Sunday, 2 November 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.11.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 02 November 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०२ नोव्हेंबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      इस्त्रोच्या सर्वाधिक वजनाच्या दूरसंवाद उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेप

·      कार्तिकी एकादशी भक्तीभावात साजरी

·      नाशिक आणि अमरावती जिल्ह्यांसाठी प्रत्येकी एक ‘सी-ट्रिपल आयटी’ केंद्र मंजूर

आणि

·      ऑस्ट्रेलियाविरुद्धचा टीट्वेंटी सामना जिंकून भारताची मालिकेत बरोबरी

****

इस्रो, अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं आज सीएमएस-03 हा देशाचा सर्वाधिक वजन असलेला दूरसंवाद उपग्रह प्रक्षेपित केला. या उपग्रहाचं वजन चार हजार ४१० किलो आहे. आंध्र प्रदेशात श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून संध्याकाळी ५ वाजून २६ मिनिटांनी या उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात आलं. सीएमएस-03 हा लष्कराचा मल्टी-बँड दूरसंवाद उपग्रह असून, त्याला जीसॅट-7 आर असंही म्हणतात. एलव्हीएम-3 या देशातल्या सर्वात शक्तिशाली उपग्रह प्रक्षेपकाच्या साहाय्यानं तो अवकाशात सोडण्यात आला. या प्रक्षेपकानं चांद्रयान-३ सारख्या मोहिमा यशस्वीपणे पार पडल्या आहेत. सीएमएस-03 हा मल्टी-बँड दूरसंवाद उपग्रह भारतीय भूभागासह लगतच्या महासागराच्या विस्तृत क्षेत्रात सेवा देईल, असं इस्रोनं म्हटलं आहे. सीएमएस-03 उपग्रह भारतीय नौदलाच्या संपर्क यंत्रणेत लक्षणीय सुधारणा घडवेल. तसंच तो उच्च-क्षमतेची बँडविड्थ देखील प्रदान करेल, त्यामुळं दुर्गम भागांशी डिजिटल माध्यमातून संपर्क साधता येईल. सामाजिक संस्थांसाठी आणि धोरणात्मक आखणीसाठी तो उपयोगी ठरेल असं इस्रोनं म्हटलं आहे.

****

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्ली मध्ये उदयोन्मुख विज्ञान आणि तंत्रज्ञान नवोन्मेष परिषद २०२५ चं उद्घाटन करतील. या कार्यक्रमात ते देशातल्या संशोधन आणि विकास परिसंस्थेला चालना देण्यासाठी १ लाख कोटी रुपये अर्थसहाय्य देणाऱ्या संशोधन, विकास आणि नवोन्मेष योजना निधीचा प्रारंभ करतील. शिक्षण तज्ञ, संशोधन संस्था, उद्योग आणि सरकार मधल्या तीन हजारापेक्षा जास्त सहभागींना एकत्र आणणं हे या तीन दिवसीय परिषदेचं उद्दिष्ट आहे. यामध्ये भाषणं, पॅनेल चर्चा, सादरीकरणं आणि तंत्रज्ञान विषयक प्रदर्शनं आयोजित केली जातील. देशाची विज्ञान आणि तंत्रज्ञान परिसंस्था मजबूत करण्यासाठी संशोधक, उद्योग आणि तरुण नवोन्मेषकांमधल्या सहकार्यासाठी हे योग्य व्यासपीठ ठरेल.

****

कार्तिकी एकादशीनिमित्त आज पहाटे पंढरपूर इथं विठ्ठल-रुख्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी मानाचे वारकरी म्हणून नांदेड जिल्ह्यातले रामराव आणि सुशिलाबाई वालेगावकर या दांपत्याला विठ्ठलाची महापूजा करण्याचा मान मिळाला. विशेष म्हणजे यंदा जिल्हा परिषद शाळेतल्या दोन विद्यार्थ्यांनाही पूजा करण्याचा मान देण्यात आला. शालेय विद्यार्थीनी मानसी आनंद माळी आणि विद्यार्थी आर्य समाधान थोरात यांची विद्यार्थी मानकरी म्हणून निवड करण्यात आली. एकादशीनिमित्त राज्यभरातल्या विठ्ठल मंदीरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर नजीक वाळूज महानगरातल्या पंढरपूरच्या विठ्ठल - रुख्मिणी मंदिरात आज पहाटे आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. यात्रेमुळे पंढरपूर गजबजलं असून, मंदिराजवळ अनेक दुकानं थाटण्यात आली आहेत. पैठण इथं आज कादशीच्या निमित्तानं भक्तांनी सकाळपासून पवित्र स्नान करण्यासाठी तसंच संत एकनाथ महाराज यांच्या पादूका दर्शनासाठी दिवसभर गर्दी केली होती. रत्नागिरीतील पुरातन विठ्ठल मंदिरात सकाळी महापूजा झाल्यानंतर उत्सव सुरू असून नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.

****

महान ऋषी पतंजली यांनी योगासनांद्वारे मनातील, व्याकरणाद्वारे वाणीतील आणि आयुर्वेदाद्वारे शरीरातील अशुद्धी दूर केल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या आज हरिद्वार, उत्तराखंड इथं पतंजली विद्यापीठाच्या दुसऱ्या पदवीदान समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. पतंजली विद्यापीठ समाजापर्यंत महर्षि पतंजलि यांच्या महान परंपरेचा प्रसार करत असल्याबद्दल आनंद व्यक्त करत, निरोगी भारत घडवण्यासाठी याचा उपयोग होत असल्याचं त्या म्हणाल्या.

****

उद्योग आणि कौशल्य विकास क्षेत्रात महाराष्ट्राला आघाडीवर न्यायच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून नाशिक आणि अमरावती या दोन जिल्ह्यांसाठी प्रत्येकी एक ‘सी-ट्रिपल आयटी’ केंद्र शासनानं मंजूर केलं आहे. या अंतर्गत संशोधन, नवसंकल्पना आणि उद्योजकता वाढीला लावण्याकरता मार्गदर्शन आणि प्रशिक्षण केंद्र सुरु होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीला पत्र लिहून अशा प्रकारची केंद्र सुरु करण्याविषयी सुचवलं होतं, त्याला कंपनीनं मान्यता दिली आहे. या केंद्रांमुळे युवकांना ‘एआय’, अर्थात, कृत्रिम बुद्धिमत्ता तसंच ‘रोबोटिक्स’, ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’, ‘डेटा अनालिटिक्स, ‘इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञान’, ‘ऑटोमेशन’ या क्षेत्रांमधल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित जागतिक दर्जाचं प्रशिक्षण मिळणार असून युवकांकरता स्वयंरोजगार आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत.

****

मराठवाड्यातल्या अतीवृष्टीमुळं शेतीच्या झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे संपूर्ण मराठवा़ड्याचा संवाद दौरा करणार आहेत. येत्या पाच ते आठ तारखेदरम्यान हा दौरा होईल, असं पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं. राज्य सरकारनं दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मदत देण्याचं आश्वासन दिलं होतं. ते अद्याप पूर्ण झालं नसल्यानं शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी हा दौरा आहे. पाच तारखेला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पैठण इथून उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्याची सुरुवात होईल आणि समारोप आठ तारखेला जालना जिल्ह्यात होईल, अशी माहितीही दानवे यांनी दिली.

****

मोसमी पाऊस भारतीय उपखंडातून रवाना झाल्यानंतरही देशाच्या विविध भागात पाऊस होत आहे. अरबी समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता निवळला असल्याचं हवामान विभागाने सांगितलं. मात्र यंदाचा नोव्हेंबर महिना तुलनेने थंड असेल असा अंदाज आहे. राज्यात काल पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अनेक ठिकाणी पाऊस झाला. राजधानी मुंबईत आकाश ढगाळ आहे आणि अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी येत आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या काही भागांमध्ये काल रात्री पाऊस झाला. अहिल्यानगर जिल्ह्यात आज अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली.

****

गोंदिया जिल्यात दोन दिवसा आधी आलेल्या अवकाळीपावसामुळं कापनीला आलेल्या धान पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी आज गोंदिया जिल्यात येत शेतावर जाऊन धान पिकांची पाहणी करत कृषी विभागाला नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. लवकरात लवकर नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळवून देण्याचं आश्वासनही पालकमंत्र्यांनी यावेळी दिलं आहे. रत्नागिरीत जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मोठ्या पावसामुळं शेतीचं खूप नुकसान झालं आहे. जिल्ह्यातल्या ३२४ गावांमधल्या २४५२ शेतकऱ्यांना या पावसाचा मोठा फटका बसला असून, ४५२ हेक्टरहून अधिक क्षेत्रावरच्या शेतीचं नुकसान झालं आहे.

****

भारतानं महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदाच्या लढतीमध्ये आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मुंबईमध्ये दमदार सुरुवात मिळवली. संघानं सतरा षटकांत एक बाद १०४ धावा केल्या आहेत.

****

भारतानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध आज होबार्ट इथं झालेल्या तिसऱ्या टीट्वेंटी क्रिकेट सामन्यामध्ये पाच फलंदाज आणि नऊ चेंडू राखून विजय नोंदवत मालिकेत एक- एक अशी बरोबरी मिळवली. वॉशिंग्टन सुंदरनं २३ चेंडुंमध्ये तीन चौकार आणि चार षटकारांसह नाबाद ४९ धावा केल्या. ऑस्ट्रेलियानं फलंदाजी लादण्यात आल्यानंतर २० षटकांत सहा बाद १८६ धावा केल्या होत्या. यात टीम डेव्हीडनं आठ चौकार आणि पाच षटकारांसह ७४ धावा केल्या तर मार्कस स्टॉईनीस यानं ३९ चेंडुंमध्ये आठ चौकार दोन षटकारांसह ६४ धावा केल्या. अर्षदीपसिंगनं तीन तर वरुण चक्रवर्तीनं दोन खेळाडू बाद केले. अर्शदीप सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. पाच सामन्यांच्या या मालिकेतला चौथा सामना येत्या गुरुवारी होणार आहे.

****

बीड इथं सुरू १७ वर्षाखालील मुलं आणि मुलींच्या राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेचा आज समारोप होत आहे. स्पर्धेत राज्याच्या आठ विभागातून आठ मुलं आणि आठ मुलींचे संघ सहभागी झाले आहेत. या स्पर्धेतून राज्याचा मुलं तसंच मुलींचा संघ निवडण्यात येणार आहे. हे निवडलेले संघ उत्तरप्रदेशात बरेली इथं ११ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत राज्याचं प्रतिनिधीत्व करणार असल्याची माहिती क्रीडा कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर - वैजापूर रोडवर आज सकाळी चोर वाघलगाव परिसरात झालेल्या भीषण अपघातात गंगापूर शहरातल्या दुचाकीस्वार दांपत्याचा जागीच मृत्यू झाला. अलीमुद्दीन सय्यद आणि हानीफाबी सय्यद अशी मृतांची नावं असून ते दोघे, नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी वैजापूर तालुक्यात जात असताना अज्ञात वाहनानं त्यांना धडक दिली त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

****

या वर्षासाठीची बालनाट्य आणि दिव्यांग बाल नाट्य या दोन्ही स्पर्धा सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या मार्फतच आयोजित करण्यात येणार आहेत, अशी माहिती शासनातर्फे देण्यात आली आहे.

****

No comments: