Saturday, 19 July 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 19.07.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 19 July 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ जुलै २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      देशातल्या पहिल्या सर्जनशीलता तंत्रज्ञान संस्थेच्या कॅम्पसचं मुंबईत केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते उद्घाटन

·      विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा समारोप-आठ डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन

·      विधीमंडळातल्या सर्व आमदारांनी संसदीय परंपरांचं पालन करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन

·      अधिवेशनात जनतेच्या अपेक्षांना न्याय नाही-माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची टीका

·      राज्यात ३४ जिल्ह्यांत ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्यांना नवीन इमारती देण्याचा निर्णय

आणि

·      आरोग्य सेवा मानकांच्या उल्लंघनप्रकरणी राज्यातल्या २५८ खासगी रुग्णालयांचे परवाने रद्द

****

देशातली पहिली भारतीय सर्जनशीलता तंत्रज्ञान संस्था - आयआयसीटी आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ - एन एफ डी सी यांच्या संयुक्त कॅम्पसचं काल मुंबईत केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते उद्घाटन झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या अभ्यासक्रमासंदर्भात आयआयसीटीने इंग्लंडच्या यॉर्क विद्यापीठाशी करार केला असून, गेमिंग, अ‍ॅनिमेशन, आदी १७ विषय शिकवले जाणार आहेत.

दरम्यान, वेव्हज उपक्रमाचा कार्य अहवालही या कार्यक्रमात प्रकाशित करण्यात आला.

****

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा काल समारोप झाला. अधिवेशन काळात विधानसभेत १४ विधेयकं पुनर्स्थापित, तर १५ विधेयकं संमत झाली. विधानपरिषदेने १२ विधेयकं मंजूर केली तर तीन धन विधेयकं शिफारशीशिवाय विधानसभेकडे परत पाठवली. दरम्यान, विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या आठ डिसेंबरपासून नागपूर इथं होणार असल्याचं परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सांगितलं.

त्यापूर्वी विधान परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर दिलं. विधीमंडळातल्या सर्व आमदारांनी संसदीय परंपरांचं पालन करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. ते म्हणाले...

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कथित हनिट्रॅप संदर्भाने बोलतांना मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही आजी माजी मंत्र्यांविरोधात असा आरोप नसल्याचा खुलासा केला. बीड जिल्ह्यातल्या महादेव मुंडे हत्या प्रकरणी कोणालाही पाठिशी घातलं जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

मुंबईला महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकत नाही, असं सांगत सर्वसमावेशक मुंबईसह प्रगतीशील महाराष्ट्र घडवण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. ते म्हणाले...

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

दरम्यान, अधिवेशनानंतर पत्रकार परिषदेत बोलतांना मुख्यमंत्र्यांनी, अधिवेशनाच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केलं. या कालावधीत घडलेल्या काही गोष्टी नक्कीच खेदजनक होत्या, त्या पुन्हा होऊ नयेत याची काळजी घ्यायला हवी, असं मुख्यमंत्री म्हणाले.

****

विधिमंडळ परिसरात हाणामारी प्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल सदनाला ही माहिती दिली. अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी नीतीमूल्य समिती स्थापन करण्याची घोषणा नार्वेकर यांनी केली. यापुढे अधिवेशन काळात विधिमंडळात सदस्य, त्यांचे स्वीय सहायक आणि अधिकाऱ्यांनाच प्रवेश दिला जाईल, असं नार्वेकर यांनी स्पष्ट केलं.

****

या अधिवेशनात जनतेच्या अपेक्षांना न्याय मिळाला नाही, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. जनसुरक्षा कायद्यात कारवाईसंदर्भात स्पष्टता नसल्याचं सांगत, या कायद्याला विरोधामागची भूमिका, ठाकरे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले...

बाईट - माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

दरम्यान, विधीमंडळाने संमत केलेल्या जनसुरक्षा विधेयकाला मान्यता न देता पुनर्विचारासाठी शासनाकडे परत पाठवण्याची मागणी महाविकास आघाडीने केली आहे. याबाबतचं निवेदन काल राज्यपालांना सादर करण्यात आलं. या कायद्याच्या विरोधात काल काँग्रेसच्या वतीने छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली.

****

राज्यातल्या सहा हजार ७५ शाळा आणि नऊ हजार ६३१ तुकड्यांवरच्या ४९ हजार ५६२ शिक्षकांना वेतन अनुदानाचा पुढचा टप्पा देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत निवेदनाच्या माध्यमातून ही माहिती दिली.

****

दिव्यांग बांधवांना शासनातर्फे विविध योजनांद्वारे दिलं जाणारं अनुदान दरमहा पंधराशे रुपयांवरून अडीच हजार रूपये करण्यात आलं आहे, दिव्यांग कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी काल विधीमंडळाच्या दोन्ही सदनांत ही माहिती दिली.

****

संसदेचं पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. ते येत्या २१ ऑगस्टपर्यंत चालेल. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने उद्या दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.

****

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गड-किल्ल्यांना युनेस्कोकडून जागतिक वारसा दर्जा मिळणं हा मराठा इतिहासाचा जागतिक गौरव असल्याचं, केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी म्हटलं आहे. काल मुंबईत या निमित्तानं झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कॉफी टेबल पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं.

****

राज्यात ३४ जिल्ह्यांत ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्याला नवीन इमारती देण्याचा निर्णय पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतला आहे. यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी तसंच बीड जिल्ह्यात एकूण ५१, तर लातूर, नांदेड, धाराशिव आणि हिंगोली जिल्ह्यात ३९ नवीन इमारतींचा समावेश आहे.

****

आरोग्य सेवा मानकांचं उल्लंघन केल्याप्रकरणी राज्यातल्या २५८ खासगी रुग्णालयांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी ही माहिती दिली. यासंदर्भात पाच हजार १३४ रुग्णालयांना नोटीस बजावण्यात आली असल्याचं, आबिटकर यांनी सांगितलं.

****

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा समावेश केला जाणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याबाबत आश्वासन दिल्याचं, शालेय शिक्षण मंत्री पंकज भोयर यांनी काल विधानपरिषदेत सांगितलं.

****

मराठवाड्यात कापूस प्रक्रिया उद्योगासाठी सवलती तसंच सोप्या कर्ज योजना राबवण्याची मागणी आमदार डॉ. राहुल पाटील यांनी विधानसभेत केली. तर परभणी जिल्ह्यातल्या सेलू, पाथरी, सोनपेठ या शहरांना जोडणाऱ्या महामार्गाचे काम दोन वर्षात पूर्ण होईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी काल विधानसभेत दिली. सदस्य राजेश विटेकर यांनी याबाबतचा प्रश्न विचारला होता.

****

एसटी महामंडळाच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान स्पर्धेच्या, पहिल्या सर्वेक्षणात लातूर विभागातील चार बसस्थानकांनी उल्लेखनीय यश मिळवलं आहे. यात औसा, मुरुड, लातूर बसस्थानक क्रमांक २ आणि लामजना या बसस्थानकांचा समावेश आहे.

****

धाराशिव इथं आज आणि उद्या ग्राहक पंचायतीचं राज्य अधिवेशन होणार आहे. ग्राहक पंचायतचे  अध्यक्ष डॉ विजय लाड यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सोलापूर - धुळे महामार्गावरील श्री गणेश मंगल कार्यालयात होणाऱ्या या अधिवेशनाला उपस्थित राहण्याचं आवाहन लाड यांनी केलं आहे.

****

हिंगोली जिल्हा प्रशासनाच्या सेवादूत या प्रणालीचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते काल शुभारंभ करण्यात आला. या प्रणालीद्वारे शासनाच्या विविध सेवा घरपोच उपलब्ध होणार आहेत. अशी सेवा देणारा हिंगोली जिल्हा हा मराठवाड्यातील पहिला जिल्हा ठरणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात फुलंब्रीजवळ दुचाकी आणि ट्रकच्या अपघातात एक इसम आणि त्याच्या दोन मुलांचा मृत्यू झाला, तर मुलांची आई गंभीर जखमी झाली. काल दुपारी ही दुर्घटना घडली.

****

क्रिकेट

इंग्लंड आणि भारत महिला संघातला दुसरा एक दिवसीय क्रिकेट सामना आज खेळवला जाणार आहे. मालिकेत पहिला सामना जिंकून भारत एक शून्यने आघाडीवर आहे.

****

हवामान

मराठवाड्याच्या काही भागात आज जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 30 دسمبر 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 30 December-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خ...