Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 09 July 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०९ जूलै २०२५ सायंकाळी ६.१०
****
· छत्रपती संभाजीनगर इथल्या अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणी जिल्हा बालविकास अधिकाऱ्यांचं
तत्काळ निलंबन-संबंधित संस्थेची मान्यता रद्द करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
· राज्यात तुकडेबंदी कायदा शिथिल-पंधरा दिवसांत कार्यपद्धती जाहीर करण्याची महसूल
मंत्र्यांची घोषणा
· पुणे-अहिल्यानगर या महत्वाकांक्षी रेल्वेमार्गाचा प्रकल्प अहवाल रेल्वे बोर्डाला
सादर
आणि
· विदर्भात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत-शासनाकडून बचाव आणि मदतकार्य सुरू
****
छत्रपती संभाजीनगर इथं विद्यादीप बालसुधारगृहात अल्पवयीन मुलींवर
अत्याचार प्रकरणी जिल्हा बालविकास अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात आलं असून, संबंधित संस्थेची मान्यता रद्द करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
दिले. आज आमदार चित्रा वाघ यांनी अल्पसूचना प्रश्नाद्वारे हा मुदा सभागृहात उपस्थित
केला.
या बालगृहात अल्पवयीन मुलींना, मारहाण
तसंच अमानवी छळासह त्यांच्यावर धर्मांतर करण्याचाही दबाव होता, असा मुद्दा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही उपस्थित केला. या प्रकरणी चौकशी
करण्यासाठी तीन वरिष्ठ महिला पोलीस निरीक्षकांची समिती स्थापन केली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी
सांगितलं. ते म्हणाले –
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई उच्च न्यायालयानेही अमायकस क्युरे अर्थात न्यायमित्रमार्फत
या प्रकरणाची दखल घेत पावले उचलली आहेत, याची माहिती फडणवीस यांनी
सभागृहाला दिली. राष्ट्रीय महिला आयोगानंही या प्रकरणाची दखल घेत, सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईचे निर्देश दिले आहेत.
****
शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर पेरा नसताना, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी किंवा कर्मचारी पिकांचा उल्लेख दाखवून भ्रष्टाचार
करत असल्याचा मुद्दा अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई
करणार का,
असा प्रश्नही दानवे यांनी विचारला –
बाईट – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते,
विधान परिषद
****
राज्यात तुकडेबंदी कायदा शिथिल केला जाणार असून, भविष्यात हा कायदा रद्द करण्यासाठी योग्य कार्यपद्धती ठरवली जाईल, अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत केली. एक जानेवारी
२०२५ पर्यंत नागरी क्षेत्रांमध्ये जे तुकडे झाले आहेत, त्यांना
कायदेशीर दर्जा देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. हा कायदा
शिथिल करताना,
एक योग्य कार्यपद्धती तयार करून १५ दिवसांत ती जाहीर केली जाईल, दलालांचा हस्तक्षेप रोखण्यासाठी ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली जाईल, सदर एसओपी तयार करण्यासाठी चार सदस्यीय समिती गठित करण्यात येणार आहे. ही समिती
प्रत्येक भागातील परिस्थितीचा अभ्यास करून शिफारसी करेल, असं
बावनकुळे यांनी सांगितलं.
****
राज्यात ग्राहकांना स्मार्ट मीटर लावण्याची कोणतीही सक्ती करण्यात
नसून,
स्मार्ट मीटर लावल्यामुळे, ग्राहकांच्या
वीज बिलात कपात झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत
दिली. आमदार मिलिंद नार्वेकर यांनी ग्राहकांना, ठराविक
कंपनीकडून स्मार्ट मीटर लावून घेण्याची, जबरदस्ती केली जात असल्याचा
मुद्दा लक्षवेधी द्वारे उपस्थित केला होता.
राज्यात, ३७ लाख स्मार्ट मीटर लावण्यात
आले आहेत,
त्या पैकी फक्त एक टक्का ग्राहकांच्या तक्रारी प्राप्त झाल्याची
माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
****
राज्यभरातील सुमारे सहा हजार अंशत: अनुदानित शाळांना अनुदान
मिळावे,
यासाठी गेल्या चार दिवसांपासून विनाअनुदानित शिक्षक आक्रमक झाले
आहेत. मुंबईच्या आझाद मैदानात हजारो शिक्षक एकत्र आले असून त्यांनी आंदोलन सुरू केलं. अनुदान मिळेपर्यंत मैदान सोडणार नाही, असा त्यांचा निर्धार आहे. राज्य सरकारने या शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याचा
निर्णय घेतला होता. मात्र, अद्याप निधीची तरतूद न केल्याने
हे आंदोलन सुरू आहे. या विषयावर मुख्यमंत्री स्तरावर चर्चा होणार असून त्यात त्यावर
तोडगा काढण्यात येईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली.
****
शासकीय कर्मचाऱ्यांना शासनातर्फे देण्यात येणाऱ्या वैद्यकीय
प्रतिपुर्ती योजनेची प्रक्रिया ऑनलाईन
आणि पारदर्शक पध्दतीने होईल यासाठी
शासन आवश्यक त्या उपाययोजना करेल तसेच हरियाणा आणि अन्य राज्यात राबवण्यात येणाऱ्या
कॅशलेस योजनेचाही अभ्यास करू असे मंत्री विधीज्ञ आशिष शेलार यांनी आज विधान परिषदेत
आश्वस्त केले.
****
छत्रपती संभाजीनगर मधील फुलंब्री इथल्या बनावट सही शिक्के वापरून
प्लॉट विक्री करण्याच्या प्रकरणातील संबंधित मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना निलंबित
करून या सर्व प्रकरणाची चौकशी विभागीय आयुक्तांकडून करण्यात येईल अशी घोषणा महसूलमंत्री
चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. याबाबतची लक्षवेधी सूचना अनुराधा चव्हाण यांनी उपस्थित
केली होती.
****
पुणे-अहिल्यानगर या महत्वाकांक्षी रेल्वेमार्गाचा डीपीआर अर्थात
प्रकल्प अहवाल रेल्वेच्या बांधकाम विभागाने सर्वेक्षण करून रेल्वे बोर्डाला सादर केला
आहे. गेली अनेक वर्षांपासून या रेल्वे मार्गाची नगरकरांची मागणी होती. यासाठी खासदार
नीलेश लंके यांनी पाठपुरावा केला होता. हा रेल्वेमार्ग सध्याच्या पुणे-अहिल्यानगर मार्गाला
समांतर असेल. नवा मार्ग झाल्यानंतर सध्याच्या रेल्वे मार्गाच्या अंतरापेक्षा नगर ते
पुणे हे अंतर ३८ किलोमीटरने कमी होईल. हा रेल्वेमार्ग ११६ किलोमीटर लांबीचा असून नगर ते पुणेदरम्यान ११ स्थानकांचा त्यात
समावेश आहे.
****
विदर्भात बहुतांश जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी
पाणी साचून अनेक रस्ते बंद झाले आहेत. तसंच नद्या आणि नाले दुथडी भरुन
वाहत आहेत. वर्धा इथं यशोदा नदीला पूर आल्यानं वर्धा ते राळेगाव रस्ता बंद झाला आहे.
हवामान विभागानं नागपूर आणि वर्धा जिल्ह्यासाठी आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी
केला आहे.
गोंदिया जिल्ह्यात मुंबई-कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावर मासुलकसा
घाट परिसरात नव्याने उभारलेल्या उड्डाणपुलाला तडे गेले असून पुलावर खड्डा पडला आहे.
पुलावरील सुरक्षा भिंत देखील पावसामुळे खचली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने बचाव आणि
मदतकार्य सुरू केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.
****
कामगार कायद्याच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर इथं भारतीय ट्रेड
युनियनच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करुन निदर्शने करण्यात आली. या बंदमध्ये पोस्टल
कर्मचारी,
सरकारी, निमसरकारी, शिक्षक,
शिक्षकेत्तर, नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी समिती, महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी
अभियंते,
अधिकारी कृती समिती, राज्य
सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेसह आदी संघटनांनी या वेळी बंद तसंच निदर्षणामध्ये सहभाग घेतला.
धुळे, सांगली इथंही विविध संघटनांच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं.
****
चालू वर्षात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक लाख ५४ हजार ७७०
शेतकऱ्यांना एक हजार ५९६ कोटी ६३ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी
९३ हजार १०२ शेतकऱ्यांना ७३० कोटी रुपये कर्ज वाटप झालं आहे. शेतकऱ्यांना वेळेत पीक
कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासन आणि बॅंका स्वत: शेतकऱ्यांपर्यंत
पोहोचत आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी ‘अर्ज द्या, कर्ज घ्या’,
हे अभियानही जिल्ह्यात सुरु केलं आहे. या अंतर्गत आज चित्तेगाव
इथं झालेल्या कर्ज मेळाव्याला जिल्हाधिकारी स्वामी उपस्थित होते. जिल्ह्यातील एक लाख
८७ हजार ९१२ शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे नूतनीकरण बाकी आहे. तरी शेतकऱ्यांनी आपल्या
जुन्या पीक कर्जाचे नुतनीकरण करुन घ्यावे, असं
आवाहनही जिल्हाधिकारी स्वामी यांनी केलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं सिडकोचे मुख्य प्रशासक नवीन शहरे म्हणून
भारतीय प्रशासन सेवेतील जगदीश मिनियार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मिनियार यांनी
आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. मिनियार हे जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी म्हणून कार्यरत होते.
****
लातूर तालुक्यातील ११० ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी ११
जुलै रोजी आरक्षण सोडत होणार आहे. लातूर तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिकांनी या आरक्षण सोडत बैठकीस उपस्थित रहावं, असं लातूरच्या तहसील कार्यालयामार्फत कळवण्यात आलं आहे.
****
महिला क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यान चौथा टी-ट्वेंटी
सामना आज मँचेस्टर इथं खेळवला जाणार आहे.
****
No comments:
Post a Comment