Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 10 September 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १० सप्टेंबर २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी.पी.
राधाकृष्णन यांनी दुसऱ्या सर्वोच्च संवैधानिक पदावरील त्यांची निवड, राष्ट्रवादी विचारसरणीचा विजय असल्याचं
म्हटलं आहे. २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी काम करण्यास कटीबद्ध असल्याचं, त्यांनी विजयानंतर दिलेल्या भाषणात
नमूद केलं. लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष दोन्ही महत्त्वाचे आहेत, लोकशाहीचं हित लक्षात ठेवलं पाहिजे, असं राधाकृष्णन म्हणाले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी
उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल राधाकृष्णन यांचं अभिनंदन केलं आहे. राधाकृष्णन यांचा
सार्वजनिक जीवनातला अनुभव, देशाच्या प्रगतीत, संवैधानिक मूल्यांना बळकटी देण्यासाठी
आणि संसदीय संवाद वाढवण्यात महत्त्वपूर्ण योगदान देईल, असं त्यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन केलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळमधल्या
घडामोडींवर चर्चा करण्यासाठी मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची काल बैठक घेतली. नेपाळमधली
हिंसा ही ह्रदयद्रावक आहे, असं सांगून पंतप्रधानांनी, नेपाळमधल्या तरुणांच्या जिवीत हानीबद्दल
दु:ख व्यक्त केलं तसंच नेपाळच्या स्थिरता, शांती आणि समृद्धीचं महत्व समाजमाध्यमावरच्या
संदेशातून अधोरेखित केलं.
दरम्यान, नेपाळमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र राज्य आपत्कालीन कार्य
केंद्रामार्फत महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या नेपाळमध्ये प्रवास टाळावा, जे नागरीक नेपाळमध्ये आहेत त्यांनी
आपल्या निवासस्थानीच सुरक्षित रहावं, स्थानिक प्रशासनाच्या
तसंच दूतावासाच्या सूचनांचं पालन करावं, असं आवाहन या केंद्रामार्फत करण्यात आलं आहे.
दरम्यान, एअर इंडिया आणि इंडिगोसह इतर अनेक
विमान कंपन्यांमध्ये नेपाळसाठीची प्रवास उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत.
****
सर्वोच्च न्यायालयाने देशातल्या सर्व
उच्च न्यायालयांना कार्यकारी आदेशांच्या घोषणेनंतर विलंब न करता तर्कसंगत निकाल त्वरीत
अपलोड करण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने १८
फेब्रुवारी २०१६ चा निर्णय २ वर्ष पाच महिन्यांनी म्हणजेच १८ जुलै २०१८ मध्ये अपलोड
केला होता. त्यामुळे या विलंबाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे.बी.पारडीवाला
आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने गंभीर असल्याचं म्हटलं आहे. गेल्या
काही वर्षांपासून काही उच्च न्यायालयांमध्ये तर्कशुद्ध निर्णयाशिवाय आदेशाचा कार्यकारी
भाग घोषित करण्याची पद्धत राहिली आहे आणि त्यानंतर खूप कालावधीनंतर तर्कशुद्ध निर्णय
अपलोड केला जातो. त्यामुळे न्यायालयाने अनिल राय विरूद्ध बिहार या खटल्याचा हवाला देत
या विलंबामुळे याचिकाकर्त्याच्या मनात न्यायालयाच्या
विश्वासार्ह्यतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचं सांगितलं.
****
केंद्र शासनाच्या माध्यमातून नाशिक
तालुक्यातल्या शिलापूर इथं उभारण्यात आलेल्या केंद्रीय विद्युत अनुसंधान संस्थानच्या
परीक्षण प्रयोगशाळा म्हणजेच सी पी आर आय चं उद्घाटन आज केंद्रीय उर्जा मंत्री मनोहरलाल
खट्टर यांच्या हस्ते, तर मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्या उपस्थिती होणार आहे. शंभर एकर क्षेत्रात साकारलेली ही प्रयोगशाळा महाराष्ट्रच नव्हे तर गुजरात आणि राजस्थान या तीन राज्यातल्या उद्योजकांना उपयुक्त ठरणार असल्याची
माहिती कार्यक्रमाचे आयोजक आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी
दिली.
****
'मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते' योजनेसाठी सीएसआर फंडातून निधी उपलब्ध
करण्यात यावा तसंच यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष तयार करण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री
चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते. १७ सप्टेंबर
ते २ ऑक्टोंबर या कालावधीत या योजनेच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने कार्यकाही होणं आवश्यक
असल्याचं त्यांनी सांगितलं. सर्व आमदारांनी याबाबत अतिदक्ष राहून सर्व पाणंद रस्ते
नकाशावर आणावेत, हा नकाशा पुढील महिनाभरात
गावामध्ये प्रसिद्ध करण्यात यावा, विविध १३ योजनांच्या
माध्यमातून सध्या या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात यावा अशी सूचनाही बावनकुळे यांनी केल्या.
****
केंद्र सरकारच्या पर्यावरण, वने आणि वातावरणीय बदल मंत्रालयाच्या
वतीने घेण्यात आलेल्या ‘स्वच्छ हवा’ स्पर्धेत नाशिकने देशात १६वं स्थान पटकावलं असून, महाराष्ट्रात चौथा क्रमांक मिळवला
आहे. यंदा महापालिकेने शहरभर स्वच्छता मोहीम राबवत जनजागृती केली होती.
****
अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी
५० हजार रुपये मदत देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे करण्यात
आली आहे. या मागणीचं निवेदन पक्षाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील यांच्या नेतृत्वात
छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना काल सादर करण्यात आलं.
****
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा
पहिला सामना दुबईत यजमान युएईच्या संघाशी होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी आठ
वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारताचा पुढचा सामना येत्या १४ तारखेला पाकिस्तान बरोबर
होणार आहे.
****
No comments:
Post a Comment