Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 18 July 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ जुलै २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
स्वच्छता हा देशाच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जाणिवेचा
मुख्य पैलू - स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपतींचं प्रतिपादन - इंदूर
सलग आठव्या वर्षी देशातलं सर्वात स्वच्छ शहर
·
महाराष्ट्रात नवी मुंबई, मीरा भाईंदरसह
अनेक शहरांचा विविध श्रेणीत सन्मान
·
राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये विज्ञान आणि नाविन्यता
उपक्रम केंद्रं सुरू करण्याचा निर्णय
·
विधीमंडळ प्रांगणात आमदार मारहाणीचा प्रकार, घटनेची चौकशी
करुन कारवाई करु - विधानसभा अध्यक्षांचे प्रतिपादन
आणि
·
मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यांसाठी आज हवामान खात्याकडून
यलो अलर्ट, जायकवाडी धरणातील पाणीसाठा ७८ टक्क्यांवर
****
स्वच्छता
हा देशाच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जाणिवेचा मुख्य पैलू असल्याचं, राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत काल २०२४-२५ या वर्षासाठी स्वच्छ सर्वेक्षण
पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते वितरीत करण्यात आले, त्यावेळी
त्या बोलत होत्या. स्वच्छता ही भारतीयांच्या मूळ स्वभावातच असल्याचं राष्ट्रपतींनी
सांगितलं. त्या म्हणाल्या..,
बाईट
- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
या स्पर्धेत
मध्यप्रदेशातल्या इंदूरने सलग आठव्या वर्षी देशातलं सर्वात स्वच्छ शहर असण्याचा बहुमान
कायम राखला आहे. १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात इंदूरला पहिल्या
क्रमांकाचा, सुरतला दुसऱ्या, तर नवी मुंबईला तिसऱ्या
क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विविध श्रेणींमध्ये एकूण ७८ पुरस्कार राष्ट्रपतींच्या
हस्ते प्रदान करण्यात आले. तीन ते १० लाख लोकसंख्येच्या ‘स्वच्छ शहर’ श्रेणीत मीरा-भाईंदर
शहराला गौरवण्यात आलं. या क्रमवारीत पुण्याने देशात आठवा तर राज्यात दुसरा क्रमांक
मिळवला आहे. कराड, लोणावळा, पाचगणी,
पन्हाळा, विटा, सासवड,
देवळाली, प्रवरा आदी गावांनाही विविध श्रेणीत सन्मानित
करण्यात आलं.
****
राज्यातल्या
सर्व जिल्ह्यांमध्ये शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या नावे, विज्ञान आणि
नाविन्यता उपक्रम केंद्रं सुरू केली जाणार आहेत. सध्या काही जिल्ह्यात अशी केंद्रं
सुरू असून, २३ जिल्ह्यांमध्ये पुढील पाच वर्षांत स्टेट इन्स्टिट्यूट
ऑफ अकॅडमिक करिअर- राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था केंद्रं तसंच २८ नवीन तंत्रज्ञान
प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत. विधीमंडळाच्या दोन्ही सदनात माहिती तंत्रज्ञान मंत्री
आशिष शेलार यांनी काल ही घोषणा केली. सध्या सहा ठिकाणी ही केंद्रं सुरू असून नांदेड,
अकोला तसंच परभणी या तीन जिल्ह्यात अशी केंद्रं सुरू करण्याचं काम प्रगतीपथावर
असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
सौर पंपासाठी
कोटेशन भरणा केलेल्या शेतकऱ्यांना १२० दिवसाच्या आत जोडणी देत असल्याची माहिती, ऊर्जा राज्यमंत्री
मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिली. विधानसभेत राहुल पाटील यांच्या लक्षवेधी सूचनेला
त्या उत्तर देत होत्या. या संदर्भात अधिक माहिती देतांना त्या म्हणाल्या..,
बाईट
- ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर
****
स्थानिक
स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या चार महिन्यांत होतील असं उपमुख्यमंत्री एकनाथ
शिंदे यांनी काल विधानसभेत सांगितलं. ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती
दिल्यामुळे या निवडणुका होऊ शकल्या नाहीत, याकडे त्यांनी सदनाचं लक्ष वेधलं. विरोधी
पक्षांनी यासंदर्भातज राइट टू रिप्लायची मागणी केली. या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे
अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केलं होतं.
****
धर्मांतर
करून घेतलेले अनुसूचित जातींचे प्रमाणपत्र रद्द केले जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी काल विधान परिषदेत सांगितलं. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या २६ नोव्हेंबर
२०२४ च्या निर्वाळ्यानुसार अनुसूचित जातींच्या आरक्षणाचा लाभ केवळ हिंदू, बौद्ध आणि
शीख धर्मीयांनाच मिळू शकतो. इतर धर्मीयांनी चुकीच्या पद्धतीनं मिळवलेले अनुसूचित जातीचे
प्रमाणपत्र रद्द करून त्याद्वारे मिळवलेल्या लाभाची वसुली केली जाईल असं फडणवीस यांनी
सांगितलं.
