Saturday, 8 November 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 08.11.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 08 November 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०८ नोव्हेंबर २०२ सकाळी .०० वाजता

****

भारताच्या आर्थिक विकास वाढीच्या दराबाबत जागतिक बँकेने भारताचे कौतुक केले आहे. जागतिक स्तरावरील डिजीटल सेवा हा भारताचा मजबूत पाया असल्याचे जागतिक बँकेने म्हटलं आहे. तांत्रिक क्षमता आणि उत्पादकतेत सुधारणा झाल्याचंही जागतिक बँकेनं म्हटलं आहे. यापुढेही हा आर्थिक विकास अधिक वेगानं होण्यासाठी भारताचे आर्थिक व्यवस्थापन आणखी मजबूत करायला हवं. आर्थिक क्षेत्रांमधील सुधारणा आणि खाजगी गुंतवणुकीवर भर द्यावा लागेल, असं निरीक्षणही जागतिक बँकेने नोंदविले आहे.

****

नवीन फौजदारी कायद्यांच्या प्रत्येक घटकातील अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्राला देशात सर्वात पुढे ठेवावं, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. काल मुंबईत यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. ज्या घटकातील अंमलबजावणीमध्ये राज्य मागे आहे, अशा घटकाच्या अंमलबजावणीमध्ये पुढील काळात महाराष्ट्र देशात अन्य राज्यांच्या तुलनेत अव्वल ठेवण्याची अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. आरोप सिद्ध झाल्यानंतर ६० दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करण्याचं प्रमाण वाढवण्यात यावं. ई- साक्षला एफआयआर संलग्न करण्याची कार्यवाही गतीने पूर्ण करावी तसंच नागरिक केंद्रीत सेवा देण्यात याव्यात आदी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

****

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५, ही परीक्षा लातूर शहरातील ११ परीक्षा उपकेंद्रांवर उद्या ९ तारखेला सकाळी १० ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ५ या कालावधीत होत आहे. त्याअनुषंगाने निश्चित करण्यात आलेल्या ११ परीक्षा केंद्राच्या परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. हे आदेश उद्या सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत लागू राहतील.

****

नांदेड जिल्ह्यात येत्या १७ तारखेपासून २ डिसेंबर पर्यंतच्या कालावधीत कुष्ठरोग निर्मूलन मोहिम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान प्रत्येक घरोघरी भेट देत आरोग्य कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षण करून अभियान यशस्वी करावं, असं आवाहन अप्पर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड यांनी केलं आहे.

या अभियानात समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण शोधून त्यांना त्वरित बहुविध औषधोपचाराखाली आणणं, नवीन संसर्गित रुग्ण ओळखणं आणि संसर्गाची साखळी खंडित करणे, तसंच कुष्ठरोगाविषयी जनजागृती वाढवणं आदी उपक्रम घेण्यात येतील.

यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत, मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध समित्या-जिल्हा आणि तालुका समन्वय समित्या-स्थापन करून त्यांच्या जबाबदाऱ्यांचं वाटप निश्चित करण्यात आलं. मोहिमेचं संनियंत्रण आणि पर्यवेक्षण प्रभावीपणे पार पाडण्यासाठी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी समन्वयाने कार्य करावं, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी गायकवाड यांनी या बैठकीत दिले.

****

पुण्यातील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी कुठलाही आर्थिक व्यवहार झालेला नाही; तसंच जमिनीचा ताबाही घेण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे पार्थ पवार याने तो करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल मुंबईत माध्यमांना दिली. या प्रकरणाच्या सखोल चौकशीनंतर सत्य समोर येईल; कोणी दोषी आढळल्यास योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असं ते म्हणाले.

****

छत्तीसगड मधल्या नक्षलविरोधी अभियानाला मोठं यश मिळालं असून उदंती एरिया कमेटी या नक्षलवादी संघटनेच्या सगळ्या सक्रीय सदस्यांनी छत्तीसगड पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. ही कमिटी गरियाबंद-धमतरी-नुवापारा क्षेत्रातली सक्रीय असणारी एक प्रमुख नक्षलवादी संघटना आहे. छत्तीसगडमधल्या रायपूर इथे पोलीस महानिरीक्षक अमरेश मिश्रा यांच्या समोर झालेल्या या आत्मसमर्पणात ७ नक्षलवाद्यांचा समावेश असून यातल्या २ प्रमुख कमांडर्सवर प्रत्येकी ८ लाख रुपयांचं बक्षिस जाहीर करण्यात आलं होतं. तर इतर ४ जणांवर ५ लाख आणि एका नक्षलवाद्यावर १ लाख रुपयांचं बक्षिस जाहीर होतं.

****

नवी दिल्ली इथल्या राष्ट्रीय संग्रहालयात ठेवलेले भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष अकरा दिवसांच्या प्रदर्शनासाठी आज भूतानला पाठवले जात आहेत. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार, या अवशेषांना घेऊन जाणाऱ्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील.

****

भारत-ऑस्ट्रेलिया टी २० क्रिकेट मालिकेतला पाचवा आणि शेवटचा सामना आज होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी पावणे दोन वाजता ब्रिस्बेनमधे हा सामना सुरू होईल. भारत या मालिकेत २-१ अशा गुणफरकाने आघाडीवर आहे. हा सामना जिंकून पाच सामन्यांची मालिका बरोबरीत सोडविण्याचा ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न असेल, तर सामन्यात विजय मिळवत टी - २० मालिका जिंकण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न राहील.

****

No comments: