Saturday, 19 July 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 19 जूलै २०२५ रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 19 July 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १९ जूलै २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी तंत्रज्ञानाचा पाया भक्कम करायचं काम वेगाने सुरू-माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन

·      संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून-उद्या सर्वपक्षीय बैठक

·      नागपूर रेल्वे स्थानकाचा शंभरावा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा

·      धाराशिव जिल्ह्यात १५ लाख वृक्ष लागवडीच्या मोहिमेला प्रारंभ

आणि

·      हिंगोलीच्या सखी वन स्टॉप सेंटरच्या कामकाजाबाबत महिला आयोगाकडून समाधान व्यक्त

****

विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी तंत्रज्ञानाचा पाया भक्कम करायचं काम वेगाने सुरू आहे, असं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज केलं. हैदराबादच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या पदवीदान सोहळ्यात ते बोलत होते. देशाच्या तंत्रज्ञानाधारित भविष्याकडे लक्ष वेधून त्यांनी विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचं तंत्रज्ञान आणि उत्पादनं तयार करण्याचं आवाहन केलं.

****

सायबर सुरक्षा म्हणजे केवळ राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न नाही, तर आपल्या युवकांना डिजिटल सुरक्षित भारताचे रक्षक बनवण्याचा मार्ग असल्याचं, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे. मुंबईत कांदिवली इथल्या स्किल अॅण्ड करिअर सेंटरमध्ये डी एस सी आय अॅडव्हान्स्ड सायबर स्किल सेंटरचं उद्घाटन आज गोयल यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. हे केंद्र पीएम कौशल विकास योजना अंतर्गत नॅस्कॉमच्या डी एस सी आय आणि किंद्रिल फाउंडेशनच्या सहकार्यानं उभारण्यात आलं असून, या केंद्रात दरवर्षी सुमारे एक हजार युवकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे

****

जातीनिहाय जनगणनेचे महत्व तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी तीव्र लढा उभारू, असं अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ यांनी म्हटलं आहे. जळगाव इथं अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या बैठकीत ते बोलत होते. या जनगणनेमुळं ओबीसीच्या आरक्षणासंदर्भातले अनेक प्रश्न आणि असंख्य मुद्यांचे निराकरण यातून होणार असल्याचंही भूजबळ यांनी सांगितलं.

****

संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होत आहे. ते येत्या २१ ऑगस्टपर्यंत चालेल. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं उद्या दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. अधिवेशनात दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत व्हावं याकरता सरकार या बैठकीत सर्व पक्षांना सहकार्याचं आवाहन करेल. या पावसाळी अधिवेशनात अनेक महत्त्वपूर्ण विधेयकांवर चर्चा होईल.

****

सिक्कीम मधल्या नाथुला मार्ग इथून कैलास मानसरोवर यात्रा सुरळीतपणे सुरु आहे. आज नाथुला इथून भाविकांचा सहावा जत्था रवाना झाला. आतापर्यंत भाविकांच्या चार जथ्यांनी आपली कैलास मानसरोवर यात्रा यशस्वीपणे पूर्ण केली आहे, तर पाचवा जत्था यात्रा पूर्ण करुन गंगटोककडे रवाना झाला आहे. भाविकांचे आणखीन चार जत्थे कैलास मानसरोवरसाठी मार्गस्थ होणार आहेत.

****

नागपूर रेल्वे स्थानकाचा शंभरावा स्थापना दिवस आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या निमित्तानं नागपूर रेल्वे स्थानकाच्या परिसरात एक विशेष वारसा प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. त्यात भारतीय रेल्वेचा आजपर्यंतचा इतिहास दाखवण्यात आला आहे. या प्रदर्शनात जड आणि डिझेल इंजिनचं मॉडेल, जुनी रेल्वे उपकरणं, नॅरोगेज काळातील वस्तू, जुनं स्टेशन आणि स्थानकाचं परिवर्तन दर्शवणारे विविध घटक ठेवण्यात आले आहे. सामान्य नागरिक मोठ्या संख्येनं प्रदर्शनाला भेट देत या समृद्ध वारशाचा आनंद घेत आहेत.

****

एक पेड मां के नाम, हरित महाराष्ट्र हरित धाराशिव या मोहिमेअंतर्गत धाराशिव जिल्ह्यात आज १५ लाख वृक्ष लागवडीची मोहिम हाती घेण्यात आली. या मोहिमेत राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार कैलास पाटील, सिने अभिनेते स्वप्नील जोशी सहभागी झाले होते. पालकमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या मोहिमेचं उद्घाटन करण्यात आलं. तसंच वृक्षदिंडी काढण्यात आली. जिल्ह्यातील २४३ ग्रामपंचायती तसंच नगरपरिषदा आणि नगरपंचायत क्षेत्रामध्ये वीस ते पंचवीस प्रजातींची स्थानिक देशी झाडं लावली गेली आहेत. तुळजापूर तालुक्यातील चिकुंद्रा या गावात उमेद अर्थात महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या महिला बचत गटाच्या सदस्यांनी पुढाकार घेऊन, तीन हजार झाडं लावली. या झाडांचं संगोपन करून ती मोठी करण्याचा निर्धार गावकऱ्यांनी व्यक्त केला.

****

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी आज हिंगोली इथल्या सखी वन स्टॉप सेंटरला भेट दिली. या ठिकाणी सुरू असलेल्या कामकाजाची माहिती घेऊन त्यांनी समाधान व्यक्त केलं. पीडित महिलांना तातडीने मदत मिळण्याच्या उद्देशानं ही योजना राबवली जाते. त्यामुळे पीडित महिलांनी, विद्यार्थिनीनी या मदत केंद्राची मदत घेऊन आपले प्रश्न सोडावावेत, असं आवाहन यावेळी रूपाली चाकणकर यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

****

परभणी जिल्हा निवडणूक विभाग आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली ए आय तंत्रज्ञान कार्यशाळा घेण्यात आली. पत्रकार पारदर्शकता, जबाबदारी आणि समाजप्रबोधनाची भूमिका पार पाडत असतात. त्यांच्या लेखणीद्वारेच प्रशासन आणि सामान्य नागरिक यांच्यात संवाद घडतो, असं जिल्हाधिकारी गावडे यांनी याप्रसंगी बोलताना नमूद केलं. यावेळी जिल्हा सूचना अधिकारी देवेंद्रसिंह यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचं तंत्र आणि पत्रकारीता या विषयी मार्गदर्शन केलं. विविध माध्यमांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

****

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या पुढाकारातून लातूर जिल्ह्यात अहमदपूर आणि चाकूर तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींच्या इमारतीसाठी शासनाने ७५ लाख रुपये निधी मंजूर केला आहे. अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव तसंच चाकूर तालुक्यातील चापोली आणि घरणी या ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतींचं बांधकाम यातून केलं जाईल, हे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

****

छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रात विकासाचे नियोजन करण्यासाठी सीमांकन करण्यात येत आहे. नागरिकांनी परवानगी घेऊनच बांधकामं करावीत तसंच संबंधित यंत्रणांना सीमांकनासाठी सहकार्य करावं, असं आवाहन प्राधिकरणाकडून करण्यात आलं आहे.

****

पंढरपूर इथं चंद्रभागा नदीत बुडून दोन महिला भाविकांचा मृत्यू झाला. मृत महिला जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातल्या धावडा इथल्या रहिवासी असून संगीता संजय सपकाळ आणि सुनिता माधव सपकाळ अशी त्यांची नावं आहेत. आज पहाटे पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

****

ऑपरेशन सिंदूर आणि आत्मनिर्भर भारत याविषयी वरिष्ठ वैज्ञानिक काशिनाथ देवधर यांनी बीड मधील स्वातंत्र्यवीर सावरकर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांशी आज संवाद साधला. भारत सरकारच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत विविध शस्त्रास्त्रांच्या निर्मितीमध्ये देशासाठी देवधर यांचं मोठं योगदान आहे. यावेळी देवधर यांनी विद्यार्थ्यांना भारतीय सैन्यासाठी तयार करण्यात आलेल्या अनेक क्षेपणास्त्रांची पीपीटी द्वारे ओळख करून दिली.

****

भारतीय ग्रँडमास्टर्स कोनेरू हम्पी, डी. हरिका आणि आर. वैशाली आणि आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुख यांनी फिडे जागतिक बुद्धीबळ महिला कप स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. या स्पर्धेत अंतिम आठ टप्प्यात चार खेळाडू असलेला भारत हा पहिलाच देश बनला आहे.

****

हंगेरीच्या बुडापेस्ट इथं झालेल्या पोलाक इमरे आणि वर्गा जानोस मेमोरियल कुस्ती स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीगीरांनी दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकलं. अंतिम पंघलने ५३ किलो गटाच्या अंतिम फेरीत रशियाच्या नतालिया मालिशेवाचा सात विरुद्ध चार असा पराभव करून सुवर्णपदक जिंकलं. हर्षितानं ७२ किलो गटात भारतासाठी दिवसातील दुसरे सुवर्णपदक जिंकलं. दरम्यान, ५७ किलो गटाच्या अंतिम फेरीत नेहा सांगवानला रौप्य तर ५० किलो वजन गटात, नीलमनं कांस्यपदक मिळवलं.

****

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या भारत आणि इंग्लंड दरम्यान महिला क्रिकेटमध्ये दुसरा एकदिवसीय सामना पावसामुळे अद्याप सुरू झालेला नाही. हा सामना लंडन इथं खेळवला जाणार आहे.

****

हवामान

येत्या चोवीस तासात कोकण आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडेल तर राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 29.12.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 29 December 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी...