Wednesday, 5 November 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 05.11.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 05 November 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०५ नोव्हेंबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      राज्याच्या विविध भागात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी

·      स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदार महायुतीलाच कौल देतील, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

·      बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १२१ मतदारसंघांमध्ये उद्या मतदान

·      शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव यांची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी

आणि

·      बीड जिल्ह्यात अंबाजोगाई शहरातल्या विविध विकासकामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून सुमारे १२ कोटी रुपये निधी मंजूर

****

राज्याच्या विविध भागात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची केंद्रीय पथकानं आज पाहणी केली. बीड जिल्ह्यात बीड, शिरूर कासार आणि आष्टी तालुक्यात अतिवृष्टीग्रस्त भागांचा पथकानं दौरा केला. यावेळी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीचा आढावा घेतला. आतापर्यंत पाच लाखांहून अधिक शेतकऱ्यांना ४४५ कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम वितरित करण्यात आली आहे. जिल्ह्यात ११ तालुक्यांमध्ये पिकांसह जमिनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तसंच पशुधन आणि घरांनाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे सरसकट नुकसानभरपाईची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.

धाराशिव जिल्ह्यात परांडा तालुक्यातल्या खासगाव आणि वागेगव्हाण या गावातही केंद्रीय पथकाने पाहणी करुन नुकसानीचा आढावा घेतला.

सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्यात बडकबाळ आणि हत्तूर आणि उत्तर सोलापूरच्या तिऱ्हे आणि शिवणी या गावांना भेट देऊन शेती, पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीचा आढावा केंद्रीय पथकानं घेतला.

अहिल्यानगर जिल्ह्यातही केंद्रीय पथकानं आज अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसलेल्या विविध भागांना भेट देऊन नुकसानीचा आढावा घेतला.

****

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत निवृत्तीवेतनधारकांसाठी आज देशव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहिमेचा चौथा टप्पा सुरु करण्यात आला. याअंतर्गत देशभरात दोन हजार जिल्हे, उपविभाग आणि शहरांमध्ये शिबिरांचं आयोजन करण्यात येणार आहे. निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतन सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी हयातीचा दाखला सादर करावा लागतो. नोव्हेंबर २०१४ पासून सरकारनं डिजिटल जीवन प्रमाणपत्र ऑनलाइन सादर करण्यासाठी आधार क्रमांकावर आधारित जीवन प्रमाण योजना सुरु केली आहे.

****

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीतले तीनही पक्ष आपापल्या स्तरावर युती संदर्भात निर्णय घेतील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते आज कोल्हापूर इथं पत्रकारांशी बोलत होते. या निवडणुकीत जनता मोठ्या प्रमाणात महायुतीलाच कौल देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौरा आजपासून सुरु झाला. त्यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण तालुक्यातल्या नांदरा इथं अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांशी संवाद साधला. आपण मुख्यमंत्री असताना सरसकट कर्जमाफी केली होती. महायुती सरकारनं शेतकरी, व्यापारी, नागरिकांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाईच्या पॅकेजचं आश्वासन दिलं होतं. मात्र, त्यांनी ते आश्वासन पाळलं नसल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

त्यानंतर त्यांनी बीड जिल्ह्यात पाली इथं शेतकऱ्यांची भेट घेतली. शासनानं तत्काळ कर्जमुक्ती करावी अन्यथा शेतकरी राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशाराही ठाकरे यांनी दिला. ते म्हणाले

बाईट - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे

****

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १८ जिल्ह्यातल्या १२१ विधानसभा मतदारसंघांमध्ये उद्या मतदान होणार आहे. या टप्प्यात एक हजार ३१४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, पहिल्यांदाच प्रत्येक मतदारसंघात एक निरीक्षक तैनात केला जाणार असून, निवडणूक प्रक्रियेवर बारकाईनं लक्ष ठेवण्यासाठी सर्व मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग होणार आहे. पुरेशा प्रमाणात केंद्रीय सशस्त्र पोलिस दल देखील तैनात केले जाणार आहेत.

****

शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू, गुरु नानक देव यांची जयंती आज साजरी होत आहे. यानिमित्त राज्यातल्या विविध गुरुद्वारांमध्ये लंगर, भजन, कीर्तन अशा विविध कार्यक्रमांचं आयोजंन करण्यात आलं आहे.

