामाच्या ठिकाणी होणाऱ्या
महिलांच्या लैंगिक छळाविरूद्ध समित्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत की नाही याबाबतचा
अहवाल पंधरा दिवसांत आयोगासमोर सादर करण्याचे निर्देश देखील त्यांनी यावेळी दिले. यावेळी
चाकणकर यांच्या हस्ते महिला समुपदेशन आणि सुसंवाद केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं.
****
गोदावरी नदीचं प्रदूषण कमी करण्यासाठी ‘नमामि गोदावरी’ कृती
आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनानं
आज सी एस आर बॉक्स या संस्थेशी सामंजस्य करार केला आहे. जिल्ह्यातील ज्या ज्या भागातून
गोदावरी नदी वाहते तिथे आणि नदीशी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या संबंधित प्रत्येक क्षेत्रात
ही संस्था कार्य करेल. नाशिक ते नांदेड या दरम्यान गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी ‘दी
गोदावरी इनिशिएटीव्ह’ या नावानं अभियान राबविण्यात येत आहे.
****
बर्मिंगहम इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात
आज तिसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत इंग्लंडच्या पाच बाद २४९ धावा झाल्या असून ते पहिल्या
डावात अजून ३३८ धावांनी पिछाडीवर आहेत. आज इंग्लंडचा डाव सुरू झाल्यानंतर मोहम्मद सिराजनं
जो रूट आणि कर्णधार बेन स्टोक्स यांना लागोपाठ चेंडुंवर बाद करत यजमानांची अवस्था पाच
बाद ८४ धावा अशी केली. भारताकडून मोहम्मद सिराजनं तीन तर आकाश दीपनं दोन बळी घेतले.
दरम्यान, महिला क्रिकेट मध्ये आज भारत
आणि इंग्लंडदरम्यान तिसरा टी-ट्वेंटी क्रिकेट सामना लंडन इथं खेळवला जाणार आहे. पाच
सामन्यांच्या या मालिकेत भारतीय महिला संघ दोन - शुन्यनं आघाडीवर आहे.
****
नांदेड जिल्ह्याच्या आदिवासीबहुल किनवट परिसरातल्या साने गुरुजी
रुग्णालयात सेवा देणारे डॉ. अशोक बेलखोडे यांना पुण्याच्या चिमणलाल गोविंददास मेमोरियल
ट्रस्टचा सेवा गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. पन्नास हजार रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह अशा स्वरुपाचा हा पुरस्कार येत्या १३ जुलै रोजी पुण्यात
समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराबाबत डॉ बेलखोडे यांनी आपल्या
भावना या शब्दांत व्यक्त केल्या –
बाईट - डॉ.अशोक
बेलखोडे
****
आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेली
संत एकनाथ महाराज यांची पालखी आज सायंकाळी होळे मुक्कामी दाखल
होईल. उद्या सकाळी पालखी कवठाळीकडे मार्गस्थ होईल. शिराढोण इथं उभं रिंगण पार पडल्यानंतर
सायंकाळपर्यंत पालखी पंढरपुरात दाखल होईल. येत्या गुरुपौर्णिमेपर्यंत पालखी पंढरपुरात
मुक्कामी राहणार असून, चतुर्दशीला विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भानुदास
महाराजांचा पुण्यतिथी सोहळा साजरा होणार आहे.
****
No comments:
Post a Comment