Tuesday, 4 November 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.11.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 04 November 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०४ नोव्हेंबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      महात्मा फुले तसंच आयुष्मान भारत योजनेत उपचारांच्या यादीत सुधारणा करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता; आता या योजनेत दोन हजार ३९९ आजारांचा समावेश

·      राज्यातल्या २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; दोन डिसेंबरला मतदान तर तीन डिसेंबरला निकाल

·      राज्यातल्या शहरी भागांतल्या आणि प्रादेशिक योजनांमधल्या बिगर शेती वापराच्या जमिनींसाठी तुकडे बंदी कायदा रद्द

आणि

·      उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण करण्याच्या उद्देशानं दोनशे पन्नासपेक्षा जास्त जागांवर इंधनविक्री सुरू करण्याचा राज्य परिवहन महामंडळाचा निर्णय

****

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजनांअंतर्गत उपचारांच्या यादीत सुधारणा करण्यास राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज ही बैठक झाली. आता या योजनेत दोन हजार ३९९ आजारांचा समावेश करण्यात आल्याची माहिती, मुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

 

या योजनांमध्ये आयुष्मान कार्ड निर्माण आणि वितरण करणाऱ्या आघाडीच्या फळीतल्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यालाही या बैठकीत मंजुरी देण्यात आली. अधिकचा खर्च येणाऱ्या काही विशेष आजारांमध्ये दहा लाख किंवा त्यापेक्षा जास्त खर्च देण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत आरोग्य सुविधांचं विकेंद्रीकरण करण्याच्या उद्देशानं शहरी आरोग्य आयुक्तालय स्थापन करणं, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या आणि १४ मार्च २०२४ रोजी दहा वर्ष सेवा पूर्ण झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं नियमित पदांवर समायोजन करण्याच्या निर्णयात दुरुस्ती करणं, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथं वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करणं, तसंच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मध्ये सुधारणा करण्यासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.  

श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांच्या साडेतीनशेव्या शहीदी समागम शताब्दी कार्यक्रमांसाठी ९४ कोटी ३५ लाख ६४ हजार रुपयांच्या निधीच्या तरतुदीलाही यावेळी मान्यता देण्यात आली. यानिमित्त नांदेड, नागपूर आणि रायगड जिल्ह्यांसह राज्यभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे.

****

क्रिकेट विश्र्वचषकावर भारताचं नाव कोरणाऱ्या भारतीय महिला संघाचं आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत अभिनंदन करण्यात आलं. या संघातल्या महाराष्ट्राच्या खेळाडू स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रीग्ज आणि राधा यादव यांचा रोख पारितोषिकानं गौरव करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

****

राज्यातल्या २४६ नगर परिषदा आणि ४२ नगर पंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केला. याअंतर्गत सहा हजार ८५९ सदस्य आणि २८८ अध्यक्षांची निवड होणार असल्याचं निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितलं. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आजपासून आचारसंहिता लागू झाल्याचं त्यांनी जाहीर केलं.

या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास १० नोव्हेंबर पासून सुरुवात होणार असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ नोव्हेंबर ही आहे. अर्जांची छाननी १८ नोव्हेंबरला होणार असून, २१ नोव्हेंबर पर्यंत अर्ज मागे घेता येतील. निवडणूक चिन्हांचं वाटप २६ नोव्हेंबरला करण्यात येणार असल्याचं आयुक्तांनी सांगितलं. नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीसाठी दोन डिसेंबरला मतदान होणार असून, तीन डिसेंबरला निकाल जाहीर होईल. ही निवडणूक इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र -  ईव्हीएमवर घेण्यात येणार आहे.

राज्यातल्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी ३१ ऑक्टोबरला प्रसिद्ध झाली असून, त्यानुसार मतदान होणार आहे. त्यामध्ये  एकूण एक कोटी सात लाख तीन हजार ५७६ मतदार असून, यात ५३ लाख २२ हजार ८७० महिला मतदारांचा समावेश आहे.

मतदारांची दुबार नाव चिन्हांकित केली असून, अशा मतदारांना एकदाच मतदान करता येणार, अशी तांत्रिक व्यवस्था केल्याची माहितीही वाघमारे यांनी दिली.

****

राज्यातल्या शहरी भागांतल्या आणि प्रादेशिक योजनांमधल्या बिगर शेती वापराच्या जमिनींसाठी तुकडे बंदी कायदा रद्द करण्यात आला आहे. जमिनीचे तुकडे पाडण्याला प्रतिबंध करण्याचा आणि त्यांचं एकत्रीकरण करण्याबाबतच्या अधिनियमात सुधारणा करण्याचा अध्यादेश आजपासून राज्यात लागू झाल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यामुळे आता १५ नोव्हेंबर १९६५ पासून १५ ऑक्टोंबर २०२४ पर्यंत तुकडेबंदी कायद्याविरुद्ध झालेले जमिनींचे व्यवहार नियमित करता येतील. याचा राज्यातल्या एकोणपन्नास लाख परिवारांना लाभ होणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं.

****

उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण करण्याच्या उद्देशानं राज्य परिवहन महामंडळ राज्यभरात आपल्या मालकीच्या दोनशे पन्नासपेक्षा जास्त जागांवर इंधनविक्री सुरू करणार असल्याची माहिती, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. एसटी महामंडळाच्या मुख्यालयात आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या ठिकाणी व्यावसायिक तत्वावर पेट्रोल, डीझेल बरोबरच सीएनजी तसंच इलेक्ट्रिक चार्जिंग उपलब्ध असतील, असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीची थकबाकीची रक्कम देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. कर्मचाऱ्यांना २०२० ते २०२४ या कालावधीतील वेतनवाढीची थकबाकी रकमेनुसार पाच ते ४८ हप्त्यांमध्ये प्रदान केली जाणार आहे.

****

राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज धाराशिव तालुक्यातल्या तेर इथं पुरातत्त्व खात्याकडून सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली. श्री संत गोरोबाकाका यांच्या मंदिरात सुरू असलेली विविध विकास कामं चार महिन्यात पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तेर तीर्थक्षेत्राला अ वर्ग दर्जा देण्याच्या मागणीच्या कायदेशीर प्रक्रिया पार पाडून हा प्रस्ताव पुढे नेण्याची ग्वाहीसुद्धा शेलार यांनी दिली. ते म्हणाले

बाईट – सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या उद्योगांनी आपल्या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या वापराबाबत माहिती जिल्हा प्रशासनाला सादर करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. जिल्ह्यातल्या उद्योगांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत ते आज बोलत होते. सामाजिक उत्तरदायित्व निधीची माहिती जिल्हा प्रशासनाकडे असली की आगामी वर्षात अशा निधीतून करण्याच्या कामांचं नियोजन करता येतं, त्यामुळे उद्योगांनी ही माहिती द्यावी, असं त्यांनी सांगितलं.

****

बीड इथं आज जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला तसंच नव्या प्रस्तावांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

****

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे उद्यापासून चार दिवस मराठवाडा दौऱ्यावर येणार आहेत. दगाबाज रे संवाद दौऱ्याच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. उद्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून त्यांच्या दौऱ्याची सुरुवात होईल.

****

 

बीड ते नाळवंडी रस्त्याच्या दुरवस्थेबाबत लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला वारंवार निवेदनं देऊनही काही कारवाई न झाल्यानं नाळवंडीच्या ग्रामस्थांनी आज अर्धनग्न बैलगाडी मोर्चा काढला. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा सांस्कृतिक संघ, ‘इंद्रधनुष्य’ या राज्यस्तरीय युवक महोत्सवासाठी आज रवाना झाला. जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात उद्यापासून येत्या नऊ तारखेपर्यंत हा महोत्सव होणार आहे.

****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 25 دسمبر 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 25 December-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خب...