नांदेडमधल्या श्री सचखंड गुरुद्वारा इथं हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. याठिकाणी आज सकाळी अखंड पाठाची समाप्ती करण्यात आली. यानिमित्त सायंकाळी गुरुद्वारात फटाक्यांची आतिषबाजीही केली जाणार आहे.

दरम्यान, यानिमित्त काढण्यात आलेली धार्मिक मिरवणूक काल विशेष रेल्वेनं कर्नाटकात बिदर इथल्या गुरुद्वारा नानकझीरा साहिब इथं पोहोचली. याठिकाणी सर्व धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन ही मिरवणूक विशेष रेल्वेनं उद्या बिदरहून नांदेडसाठी रवाना होईल.

श्री गुरुनानक जयंतीनिमित्त परभणी शहरात सिंधी समाज बांधवांच्या वतीने श्री गुरुनानक देव यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. नारायण चाळ चौकातून काढण्यात आलेल्या या मिरवणूकीचा सिंधी भवन इथं समारोप झाला. सिंधी समाज संघटना आणि विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी या मिरवणूकीत पारंपरिक वेषभूषेत सहभाग घेतला.

 

नागपूर शहरातल्या जरीपटका भागातल्या श्री कलगीधर सत्संग मंडल तर्फे झाकी द्वारा शोभायात्रा काढण्यात आली. आमदार डॉ. नितीन राऊत, यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते संगत, पूजा अर्चना आणि श्री गुरु ग्रंथ साहिबची आरती करण्यात आली.

****

कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा आज सर्वत्र श्रद्धापूर्वक पारंपरिक पद्धतीने साजरी होत आहे. त्यानिमित्त ठिकठिकाणी दीपोत्सवांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमाअंतर्गत नांदेड जिल्ह्यातल्या १२ नगरपरिषद आणि एका नगरपंचायतीच्या २६९ सदस्यांसाठी मतदान होणार आहे. जिल्ह्यात निवडणुकीच्या अनुषंगाने आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण झाली असून, आगामी काळातही प्रशिक्षण, बैठका घेणार असल्याचं जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितलं.

बाईट – राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी, नांदेड

****

जालना महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी आता सहा नोव्हेंबर ऐवजी १४ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. या मतदार यादीवर हरकती आणि सूचना दाखल करण्याची शेवटची तारीख २२ नोव्हेंबर आहे. अंतिम मतदार यादी सहा डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती महानगरपालिकेनं प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

****

बीड जिल्ह्यात अंबाजोगाई शहरातल्या विविध विकासकामांसाठी, जिल्हा वार्षिक योजनेतून जवळपास १२ कोटी १३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगरपरिषद प्रशासन विभागाने तीन प्रमुख योजनांच्या या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. नागरी वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी या निधीचा उपयोग करण्यात येणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर शहरात हर्सूल इथल्या हरसिद्धी मातेच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली. यात्रेनिमित्त शहागंज चौराह इथून निघालेली पालखी, संपूर्ण हर्सूल गावात फिरवून आज सकाळी मंदिरात आली. या यात्रेच्या निमित्ताने हरसिद्धी माता मंदिर परिसरात उद्या गुरुवारी कुस्त्यांचं आयोजन केलं आहे.

****

बीड जिल्ह्यात कपिलधार इथं संत शिरोमणी श्री मन्मथस्वामींच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली. उद्या सकाळी समाधीची महापूजा होणार असून सायंकाळी चार वाजता शासकीय महापूजा पार पडणार आहे. यानिमित्त २० दिंड्या याठिकाणी दाखल झाल्या आहेत. यात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी पहाटे तीन वाजेपासून मंदिर दर्शनासाठी खुलं ठेवण्यात आलं आहे.

****

शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाअंतर्गत बीड इथं नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय शालेय व्हॉलिबॉल स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रहेमान यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं. या स्पर्धेतून निवड झालेला संघ उत्तरप्रदेश इथं ११ ते १५ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत राज्याचं प्रतिनिधीत्व करणार आहे.

****

वंदे मातरमया राष्ट्रीय गीताला दीडशे वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल परवा सात तारखेला सर्वत्र या गीताचं सामुहिक गायन करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या क्रांती चौकात ‘वंदे मातरम’ चं सामुहिक गायन करण्यात येणार असून, मंत्री अतुल सावे यांनी आज या कार्यक्रम स्थळाची पाहणी केली.

****

No comments: