Wednesday, 9 July 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 09.07.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 09 July 2025

Time: 7.10 to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: ०९ जूलै २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      पंतप्रधान नरेंद्र मोदी नामिबिया दौऱ्यावर- दोन्ही देशांदरम्यान ऊर्जा, आरोग्य यासह विविध क्षेत्रांत परस्पर सामंजस्य करार होणार

·      राज्यघटनेतली मूलभूत तत्वं आणि मूलभूत अधिकार हे घटनेचा आत्मा - सरन्यायाधीशांचं प्रतिपादन

·      विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीचं सरन्यायाधीशांना निवेदन

·      अनुदानित अभियांत्रिकी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरती करण्याला मुख्यमंत्र्यांची मान्यता

आणि

·      राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर कायम, जायकवाडी धरणात ६० टक्क्यावर जलसाठा

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात आज नामिबिया दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांच्या उपस्थितीत दोन्ही देशांदरम्यान आर्थिक सहकार्य, ऊर्जा सुरक्षा, आरोग्य आणि औषधनिर्माण या क्षेत्रांत परस्पर सामंजस्य करार होणार आहेत. याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून...

आफ्रिका खंड भारताच्या परराष्ट्र धोरणाचे केंद्र बनत असताना, पंतप्रधानांचा नामिबिया दौरा महत्वपूर्ण आहे. नामिबियामध्ये खनिजांचे प्रचंड साठे आहेत जे भारताच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमणासाठी आणि सध्याच्या आणि भविष्यातील ऊर्जेच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचे आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये आज होणाऱ्या द्विपक्षीय वाटाघाटींमध्ये ऊर्जा, तेल आणि वायू, महत्त्वपूर्ण खनिजे, दुर्मिळ पृथ्वी तत्व आणि डिजिटल पायाभूत सुविधा यासारख्या प्रमुख क्षेत्रांमधील सहकार वाढविण्या बरोबरच, आरोग्याचा सुविधांचा व्याप वाढविण्या वरही चर्चा होईल. भारताची यु पी आई प्रणाली लवकरात लवकर नामिबिया मध्ये लागू करण्या बाबत पण दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होईल. पंतप्रधानांच्या भेटीमुळे दोन्ही देशातील व्यावसायिक संबंध वाढतील तसेच नामिबियाच्या प्रमुख क्षेत्रांमध्ये भारतीय गुंतवणुकीसाठी नवीन मार्ग मोकळे होण्याची अपेक्षा आहे.

अपर्णा खुंट, आकाशवाणी बातम्या, विंडहोक

****

भारतीय राज्यघटनेतली मूलभूत तत्वं आणि मूलभूत अधिकार हे घटनेचा आत्मा आहेत, या दोन्हींचा एकत्रित विचार करून सामाजिक आणि आर्थिक न्यायासाठी काम करण्याचं आवाहन, सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केलं आहे. काल मुंबईत विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात राज्य विधीमंडळाच्या वतीने सरन्यायाधीश गवई यांचा सत्कार करण्यात आला, त्यानंतर भारतीय राज्यघटना या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शनपर भाषणात ते बोलत होते. कुठल्याही पदासोबत जबाबदारीही येते आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे पाईक असलेल्या आपल्याला सरन्यायाधीश पदाची जबाबदारी मिळाली ही अभिमानाची गोष्ट असल्याचं त्यांनी नमूद केलं. विधीपालिका, न्यायपालिका आणि कार्यपालिकांनी राज्यघटनेच्या मर्यादेत काम केल्यास, कोणत्याही संस्थेत मतभेदाची स्थिती निर्माण होणार नाही, असं सरन्यायाधीशांनी सांगितलं, ते म्हणाले...

बाईट - सरन्यायाधीश भूषण गवई

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलेल्या भाषणात सरन्यायाधीशांच्या कामकाजाच्या पद्धतीसोबतच त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांचा उल्लेख केला. ते म्हणाले...

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केलेल्या भाषणात, राज्यघटनेचं महत्त्व आणि विविध पैलू सरन्यायाधीशांनी समजावून सांगणं ही घटना भारतीय लोकशाहीला बळकट करणारी असून, ही बाब विधिमंडळाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाईल, असं प्रतिपादन केलं, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात, फक्त न्यायमूर्ती म्हणून नव्हे तर, आदर्श नागरिक आणि संवेदनशील प्रेरणादायी व्यक्तिमत्व असलेल्या सरन्यायाधीशांचं कार्यकर्तृत्व, दीपस्तंभासारखं असल्याचं, नमूद केलं.

****

या सोहळ्यापूर्वी विधीमंडळाच्या दोन्ही सदनात सरन्यायाधीशांच्या अभिनंदनाचा ठराव एकमताने संमत करण्यात आला.

दरम्यान, विधानसभा अध्यक्षांनी अद्याप विरोधी पक्षनेत्याची निवड केली नसल्याची बाब महाविकास आघाडीने सरन्यायाधीशांच्या निदर्शनाला आणून दिली. आघाडीच्या शिष्टमंडळानं याबाबतचं एक निवेदन त्यांना सादर केलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी वार्ताहरांशी बोलताना अधिक माहिती दिली..

बाईट - आमदार आदित्य ठाकरे

****

शासन अनुदानित अभियांत्रिकी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरती करण्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. सार्वजनिक ग्रंथालय अनुदानात ४० टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावालाही मान्यता दिली असून, हा प्रस्ताव तातडीने वित्त विभागाकडे पाठवावा, अशा सूचना त्यांनी या बैठकीत दिल्या.

विकासकामांचं वाटप महिला सहकारी संस्थांना करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभेत दिली. बीड जिल्ह्यात माजलगाव इथल्या पाटबंधारे विभागातल्या कामांच्या वाटपाबाबत सदस्य प्रकाश सोळंके यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर ते बोलत होते. विधीमंडळात काल झालेल्या इतर कामकाजाचा हा संक्षिप्त आढावा...

राज्यातील झोमॅटो, स्विगी अशा प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या गिग वर्कर्सची वाढती संख्या पाहता, सरकार त्यांच्यासाठी स्वतंत्र कायदे निर्माण करणार आहे. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी नियम २६० अन्वये मांडलेल्या ठरावाच्या उत्तरात ही माहिती दिली. असंघटित कामगारांच्या कल्याणाकरता राज्यात ६८ व्हर्चुअल बोर्डची रचना प्रस्तावित असल्याची माहितीही फुंडकर यांनी दिली.

राज्य सहकारी दूध महासंघातल्या भविष्‍य निर्वाह निधीमधल्या गैरव्यवहार प्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत सांगितलं तर दिव्यांग कल्याण विभागातली सगळी रिक्त पदं पुढच्या तीन महिन्यात भरली जाणार असल्याची माहिती सावे यांनी विधान परिषदेत दिली.

अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत पाच लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचं महाविद्यालय मिळालं असून कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत दिली.

जालना जिल्ह्यात पोकरा योजनेत झालेल्या अनियमिततेच्या प्रकरणाची चौकशी येत्या पंधरा दिवसात पूर्ण करून संबंधितांवर कठोर कारवाईचा इशारा कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिला आहे. ते काल विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या प्रश्नाला उत्तर देत होते.

राज्यातील २६१ सहकारी उपसा जलसिंचन योजनांच्या कर्जाच्या थकबाकी संदर्भात निर्णय होईपर्यंत संबंधित बँकांनी जप्ती किंवा अन्य कोणतीही कारवाई करू नये, असं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी काल विधानसभेत सांगितलं.

****

पुढच्या वर्षीच्या हज यात्रेसाठी अर्जप्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यासाठी हज पोर्टल किंवा हज सुविधा मोबाईल ॲपवरून इच्छुकांना ३१ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे.

****

धाराशिव जिल्ह्यात काल शाळा बंदच्या आवाहनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. विविध शिक्षक संघटना आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटनांच्या वतीने धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं.

****

देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात एक मॉडेल सौर ग्राम निर्माण करण्यासाठी सुरू केलेल्या स्पर्धेत राज्यातल्या सहा जिल्ह्यातल्या ६३ गावांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये परभणी जिल्ह्यातल्या सहा गावांचा समावेश आहे. या स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या गावाला केंद्र सरकारकडून एक कोटी रुपयांचं अनुदान मिळणार आहे.

****

राष्ट्रीय छात्र सेना - एन सी सी च्या महाराष्ट्र बटालियनच्या वतीनं किनवट इथं झालेल्या शिबिरात परभणीच्या श्री शिवाजी महाविद्यालयाच्या कडेट्सनी ड्रिल, फायरिंग, मैदानी स्पर्धा, तसंच सांस्कृतिक कार्यक्रमात पदकांची लयलूट केली. महाविद्यालयाच्या संघाने विविध स्पर्धांमध्ये एकूण २० पदकं पटकावली आहेत.

****

बोगस खतांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी लातूर इथल्या कृषी सहसंचालक कार्यालयात काल छावा संघटनेच्या वतीनं घंटानाद आंदोलन करण्यात आलं. या प्रकरणी कृषी सहसंचालकांना निवेदन देण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर कायम आहे. छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातही अनेक ठिकाणी पावसाची संततधार सुरू आहे. पैठणच्या जायकवाडी धरणात सध्या ५३ हजार ३३४ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत असून, धरणातला पाणीसाठा साठ टक्क्यांच्या वर पोहचला आहे.

****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 30 دسمبر 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 30 December-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خ...