****
विधानभवनाच्या
लॉबीमध्ये काल भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे
गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. या प्रकाराची गंभीर
दखल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतली असून, अहवाल मागवण्यात
आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त करत,
ही घटना अत्यंत अशोभनीय आणि चुकीची असल्याचं म्हटलं आहे. विधानसभा अध्यक्ष
आणि विधानपरिषद सभापतींनी यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी
केली आहे.
दरम्यान, काल दोन्ही
सभागृहात, विधान भवनाच्या प्रांगणात आमदारांना मारहाण झाल्याचे
मुद्दे उपस्थित करण्यात आले. आपल्याला मारण्यासाठी काही लोकांना बाहेरून आणलं होतं
असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत केला. तर, आमदार गोपीचंद
पडळकर यांना विधान भवनाच्या लॉबी मध्ये धक्काबुक्की करण्यात आली, त्याबाबत कारवाई करण्याची मागणी संजय उपाध्याय यांनी केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब
ठाकरे पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांना विधान भवन परिसरात मारहाण झाल्याची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी विधानसभेत दिली.
या सर्व प्रकरणांचा अहवाल मागितला असून, कारवाईचं आश्वासन अध्यक्ष
राहुल नार्वेकर यांनी दिलं.
****
दरम्यान, विधीमंडळाच्या
पावसाळी अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस आहे. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे
यांनी काल अंतिम आठवडा प्रस्ताव सादर केला. राज्यात कायदा सुव्यवस्था पूर्णपणे विस्कळीत
झालेली असून गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही, असा
आरोप करत, इतरही अनेक मुद्यांवर त्यांनी सरकारवर टीका केली.
राज्य सरकारच्या
मल्हारराव होळकर विद्यार्थी विकास योजनेत छत्रपती संभाजीनगर तसंच जालना जिल्ह्यात गैर
व्यवहार होत असल्याचा आरोपही करत, या प्रकरणी चौकशी करून कारवाईची मागणी
दानवे यांनी केली.
****
एक जानेवारी
२०२५ पूर्वीच्या एक हजार चौरस फुटांवरील जमिनींना आता कायदेशीर मान्यता मिळणार आहे.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे ही माहिती दिली. राज्यात
कृत्रिम वाळू धोरण तसंच गौण खनिज चोरीविरुद्ध कठोर कारवाईसाठी नवीन कार्यपद्धती तयार
करणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली.
****
राज्यातले
अनेक वरिष्ठ अधिकारी आणि नेते हनिट्रॅपमध्ये अडकले असून संवेदनशील, गोपनीय माहिती
बाहेर गेली आहे. याबाबत सरकार गंभीर असून यावर कारवाई केली जाईल असं उपमुख्यमंत्री
शिंदे यांनी काल विधानसभेत सांगितलं. मात्र सरकार या प्रकरणी दिशाभूल करत असल्याचा
आरोप भास्कर जाधव यांनी केला. यावर झालेल्या गदारोळानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी
सभात्याग केला.
****
छत्रपती
संभाजीनगर इथं वाळू उत्खनन गैरव्यवहार प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं
असून संबंधित कंपनीला ५६ कोटींहून अधिक दंड ठोठावला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
यांनी काल विधान परिषदेत ही माहिती दिली.
****
परभणी इथं
शिवाजी महाविद्यालयात काल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा २७ वा दीक्षांत
सोहळा पार पडला. विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. अशोक महाजन यांच्या उपस्थितीत यावेळी
चारशेहून अधिक विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
****
राज्य परिचारिका
संघटनेच्या विविध मागण्यांसाठी परभणी तसंच लातूरसह राज्यभरात धरणे आंदोलन करण्यात आलं.
संघटनेच्या मागण्यांची दखल न घेतल्यास आजपासून राज्यव्यापी बेमुदत संपाचा इशारा संघटनेनं
दिला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफीसह विविध मागण्यांसाठी लातूर जिल्ह्यात
उदगीर इथं बहुजन विकास अभियानाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं.
****
जालना जिल्ह्याच्या
घनसावंगी तालुक्यात बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे खरिपातल्या शेती पिकांचं
नुकसान झालं. अनेक ठिकाणचे नाले, नद्या दुथडी भरून वाहत असून काही पुलांचंही
नुकसान झालं आहे.
दरम्यान, मराठवाड्यासाठी
आज हवामान खात्यानं परभणी, बीड, हिंगोली,
नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट
जारी केला आहे. बहुतांश ठिकाणी जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची
शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी सध्या ७८ टक्क्यांपर्यंत पोहोचली
आहे.
****
No comments:
Post a Comment