Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 20 July 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० जूलै २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
संसदेच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या
पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.
२१ ऑगस्टपर्यंत अधिवेशन सुरू असणार आहे. अनेक महत्त्वाची विधेयकं अधिवेशनात चर्चेसाठी
येणार आहेत.
****
अवैध ऑनलाइन व्यवहार प्रकरणी चौकशीसाठी सक्तवसुली संचालनालय - ई.डी.नं इंटरनेटसंबंधित
आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील गुगल आणि मेटा या आंतरराष्ट्रीय कंपन्यांना नोटीस
बजावली आहे. या दोन्ही कंपन्यांना उद्याच्या तारखेचं चौकशीचं समन्स बजावण्यात आलं आहे.
ईडी सट्टेबाजीशी संबंधित भ्रमणध्वनी अॅप्समधून कथितपणे झालेल्या आर्थिक गैरव्यवहारांचा
तपास करत आहे.
****
"भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज
पुरस्कार", राज्याचे उपमुख्यमंत्री
- शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांना जाहीर झाला आहे. श्रीनामदेव महाराज यांच्या
परवा मंगळवारी असलेल्या ६७५ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त, पंढरपूरच्या संत श्री नामदेव महाराज
फड संस्थान आणि संत वंशज यांच्यातर्फे २४ जुलै रोजी आयोजित हा पुरस्कार प्रदान सोहळा
पंढरपूर इथं होणार आहे. राज्यात संतशक्तीसह शासनसत्तेचा समन्वय साधत, वारकरी संप्रदाय सक्षमीकरण, कीर्तनकार गौरव, दिंड्यांना शासनमान्यता, आणि वारी प्रबोधन सेवा रथ यांसारख्या
विविध उपक्रमांद्वारे शिंदे यांनी समाजसेवा आणि अध्यात्माची पताका उंचावली आहे. संत
नामदेव महाराज जसे पंजाब, महाराष्ट्र, आणि उत्तर भारतात आपली संत परंपरा
पोहचवणारे झाले. या प्रेरणेतूनच एकनाथ शिंदे यांनी आजच्या युगात ‘संत विचारांचा शासनसत्तेतून
जागर’ घडवल्यानं या कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार देण्यात येत असल्याचं सोहळ्याचे
प्रमुख श्री निवृत्तीमहाराज नामदास यांनी सांगितलं.
****
इंडिया चॅम्पियन्स आणि पाकिस्तान
चॅम्पियन्स यांच्यातील वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स क्रिकेट सामना रद्द करण्यात
आला आहे. सीमापार दहशतवादामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर
हा सामना रद्द करण्यात आला आहे. एका निवेदनात, वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्सने चाहत्यांच्या भावना दुखावल्याबद्दल
आणि भारतीय क्रिकेट लीजेंड्सना झालेल्या गैरसोयीबद्दल माफी मागितली आहे. सुरेश रैना, शिखर धवन आणि इतर भारतीय खेळाडूंनीही
पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळण्यास नकार दिला आहे. भारत आणि पाकिस्तानमधील हा सामना
आज एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे होणार
होता.
****
भारत-इंग्लंड महिला एकदिवसीय क्रिकेटच्या, काल लंडन इथल्या सामन्यात इंग्लंडनं
आठ गडी राखून विजय मिळवला. पावसामुळं सामना प्रत्येकी २९ षटकांचा करण्यात आला होता.
नाणेफेक जिंकत इग्लंडनं गोलंदाजी निवडली. भारतानं आठ बाद १४३ धावा केल्या. प्रत्युत्तरात
इग्लंडच्या फलंदाजी दरम्यानही पावसाच्या व्यत्त्ययानं २४ षटकांत ११५ धावांचं लक्ष निर्धारीत
झालं. आणि इंग्लंडनं दोन बाद ११६ धावा करुन ते पार केलं. तीन सामन्यांच्या या मालिकेत
दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला असून परवा २२ जुलै रोजी तिसरा - अंतिम सामना
चेस्टर ले स्ट्रीट इथं होणार आहे.
****
छत्रपती संभाजीगर जिल्ह्याच्या पैठणनजिक
जायकवाडी धरणात आज सकाळी प्राप्त आकडेवारीनुसार आता ७७ पुर्णांक ७६ शतांश टक्के इतकी
पाणी पातळी झाली आहे.धरणाच्या डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही कालव्यातून एक हजारक्युसेकहून जास्त पाण्याचा विसर्ग सुरु आहे. मागिल चोवीस तासांत धरणात चार हजार १९२ घनफुट
प्रति सेकंद पाण्याची आवक झाली.
****
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि वीजांसह
पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवा
आध्यात्मिक शिखर परिषदेचे महत्त्व अधोरेखित करणारा एक लेख प्रसिद्ध केला आहे आणि त्याला
नशामुक्त भारताच्या दिशेने एक मोठे पाऊल म्हटले आहे. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा
मंत्री मनसुख मांडविया यांच्या समाजमाध्यमातील संदेशाला उत्तर देताना मोदी म्हणाले
की, डॉ. मांडविया यांनी युवा आध्यात्मिक
शिखर परिषद ही ड्रग्जमुक्त भारताच्या निर्मितीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे हे
सविस्तरपणे स्पष्ट केले आहे. "विकसित भारतासाठी ड्रग्जमुक्त युवक" या संकल्पनेवर
माय-भारत उपक्रमांतर्गत काशीच्या पवित्र घाटांवर 'युवा आध्यात्मिक शिखर परिषद' आयोजित केली जात आहे. दोन दिवसीय
ही शिखर परिषद कालपासून सुरू झाली आणि मोदी सरकारच्या नशा मुक्त भारत अभियानाचा एक
भाग आहे.
****
एक पेड मां के नाम, हरित महाराष्ट्र हरित धाराशिव या
मोहिमेअंतर्गत काल दिवसभरात विक्रमी १५ लाख वृक्षांची लागवड करून, धाराशिव जिल्ह्याची इंडिया वर्ल्ड
ऑफ रेकॉर्ड तसंच आशिया बुक ऑफ रेकॉर्ड या दोन्हीमध्ये नोंद झाली आहे. हे वृक्ष जगवण्यासाठी
प्रशासनाबरोबर सर्वांनी प्रयत्न करावेत, असं आवाहन परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप
सरनाईक यांनी केलं. या दोन्ही संस्थांची प्रमाणपत्र आणि पदकं देऊन पालकमंत्री सरनाईक
यांनी, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार तसंच
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
डॉ. मैनाक घोष यांना सन्मानित केलं.
****
No comments:
Post a Comment