Thursday, 6 November 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 06.11.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 06 November 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०६ नोव्हेंबर २०२ सकाळी.०० वाजता

****

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान आज होत आहे. सकाळी नऊ वाजेपर्यंत १३ टक्के मतदानाची नोंद झाली. या टप्प्यात १८ जिल्ह्यातल्या १२१ विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून, एक हजार ३१४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, पहिल्यांदाच प्रत्येक मतदारसंघात एक निरीक्षक तैनात करण्यात आला असून, निवडणूक प्रक्रियेवर बारकाईनं लक्ष ठेवण्यासाठी सर्व मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग होत आहे. पुरेशा प्रमाणात केंद्रीय सशस्त्र पोलिस दल देखील तैनात करण्यात आले आहेत.

दरम्यान, पंतप्रदान नरेंद्र मोदी यांनी नागरीकांना उत्साहाने मतदान करण्याचं आवाहन केलं असून, पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या युवा मतदारांचं अभिनंदन केलं आहे. 

****

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं कृत्रिम बुद्धमत्ता नियमनासंबंधीची मार्गदर्शक तत्व जारी केली आहे. विविध क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा सुरक्षित, समावेशक आणि जबाबदारीपूर्ण अवलंब होईल याची सुनिश्चिती यामुळे होणार असल्याचं प्रधान वैज्ञानिक सल्लागार प्राध्यापक अजय कुमार सूद यांनी सांगितलं. या मार्गदर्शक तत्वांमुळे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या चूकीच्या वापरामुळे व्यक्तिगत तसंच सामाजिक पातळीवरील धोके कमी होतील असं ते म्हणाले. कोणतंही नुकसान करू नका हाच या मार्गदर्शक तत्वांचा गाभा असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

व्यवसाय सुलभतेला चालना देण्याच्या उद्देशाने भारत सरकार कर निर्बंध कमी करणं आणि नियमांचा भार कमी करणं यांसारखे उपाय योजत असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. त्यांनी काल न्यूझीलंड मध्ये भारतीय समुदायाला संबोधित करताना ही माहिती दिली. भारताला आकर्षक स्थान बनवणं हा सरकारचा उद्देश असल्याचं ते म्हणाले.

****

नौदलाच्या मोठ्या टेहेळणी जहाजांच्या श्रेणीतलं तिसरं जहाज ‘इक्षक’ हे आज कार्यान्वित होणार आहे. कोची इथं समारंभपूर्वक हे जहाज भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होऊन नौदलाच्या दक्षिण कमांडमध्ये तैनात होणार आहे. कोलकाता इथल्या गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडनं बांधलेल्या या जहाजात ८० टक्क्यांपेक्षा जास्त स्वदेशी सामग्रीचा वापर झाला आहे. बंदरं, जहाजांचे तळ आणि खोल समुद्रातल्या नौवहन मार्गांच्या टेहळणीसाठी हे जहाज उपयुक्त ठरेल.

****

मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन संकुलाचा पायाभरणी आणि कोनशिला अनावरण कार्यक्रम सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते वांद्रे पूर्व इथल्या शासकीय वसाहत परिसरात काल पार पडला. न्यायालयीन इमारती प्रत्येक नागरिकाला न्यायप्रवेश सुलभ करणाऱ्या ठराव्यात, अशी अपेक्षा न्यायमूर्ती गवई यांनी यावेळी व्यक्त केली. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून ही इमारत पूर्णपणे ‘एआय-सक्षम’ असेल आणि देशातल्या इतर न्यायालयांसाठी आदर्श ठरेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

**

दरम्यना, गोरेगाव इथं महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ प्रकल्पाचा शुभारंभही काल सरन्यायाधीश गवई यांच्या हस्ते झाला. महाराष्ट्रात राष्ट्रीय विधि विद्यापीठ प्रकल्प उभारणी हा ऐतिहासिक टप्पा आहे. राज्यात न्यायपालिकेच्या पायाभूत सुविधांचा दर्जा देशात सर्वोत्तमपैकी एक आहे, असं सरन्यायाधीश यावेळी म्हणाले. महाराष्ट्र हे तीन राष्ट्रीय विधि विद्यापीठ असलेलं देशातलं एकमेव राज्य आहे. हा प्रकल्प केवळ राज्याचाच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील विधि शिक्षणाचं केंद्र बनेल. नवी मुंबईत उभारण्यात येणाऱ्या ‘एज्यु-सिटी’मध्ये जगातील सर्वोच्च विद्यापीठं येणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

****

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान चौथा टी - ट्वेंटी क्रिकेट सामना आज क्विन्सलँड इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी पावणे दोन वाजता या सामन्याला सुरुवात होईल. पाच सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ एक - एकनं बरोबरीत आहोत. 

****

दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं दक्षिण आफ्रिकेसोबतच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. शुभमन गीलच्या नेतृत्वाखालच्या या संघात, उपकर्णधार ऋषभ पंत आणि वेगवान गोलंदाज आकाशदी यांचं पुनरागमन झालं आहे. प्रसिद्ध कृष्णा आणि एन जगदिशन यांना या संघातून वगळण्यात आलं आहे. या मालिकेतला पहिला सामना येत्या १४ नोव्हेंबरपासून कोलकाता इथं, तर दुसरा सामना २२ नोव्हेंबरला गुवाहाटी इथं खेळला जाणार आहे.

****

फिडे विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या अव्वल खेळाडुंनी दमदार कामगिरी केली आहे. ग्रँडमास्टर डी गुकेश, अर्जुन एरिगसी आणि पेंटला हरिक्रिष्णा यांनी स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. गुकेशने कझाकिस्ताच्या खेळाडुचा, तर अर्जुनने बल्गेरियाच्या खेळाडुचा पराभव केला.

****

इजिप्तमध्ये आजपासून सुरु होणाऱ्या आयएसएसएफ जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत नमू भाकरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सामील होणार आहे. पिस्तुल प्रकारात मनु भाकर, ईशा सिंग आणि सुरुची सिंग देशाचं प्रतिनिधित्व करतील. रायफल प्रकारात रुद्रांक्ष पाटील, स्वप्नील कुसळे सहभागी होतील. या स्पर्धेत ७२ देशातले ७२० नेमबाज सहभागी होतील.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 27.12.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 27 December 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छ...