Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 05
November 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ नोव्हेंबर २०२५ दुपारी
१.०० वा.
****
शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू, गुरु नानक देव यांची जयंती आज साजरी होत आहे. यानिमित्त
नांदेडसह सर्वच गुरुद्वारांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना गुरू नानक यांच्या
जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. श्री गुरु नानक देवजी यांचे जीवन आणि संदेश मानवतेला
कालातीत ज्ञानाने मार्गदर्शन करत आहेत. करुणा, समानता, नम्रता आणि सेवेची त्यांची शिकवण प्रेरणादायी आहे. त्यांच्या
प्रकाश पर्वानिमित्त शुभेच्छा, असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत
निवृत्तीवेतनधारकांसाठी आज देशव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहिमेचा चौथा टप्पा सुरु
करण्यात आला. देशभरातील दोन हजार जिल्हे, उपविभाग, शहरांमध्ये शिबिरांचं आयोजन करण्यात येणार आहे. निवृत्तीवेतनधारकांना
निवृत्तीवेतन सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी हयातीचा दाखला सादर करावा लागतो. नोव्हेंबर
२०१४ पासून सरकारनं डिजिटल जीवन प्रमाणपत्र ऑनलाइन सादर करण्यासाठी आधार क्रमांकावर
आधारित जीवन प्रमाण योजना सुरु केली आहे.
****
बीड जिल्ह्यात केंद्रीय पथकाकडून अतिवृष्टी आणि पूरग्रस्त
भागाच्या पाहणीला आजपासून सुरुवात झाली. यामध्ये जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्यासह पथकातील वरिष्ठ अधिकारी
सहभागी आहेत. या पथकानं आज बीड, शिरूर कासार, आष्टी तालुक्यांतील अतिवृष्टीग्रस्त भागांना भेट दिली. यावेळी
अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीचा आढावा घेतला. आतापर्यंत पाच लाखांहून
अधिक शेतकऱ्यांना ४४५ कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम वितरित करण्यात आली आहे. जिल्ह्यात
अतिवृष्टीमुळे शेती पिकासह जमिनीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे, त्यामुळे सरसकट नुकसानभरपाईची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी
केली.
दरम्यान, या पथकानं आज अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यातल्या अतिवृष्टीग्रस्त
भागाची पाहणी केली.
****
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीतील तीनही
पक्ष आपापल्या स्तरावर युती संदर्भात निर्णय घेतील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते आज कोल्हापूर
इथं पत्रकारांशी बोलत होते. या निवडणुकीत जनता मोठ्या प्रमाणात महायुतीलाच कौल देईल
असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे
आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. पैठण तालुक्यातील नांदरा गावी त्यांनी अतिवृष्टीबाधित
शेतकऱ्यांशी संवाद साधला. आपण मुख्यमंत्री असताना सरसकट कर्जमाफी केली होती. महायुती
सरकारनं अतिवृष्टी, पूर बाधित शेतकरी, व्यापारी, नागरिक यांना दिवाळीपूर्वी अतिवृष्टीच्या पॅकेजचं आश्वासन दिलं
होतं. मात्र, त्यांनी ते आश्वासन पाळलं नसल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. दरम्यान, उद्धव ठाकरे हे केवळ भाषणबाजी करतात, विकासावर बोलत नाहीत, असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.
****
मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाच्या पथकानं गेल्या
चार दिवसांत केलेल्या कारवाईत मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाई दरम्यान विविध उड्डाणांमधून
आलेल्या पाच प्रवाशांकडून १३ किलोहून अधिक अंमली पदार्थ आणि सुमारे ८७ लाख रुपयांचं
परदेशी चलन जप्त करण्यात आलं आहे.
****
देशातील सर्वात मोठ्या सहकारी संस्था अमुल आणि इफ्को यांचा
जगातल्या नामांकीत सहकारी संस्थांमध्ये समावेश करण्यात आला आहे. देशांतर्गत दरडोई उत्पादनाच्या
आधारे ही निवड करण्यात आली आहे. केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी या यशाबद्दल दोन्ही
संस्थांचं अभिनंदन केलं आहे.
****
भारतीय हॉकीला यावर्षी शंभर वर्ष पूर्ण होत असल्याच्या
औचित्यानं एक भव्य समारंभ आयोजित करण्यात येणार आहे. सात तारखेला दिल्लीच्या मेजर ध्यानचंद
राष्ट्रीय क्रीडसंकुलात हा कार्यक्रम होणार असून, या दिवशी देशातल्या पाचशे पन्नास जिल्ह्यांमध्येही या निमित्त
कार्यक्रम तसंच हॉकीचे सामने आयोजित केले जाणार आहेत. भारतीय हॉकीची गौरवशाली परंपरा
दर्शवणाऱ्या कार्यक्रमांचा यात समावेश असेल. देशाचा गौरव वाढवणाऱ्या दिग्गज व्यक्तींना
या कार्यक्रमात सन्मानित केलं जाणार असल्याचंही याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर शहरात संत एकनाथ रंग मंदिर इथं आजपासून
पद्म फेस्टिव्हलला सुरूवात होत आहे. लेफ्टनंट जर्नल अजय कुमार सिंग यांच्या हस्ते या
फेस्टीवलचे उद्घाटन होणार आहे. हा फेस्टीवल सात तारखेपर्यंत चालणार आहे.
****
‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीताला सात नोव्हेंबर रोजी दीडशे वर्षे पूर्ण होत
आहेत. त्यानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात ‘वंदे मातरम’ चं सामुहिक
गायन आयोजित करण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment