Monday, 3 November 2025

Text-आकाशवाणी मुंबई – दिनांक 02.11.2025 रोजीचे सायंकाळी 07.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 03 November 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक नोव्हेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      भारतीय महिला क्रिकेट संघानं ऐतिहासिक कामगिरी करत पहिल्यांदाच एकदिवसीय विश्वकरंडक जिंकला; अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ५२ धावांनी विजय

·      उदयोन्मुख विज्ञान आणि तंत्रज्ञान नवोन्मेष परिषद २०२५ चं आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

·      देशाच्या सर्वात वजनदार दूरसंवाद उपग्रह सी एम एस - 3 चं यशस्वी प्रक्षेपण

·      नाशिक आणि अमरावती जिल्ह्यांसाठी ‘सी-ट्रिपल आयटी’ केंद्र मंजूर

आणि

·      कार्तिकी एकादशी सर्वत्र भक्तिभावाने साजरी

****

भारतीय महिला क्रिकेट संघानं ऐतिहासिक कामगिरी करत पहिल्यांदाच एकदिवसीय विश्वकरंडक जिंकला. नवी मुंबईतल्या डी वाय पाटील मैदानावर काल झालेल्या अंतिम सामन्यात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालच्या भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी दणदणीत पराभव केला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात सात बाद २९८ धावा केल्या. सलामीवीर स्मृती मानधाना आणि शेफाली वर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी १०२ धावांची भागीदारी केली. या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ २४६ धावात सर्वबाद झाला. दीप्ती शर्मानं पाच, शेफाली वर्मानं दोन, तर श्री चरणीनं एक खेळाडू बाद केला. शेफाली वर्मा प्लेयर ऑफ द मॅच आणि दीप्ती शर्मा प्लेयर ऑफ सिरीज पुरस्काराची मानकरी ठरली. या विजयासोबत भारत पुरुष आणि महिला क्रिकेट विश्वचषक पटकावणारा ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडनंतरचा तिसरा देश ठरला आहे.

या विजयाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला क्रिकेट संघाचं अभिनंदन केलं आहे. हा महत्त्वाचा क्षण महिला क्रिकेटला आणखी उच्च कामगिरीवर घेऊन जाईल, या मुलींनी अभिमानास्पद कामगिरी केल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. तर भारतीय संघाने मिळवलेला हा अतुलनीय विजय असल्याचं, पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. हा ऐतिहासिक विजय भावी पिढ्यांना प्रेरणा देईल, अधिक युवक - युवतींना क्रीडा क्षेत्रात पुढे येण्यासाठी प्रोत्साहित करेल, असं त्यांनी नमूद केलं.

****

पुरुषांच्या क्रिकेटमध्ये, भारतानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यात पाच गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या संघाने दिलेलं १८७ धावांचं लक्ष्य भारताने १८ षटकं आणि तीन चेंडुत पूर्ण केलं. वॉशिंग्टन सुंदरने ४९ धावा केल्या. तीन गडी बाद करणारा अर्शदीप सिंग सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. पाच सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ एक - एकनं बरोबरीत असून, मालिकेतला चौथा सामना येत्या गुरुवारी होणार आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत उदयोन्मुख विज्ञान आणि तंत्रज्ञान नवोन्मेष परिषद २०२५ चं उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमात ते देशातल्या संशोधन आणि विकास परिसंस्थेला चालना देण्यासाठी एक लाख कोटी रुपये अर्थसहाय्य देणाऱ्या संशोधन, विकास आणि नवोन्मेष योजना निधीचा प्रारंभ करतील. शिक्षण तज्ञ, संशोधन संस्था, उद्योग आणि सरकार मधल्या तीन हजारापेक्षा जास्त सहभागींना एकत्र आणणं हे या तीन दिवसीय परिषदेचं उद्दिष्ट आहे. देशाची विज्ञान आणि तंत्रज्ञान परिसंस्था मजबूत करण्यासाठी संशोधक, उद्योग आणि तरुण नवोन्मेषकांमधल्या सहकार्यासाठी हे योग्य व्यासपीठ ठरेल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इसरोनं काल सी एम एस-03, हा देशाचा सर्वाधिक वजन असलेला दूरसंवाद उपग्रह प्रक्षेपित केला. आंध्र प्रदेशात श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून या उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात आलं. सी एम एस-03 हा लष्कराचा मल्टी-बँड दूरसंवाद उपग्रह असून, त्याला जीसॅट-7 आर असंही म्हणतात. हा उपग्रह भारतीय भूभागासह लगतच्या महासागराच्या विस्तृत क्षेत्रात सेवा देईल, असं इसरोनं म्हटलं आहे. हा उपग्रह भारतीय नौदलाच्या संपर्क यंत्रणेत लक्षणीय सुधारणा घडवेल, तसंच तो उच्च-क्षमतेची बँडविड्थ देखील प्रदान करेल, त्यामुळे दुर्गम भागांशी डिजिटल माध्यमातून संपर्क साधता येईल, असंही इसरोकडून सांगण्यात आलं.

****

उद्योग आणि कौशल्य विकास क्षेत्रात महाराष्ट्राला आघाडीवर न्यायच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, नाशिक आणि अमरावती या दोन जिल्ह्यांसाठी प्रत्येकी एक ‘सी-ट्रिपल आयटी’ केंद्र शासनानं मंजूर केलं आहे. या अंतर्गत संशोधन, नवसंकल्पना आणि उद्योजकता वाढीला लावण्याकरता मार्गदर्शन आणि प्रशिक्षण केंद्र सुरु होणार आहे. या केंद्रांमुळे युवकांना ‘एआय’ अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता तसंच ‘रोबोटिक्स’, ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’, ‘डेटा अनालिटिक्स, ‘इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञान’, ‘ऑटोमेशन’ या क्षेत्रांमधल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित जागतिक दर्जाचं प्रशिक्षण मिळणार असून युवकांकरता स्वयंरोजगार आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत.

****

६७व्या आकाशवाणी संगीत संमेलनाचं काल मुंबईत उद्घाटन झालं. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, आणि ज्येष्ठ गायक अरुण कशाळकर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आकाशवाणी मुंबईच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक पद्मश्री पंडित वेंकटेश कुमार तसंच प्रसिद्ध भारूड कलाकार हामिद अमीन सय्यद आणि त्यांच्या पथकाने आपली कला सादर केली. येत्या २९ नोव्हेंबरपर्यंत देशभरातल्या २४ आकाशवाणी केंद्रांवर शास्त्रीय, सुगम आणि लोकसंगीत अशा विविध परंपरांमधले कलाकार आपली कला सादर करणार आहेत.

****

कार्तिकी एकादशी काल सर्वत्र भक्तिभावाने साजरी करण्यात आली. यानिमित्त राज्यभरातल्या विठ्ठल मंदीरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. छत्रपती संभाजीनगर नजीक वाळूज महानगरातल्या पंढरपूरच्या विठ्ठल - रुख्मिणी मंदिरात भाविक मोठ्या संख्येनं दाखल झाले होते. पैठण इथंही गोदावरी नदीत पवित्र स्नान करण्यासाठी तसंच संत एकनाथ महाराज यांच्या पादूका दर्शनासाठी नागरीकांनी गर्दी केली होती.

****

राज्यातल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधली भरती प्रक्रिया आता पारदर्शक आणि नि:पक्षपाती पद्धतीने ऑनलाईन होणार आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली. ही भरती प्रक्रिया आयबीपीएस, टीसीएस आणि एमकेसीएल या नामांकित संस्थांमार्फत राबवली जाईल. या प्रक्रियेत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार असून, त्यामुळे बँकांच्या कामकाजात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढेल. यासंदर्भातला शासन निर्णय काल जारी करण्यात आला.  

****

मराठवाड्यात अतीवृष्टीमुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे संपूर्ण मराठवा़ड्याचा संवाद दौरा करणार आहेत. येत्या पाच ते आठ तारखेदरम्यान हा दौऱा होईल, असं पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं.

****

उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा निवड झाली आहे. तर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची एकमताने वरिष्ठ उपाध्यक्षपदी निवड झाली. अजित पवार यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पवार यांच्या पॅनेलमधील आदिल सुमारीवाला, प्रदीप गंधे आणि प्रशांत देशपांडे यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली.

****

नाशिक इथं कालपासून सुरू झालेल्या रणजी क्रिकेट सामन्यात सौराष्ट्र संघानं प्रथम फलंदाजी करताना १२ षटकांमध्ये एक बाद ६१ धावा केल्या. अंधुक प्रकाशामुळे सायंकाळी साडेचार वाजताच खेळ थांबवला. महाराष्ट्राच्या मुकेश चौधरी यानं सौराष्ट्रच्या चिराग जानी याचा बळी घेत बळींचे खातं उघडलं.

****

बीड इथं १७ वर्षाखालील मुलं आणि मुलींच्या राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेचा काल समारोप झाला. या स्पर्धेत राज्याच्या आठ विभागातून आठ मुलं आणि आठ मुलींचे संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेतून राज्याचा मुलं तसंच मुलींचा संघ निवडण्यात आला.

****

धाराशिव तालुक्यात गोवर्धनवाडी इथं नवीन उपडाकघर सुरू करण्यात आलं असून, या उपक्रमाचा शुभारंभ खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि आमदार कैलास घाडगे पाटील यांच्या हस्ते काल करण्यात आला. हा उपक्रम म्हणजे ग्रामीण भागात सरकारच्या सेवा पोहोचवण्याचा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी सक्षम देवगिरी प्रांताच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या सक्षम दिव्यांग सेवा केंद्राचं उद्घाटन काल जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते झालं. जिल्हाधिकारी कार्यालय शासनाच्या योजना सर्व दिव्यांगांपर्यंत पोहचवून त्यांना शासन आणि प्रशासन दिव्यांगांच्या दारी असेल याची अनुभूती देईल, सक्षमसारख्या संस्थांमुळे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने खऱ्या अर्थाने वाटचाल सुरू असल्याचं जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.

****

लातूरच्या आदर्श मैत्री फाउंडेशन तर्फे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना रब्बी हंगामातल्या पेरणीसाठी काल खतं आणि बियाण्यांचं वाटप करण्यात आलं. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला उभं करणं आणि त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहणं गरजेचं असल्यामुळे ही मदत केल्याचं फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोष बिराजदार यांनी सांगितलं.

****

No comments: