Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 18 July 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ जूलै २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार
आणि पश्चिम बंगालच्या दौर्यावर आहेत. बिहारमधल्या मोतिहारी इथं सात हजार २०० कोटी रुपयांच्या
विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण
ते करणार आहेत. रेल्वे, रस्ते, ग्रामीण विकास, मत्स्य व्यवसाय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान
या क्षेत्रातल्या प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये दूर्गापूर
इथंही पाच हजार कोटीहून अधिक खर्चाच्या महत्वाच्या प्रकल्पाची पायाभरणी आणि लोकार्पण
पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
****
अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता
असलेल्या पृथ्वी दोन आनि अग्नि एक या लघू पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची भारताने यशस्वी चाचणी केली. ओडिशात चांदिपूर
इथल्या एकात्मिक तळावरुन ही चाचणी घेऊन देशाच्या संरक्षण दलांची सामरिक प्रतिकार क्षमता
दाखवून देण्यात आली. या दोन्ही क्षेपणास्त्रांचं कार्यचालन आणि तांत्रिक घटकांची पडताळणी
पूर्ण झाली असल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. पृथ्वी दोन या क्षेपणास्त्राचा
पल्ला साडेतीनशे किलोमीटर असून, ५०० किलो पर्यंत आण्विक शस्त्रास्त्रं वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे. तर अग्नि एक क्षेपणास्त्राचा
पल्ला ७०० ते ९०० किलोमीटर असून, ते एक हजार किलो भार
वाहण्यास सक्षम आहे.
****
आयएनएस विस्तार हे स्वदेशी डायव्हिंग
सहायक जहाज विशाखापट्टणम इथं भारतीय नौदलाच्या ताफ्यात आज दाखल होणार आहे. विस्तार
हे जहाज संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भर होण्याच्या दिशेनं भारताच्या प्रयत्नांमधलं एक
मोठं पाउल असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
भारतीय लष्कराच्या आकाश शस्त्र प्रणालीनं
काल लडाखच्या समुद्र सपाटीपासून खूप उंचीवर असलेल्या एका मानवरहित वेगवान लक्ष्याचा
भेद केला. भारतीय लष्कराच्या क्षमतेचा हा मैलाचा दगड ठरला आहे. प्राईम आकाश शस्त्र
प्रणाली या आधीच्या आकाश प्रणालीचं सुधारीत रुप आहे. या प्रणालीच्या सहाय्यानं समुद्र
सपाटीपासून ४ हजार ५०० मीटर उंचीवरचं लक्ष्य भेदण्यात आलं. डीआरडीओच्या पुढाकारानं
शस्त्रनिर्मितीतल्या सार्वजनिक कंपन्यांच्या सहाय्यानं ही प्रणाली विकसित करण्यात आली
आहे.
****
मुंबईतील राष्ट्रीय चित्रपट विकास
महामंडळाच्या आवारातील भारतीय चित्रपट संग्रहालयात, भारत पॅव्हेलियनचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते झालं. माहिती
आणि प्रसारण मंत्रालयाच्या पुढाकाराने सकारलेलं हे भारत पॅव्हेलियन; म्हणजे, देशाला जागतिक स्तरावर एक सर्जनशील
महासत्ता बनवण्याच्या दिशेनं टाकलेलं महत्त्वाचं पाऊल आहे.
****
पुणतांबा-साईनगर शिर्डी रेल्वे मार्गाच्या
दुहेरीकरणाला रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंजुरी दिली आहे. २४० कोटी रुपये
खर्चाच्या आणि साडे १६ किलोमीटर लांबीच्या या मार्गाचा फायदा केवळ भाविकांनाच नाही
तर नियमित प्रवासी, विद्यार्थी, व्यापारी आणि शेतकऱ्यांनाही होणार
आहे.
****
अहिल्यानगर जिल्ह्यातल्या पारनेर, नजर, नेवासा, श्रीगोंदा इथं सहा कोटी
९५ लाख रुपयांच्या ४५ विकासकामांना शासकीय मान्यता मिळल्याबाबतचा बनावट शासन आदेश काढल्याप्रकरणी
शासनाने वारंवार सूचना करूनही संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात हलगर्जीपणा
करणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करू, असं आश्वासन ग्रामविकास आणि पंचायती राज मंत्री जयकुमार
गोरे यांनी आज विधानसभेत दिलं. आमदार काशिनाथ दाते यांनी याबद्दलची लक्षवेधी सूचना
केली होती. अशाच प्रकारे बनावट शासन आदेश काढल्याचं आणखी एक प्रकरण समोर आलं असून त्याची
चौकशी करून गुन्हा दाखल केला असल्याचंही गोरे यांनी सांगितलं.
****
दहीहंडी पथकातल्या गोविंदांना शासनाकडून
मिळणाऱ्या विमाकवचात वाढ करावी या मागणीसाठी दहीहंडी समन्वय समितीने मुख्यमंत्री देवेन्द्र
फडणवीस यांची काल भेट घेतली. राज्य शासनाने ७५ हजार गोविंदांसाठी विमा कवच दिलं आहे, परंतू ही संख्या दीड लाखांपर्यंत वाढवावी अशी मागणी आशिष
शेलार यांच्या नेतृत्वाखालील या समितीनं मुख्यमंत्र्यांकडे केली. याबाबत क्रीडा विभागाला
मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले.
****
बीड जिल्हा माहिती कार्यालयाकडून
जिल्ह्यातल्या पत्रकारांसाठी येत्या रविवारी २० तारखेला एकदिवसीय कार्यशाळा आयोजित
करण्यात आली आहे. शहरातल्या डॉ. बाबासाहेब
आंबेडकर सामाजिक न्याय भवन इथल्या सभागृहात होणार्या या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी
विवेक जॉन्सन यांच्या हस्ते होणार आहे. परभणीच्या जिजाऊ ज्ञानतीर्थ महाविद्यालयातले
शिक्षक शिवशंकर पटवारी ‘कृत्रिम बुद्धीमत्ता आणि पत्रकारिता’ या विषयावर तर छत्रपती
संभाजी नगर इथले माध्यम तज्ज्ञ डॉ. प्रभू गोरे ‘समाज माध्यमांसाठी लेखन कौशल्ये’ या
विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
****
फ्रीस्टाईल ग्रँड स्लॅम बुद्धिबळ
स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद याने प्रथम मानांकित मॅग्नस कार्लसनविरुद्ध
सामना जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
****
No comments:
Post a Comment